अग्नि ज्याप्रमाणे प्रत्येक काष्ठामध्ये
अव्यक्त स्वरूपाने अनुस्यूत आहे; परंतु
आपल्याला त्याची प्रत्यक्ष प्रचीति येत नाही. ती येण्यासाठी प्रयत्नाने अव्यक्त अग्नीला विशेष
रूपाने व्यक्त केले पाहिजे. लोणी ज्याप्रमाणे
दुधामध्ये असूनही प्रचीतीला येत नाही, कारण ते अव्यक्त स्वरूपामध्ये असते. ते व्यक्त करण्यासाठी मंथनाने दुधापासून भिन्न
केले पाहिजे. त्याचप्रमाणे परमात्मा
सर्व भूतमात्रांच्यामध्ये अंतर्बाह्य व्याप्त आहे. परंतु तो स्वतःहून व्यक्त होत नाही. प्रचीतीला येत नाही. त्यासाठी प्रत्येकाने पुरुषप्रयत्नाने
स्वतःच्या अंतःकरणामध्ये विवेकाच्या साहाय्याने ते स्वरूप भिन्न केले पाहिजे. त्याची साक्षात प्रचीति घेतली पाहिजे. तोच प्रत्येक मनुष्याचा परमपुरुषार्थ आहे. अशा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मी सहज उपलब्ध
होतो.
श्रुति म्हणते – दृश्यते
त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः | (कठ. उप.
१-३-१२)
सूक्ष्मदर्शी लोकच शुद्ध, एकाग्र आणि
अंतर्मुख वृत्तीने परमात्मस्वरूप पाहातात. सर्व लोक पाहू शकत नाहीत. याचा अर्थ जे साधक चित्तशुद्धि करून
विवेकाच्या साहाय्याने प्रयत्न करतात त्यांना सद्गुरूंच्या कृपेने मी उपलब्ध होतो.
मी जरी त्यांना प्राप्त व्हावयाचे नाही
असे ठरविले तरी ते माझ्या हातात नाही, कारण मी त्यांच्या जवळच आहे. मी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते
स्वप्रयत्नाने माझ्या स्वरूपापर्यंत येऊन अभेद स्वरूपामध्ये माझ्यामध्ये राहतात. ते माझ्यापासून भिन्न राहात नाहीत किंवा मी
सुद्धा त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. आम्ही दोघेही एकरूप होतो. थोडक्यात ज्ञानानेच अज्ञानजन्य द्वैताचा ध्वंस
होऊन जीवाला मोक्षप्राप्ति होते.
यावरून सिद्ध होते की, परमेश्वरामध्ये पक्षपात
नाही. त्याला सर्वच प्रिय आहेत. फक्त प्रत्येक जीवाने त्याचे स्वरूप प्राप्त
करण्याची इच्छा केली पाहिजे आणि स्वतःचा उद्धार स्वतःच करून घेतला पाहिजे. नाहीतर स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून
घेतल्याप्रमाणे पुरुषार्थच्युत होऊन तो संसारामध्ये अडकतो. परमेश्वर काहीही करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने ज्ञानप्राप्तीसाठी सर्व
प्रयत्न करावेत हाच अभिप्राय आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–