Showing posts with label Calamity. Show all posts
Showing posts with label Calamity. Show all posts

Tuesday, June 2, 2026

दुःखांनो या ! मी तयार आहे ! | Welcoming The Calamities






शास्त्रामध्ये प्रार्थना आहे - स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः |                   (शान्तिपाठ)

अकुंठित गति असणाऱ्या गरुडाने आमच्यावर कृपा करावी.  गरुडझेप लोकप्रसिद्ध आहे.  जीवनामध्ये गरुडझेप घ्यावी.  खूप साधना करावी.  आपल्या मनाला तयार करावे.  कितीही दुःखे आली, संकटे आली, आघात झाले तरीही श्रद्धा, निष्ठा डळमळीत होऊ देऊ नये.  उलट, "दुःखांनो या! मी तयार आहे."  (I am ready to receive anything.), ही माझी वृत्ति असावी.

 

परमेश्वर साधकाची सतत परीक्षा घेत असतो.  प्रथम सोपी मग अवघड, अधिक अवघड करीत करीत साधकाला सर्व दिव्यांच्यामधून नेतो.  शेवटी ती दुःखे ही बोथट होतात.  त्यांच्यामधील अवघडपणाच संपतो.  ती दुःखे साधकाला disturb करू शकत नाहीत.  महाभारतामध्ये सहनशीलतेची साक्षात मूर्ति असणारी कुंती म्हणते -

विपदः सन्तु नः शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो |

भवतो दर्शनं यत्स्यात् अपुनर्भवदर्शनम् ||                                  (महाभारत)

हे परमेश्वरा !  आमच्या जीवनामध्ये सतत विपत्ति येवोत.  त्यामुळे आम्हाला तुझे कधीही विस्मरण होणार नाही.  इतकी मनाची तयारी पाहिजे.

 

या श्लोकामध्ये भगवान 'नित्यं' हा शब्द वापरतात.  म्हणजेच नित्यनिरंतर चित्ताची समतोलता ठेवावी.  ही साधना एका क्षणाची नसून अनेक जन्मांची आहे.  म्हणून अध्यात्ममार्गामध्ये ३५ किंवा ५० टक्क्यांना उत्तीर्ण होत नाही.  ९९.९९ टक्के ही चालत नाहीत.  तर १०० टक्क्यांनाच उत्तीर्ण होता येते.  सोने जसे मुशीत टाकून तावून - सुलाखून घेतल्यावरच ते तेजस्वी, ओजस्वी होते.  त्याचप्रमाणे साधकाने आपले मन सर्व प्रसंगांच्यामधून तयार केले पाहिजे.

 

भगवान म्हणतात - गुरुणापि न विचाल्यते |                              (गीता अ. ६-२२)

महान संकटे येऊनही ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.  यासाठीच साधकाने सर्व प्रसंगांच्यामध्ये मन स्थिर, समतोल, संतुलित ठेवण्याचा अभ्यास करावा.  त्यामुळे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न, द्वन्द्वविक्षेपरहित होऊन श्रवणादि ज्ञानसाधनेला योग्य, अधिकारी, अनुकूल होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–


Saturday, December 26, 2015

संकटांचे प्रयोजन | Provision of Calamities


संकटं आपल्याला रडविण्यासाठी नाहीत.  पूर्णत्वाला नेण्यासाठी आपली सतत कसोटी घेतली जाते, ती या संकटातच.  जीवनमूल्यांची व दैवीगुणांची जोपासना या संकटातच होत असते.  तेथेच गुणांना प्रकट करण्याची संधी मिळते.  सुखावह, आरामशीर जीवनात सुखलोलुपता, अधार्मिक वृत्ति, अनाचार, स्वैराचार, मद्यपान हे दुर्गुण मोकाट सुटतात.  सुखावह जीवन सद्गुणांचा नाश करते.  संकट हे सद्गुणांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे.

श्रद्धा, निष्ठा, धैर्य, सहनशीलता, आत्मविश्वास व भक्ति हे मनाचे धर्म आहेत.  ते गुण मनाची अवस्था दर्शवितात.  हे दैवी गुण किती आत्मसात केले आहेत, हे प्रसंगांतूनच दिसून येते.  संकटे येतात ती मनुष्याला उर्ध्वगतीला नेण्यासाठीच येतात.  शास्त्राच्या अध्ययनाला दैवीगुणसंपत्तीची व शुद्ध, निर्मळ अंतःकरणाची आवश्यकता असते.  तसे मन या संकटांमधून तयार होते.

तसेच, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दुःखाच्या फटक्यांनी माणसाचे डोळे उघडतात व त्याला कळून येते की सर्व विषयोपभोग रसहीन आहेत. व्यवहार व्यर्थ आहे.  पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, नातेवाईक हे सर्व दुःखवर्धन करणारे आहेत.  ते प्राप्त करणे हे जीवनाचे ध्येय नाही.  चिरंतन शांति व आनंदप्राप्तीसाठी शास्त्र अध्ययन हा एकमेव मार्ग आहे.

माणसे संसारसागरात गटांगळ्या खातात तेव्हा त्यांचा जीव संकटांनी बेजार होतो.  ही सर्व परमेश्वरी योजना असते.  संकटामागील परमेश्वराचा हेतु लक्षात घेऊन परिपक्व दृष्टिकोन ठेऊन शांत व प्रतिक्रियारहित होऊन संकटाला सामोरे जावे.



- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ –

Tuesday, February 18, 2014

भगवान कृष्ण – पालनकर्ता | Lord Krishna – The Guardian



आदि शंकराचार्य षट्पदी स्तोत्रात म्हणतात ‘ हे परमेश्वरा !  मत्स्य, कूर्म, वराह वगैरेदि अनेक अवतार धारण करून तू नित्य पृथ्वीचे रक्षण केलेस.  भगवंता !  तू याप्रमाणेच माझेही रक्षण करावेस, कारण मी संसारतापाने भयभीत झालो आहे. ’  

प्रत्येक जीव संसाराच्या त्रिविध तापामध्ये होरपळून निघतो.  आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराचे असह्य रोग, यातना होय.  आधिभौतिक ताप म्हणजे सभोवतालची माणसे, आप्त, सगेसोयरे, बंधुबांधव, नातेवाईक यांच्यापासून प्राप्त होणारे दुःख होय.  तसेच, अतिवृष्टि, अनावृष्टि, भूकंप, ज्वालामुखी वगैरे नैसर्गिक आपत्ति म्हणजे आधिदैविक ताप होय.  याप्रकारच्या अनंत दुःखांनी मनुष्य सर्व बाजूंनी हतबल होतो.  त्याचे मन अस्वस्थ, उद्विग्न होते.  जन्म-मृत्यु-जरा-व्याधि यामुळे मनुष्य अतिशय भयभीत होतो.

ज्याप्रमाणे लहान मूल घाबरले की, आईवडील त्वरित त्याचे रक्षण करतात.  त्यावेळी आईवडील मुलाकडून कोणतीही अपेक्षा करीत नाहीत.  म्हणूनच आईवडिलांना ‘ पालक ’ असे म्हटले जाते.  म्हणून येथे आचार्य भगवंतालाच प्रार्थना करतात की, ‘ भगवंता !  तूच माझी आई–वडील, बहिण– बंधु, सखा सर्वकाही आहेस.  त्यामुळे मी कसा आहे ?  माझ्यामध्ये किती गुणदोष आहेत ?  किंवा मी तुला शरण आलो आहे की नाही ?  हे काहीही न पाहता तू माझे या भवतापापासून रक्षण करावेस.  परमेश्वरा, हेच तर तुझ्या अवताराचे प्रयोजन आहे. ’

‘ अवतार ’ म्हणजे खाली येणे होय. भगवंता !  माझ्या उद्धारासाठीच तर तू खाली आलास.  निर्गुणाचा सगुण झालास.  जसे मूल खड्ड्यात पडल्यानंतर आईवडील स्वतः खड्ड्यात उतरून, खाली जाऊन त्याला बाहेर काढतात.  म्हणूनच भगवंता, तू माझा मायबाप आहेस.  आमच्यासारख्या पातकांच्या राशी असणाऱ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी तू या पृथ्वीतलावर अनेक अवतार धारण केलेस.

 
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013



- हरी ॐ –

Wednesday, September 18, 2013

श्रीगणेश – फलश्रुति - निर्विघ्नता | Shree Ganesh – Freedom from Calamities

 

सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति |

जो सदासर्वकाळ ‘अथर्वशीर्ष’ म्हणतो तो निर्विघ्न होतो. याचा अर्थ अथर्वशीर्ष पठण करणाऱ्याला पापकर्म करण्यासाठी परवाना दिलेला नाही. पाप हे प्रत्यक्ष कर्म नसून त्यामागे असलेली दुष्ट, लुबाडण्याची प्रवृत्ति म्हणजे ‘पाप’ आहे.

अथर्वशीर्षाच्या पठणाने भक्ताची अदृष्ट शक्तीमध्ये श्रद्धा वृद्धिंगत होते. श्रीगणेशउपासनेमध्ये निष्ठा वाढून तल्लीनता, तन्मयता वाढते. कर्मानुष्ठानाच्या वेळी किंवा उपासनेच्या वेळी वृत्ति काही प्रमाणात रागद्वेषरहित होऊन शुद्ध, स्थिर होते, अधिक सात्त्विक होते. त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. व्यवहार करतानाही वृत्ति थोडी शुद्ध राहते आणि आपल्या हातून वाईट कर्म किंवा पापकर्म न होण्याची काळजी घेतो. याप्रमाणे पापकर्म करण्याची वृत्तीच नाहीशी होऊन सद्वृत्ति प्रधान होते.

तो श्रीगणेशाचा भक्त आहे ही सतत जाणीव राहिल्याने जे जे काही घडेल ते ते सर्व श्रीगणेशाची इच्छा किंवा कृपा आहे या दृष्टीने घेत असल्यामुळे त्याची सहनशीलता वाढते. सर्व घटना आनंदाने आणि प्रसन्न वृत्तीने घेतो. याचा परिणाम म्हणजे रागद्वेषात्मक विक्षेप कमी होतात. चित्त शुद्ध होते, निष्पाप होते.

यामुळे चिंतनशील वृत्ति वाढते आणि श्रीगणेश अथर्वशीर्षाच्या गूढार्थावर अखंड, नित्यनिरंतर चिंतन करतो. त्याला कोणतेच विघ्न राहात नाही. प्रत्येक प्रसंग, इतकेच नव्हे तर सर्व जीवनच साधनामय होते. तो सर्वच प्रसंग अत्यंत सहजतेने, लीलया, आनंदाने, प्रसन्न वृत्तीने पाहू शकतो. सहन करू शकतो. तो निर्विघ्न होतो.      

"श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010
 


 
 
 
- हरी ॐ –

Tuesday, September 17, 2013

श्रीगणेश – संस्कारांचे हरणकर्ता I Shree Ganesh – Robber of Impressions



परब्रह्मस्वरूप श्रीगणेश मायोपाधीवर आरूढ होऊन सर्व जीवांच्या हृदयामध्ये सर्वान्तर्यामी स्वरूपाने सन्निविष्ट आहे.  हे जीव अनेक प्रकारची पापपुण्यात्मक कर्म करून रागद्वेषकामक्रोध वगैरे अनंत, अगणित संस्काररूपी संपत्ति संग्रह करतात.  त्यावेळी सर्वान्तर्यामी परब्रह्मस्वरूप श्रीगणेश मायोपाधिरूपी मूषकावर आरूढ होऊन शरणागत आलेल्या भक्तांच्या अंतःकरणातील संग्रह केलेली संस्काररूपी संपत्ति हरण करतो.  म्हणून मूषक हे गणपतीचे वाहन आहे.

प्रथम विषयासक्त आणि स्वतःला कर्ताभोगता म्हणविणाऱ्या नास्तिकवादी जीवाला मायारूढ झालेला अन्तर्यामी परमेश्वर नकळत जीवाच्या अहंकाराला, कर्तृत्वभोगतृत्व बुद्धीला धक्के देतो.  सर्व प्रयत्न करूनही संकटांच्यावर मात करता येत नाही.  त्यामुळे तो अधिकच बेजार, अगतिक, व्याकूळ होतो.

परंतु भगवान त्याच्यावर कृपा करण्यासाठीच त्याला अनेक दुःखांच्या दरीत फेकून देतो.  अनेक संकटांमधून होरपळून काढतो.  यामुळे परमेश्वरच कर्तुमकर्तुम् आहे, मी नाही हे त्याला उमजते.  यामुळे तो आस्तिक होऊन श्रद्धावान होतो.  परमेश्वराचे भजन, पूजन, उपासना करू लागतो.  ही सर्व धार्मिकता ऐहिक विषयांच्या प्राप्तीसाठी, संकटांचे निवारण करण्यासाठी सकाम असते.

काही काळानंतर तोच अन्तर्यामी परमेश्वर भक्ताच्या मनात विकल्प निर्माण करून विचार करायला प्रवृत्त करतो.  भक्ताला विषयांच्या मागणीमध्ये काही रस वाटत नाही.  परमेश्वराजवळ मी किती मागणार?  कारण जे जे मागतो ते सर्व नश्वर, क्षणभंगुर आहे असे दिसते.  कशामाधूनही त्याला अंतरिक शांति, सुख मिळत नाही असे दिसते.  मग मागायचे तरी कशासाठी?  मला काहीच नको.  मला फक्त आत्मसुख, शांति पाहिजे.  बाकी काहीही नको.  अशाप्रकारची वृत्ति प्रयत्न करून किंवा अभ्यासाने निर्माण होत नाही.  तर अन्तर्यामी गणेशच निष्काम भक्तीची इच्छा निर्माण करतो.  ही श्रीगणेशाची कृपा आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ –

Thursday, September 12, 2013

विघ्नहर्ता - अनर्थकारी संसारापासून रक्षण I Protection from Disastrous World




अव श्रोतारम् | - ‘जो श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने तुझ्या स्वरूपाचे श्रवण करतो, त्या तुझ्या भक्ताचे रक्षण कर.’  साधकाच्या जीवनामध्ये विषयांना आणि व्यवहाराला खूप महत्व असते आणि अशा अनेक विषयांच्यामध्ये आध्यात्मिक साधनेची लुकलुकणारी इच्छा असते.  त्यामुळे सर्व व्यावहारिक कर्तव्य संपल्यानंतर श्रवणादि साधना करू असे त्याला वाटते.  तो श्रवणाला विशेष महत्व देत नाही.  यासाठी त्याला अंतरिक निश्चयाची आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे.

अनेक प्रकारचे आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक संकटे आणि दु:खे एकामागून एक सतत येत असतात.  त्यांच्या प्रचंड आघातामुळे शास्त्रावरील श्रद्धा, परमेश्वरावरील निष्ठा डळमळीत होते. आत्मविश्वास उडून जातो.  जीवनात नैराश्य आणि वैफल्य येते. साधनेमध्ये उत्साह राहत नाही. मनाची एकाग्रता भंग पावते.  अशा वेळी मनुष्य नास्तिकवादाकडे झुकण्याची शक्यता असते.  अशा भक्तांचे मानसिक नैराश्यातून, वैफाल्यामधून रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

हे रक्षण म्हणजेच संकटकाळामध्ये दु:खांच्या आघातामध्ये ज्यावेळी साधक एकाकी पडेल, त्यावेळी त्याच्या श्रद्धेचे रक्षण झाले पाहिजे.  त्याचा आत्मविश्वास आणि धैर्य न खचता, जिद्दीने आणि धैर्याने, निराश न होता दु:खाच्या प्रसंगाला तोंड देण्याची अंतरिक शक्ति असणे आवश्यक आहे.  म्हणून जीवनामध्ये श्रद्धा ही अशी शक्ति आहे की, ती साधकामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य ढळू न देता उत्साहाने, प्रखर, दुर्दम्य आत्मविश्वासाने साधनेमध्ये, जीवनामध्ये पुढे नेते आणि सतत प्रेरणा देते.

सर्व श्रोत्यांचे रक्षण म्हणजे अशुभ आणि अनर्थकारी संसारापासून रक्षण होय.  हे गणपते !  तूच त्यांना आत्मस्वरूपाचे पारमार्थिक ज्ञान देऊन अनादिअविद्येचा ध्वंस करून मोक्ष प्रदान कर.  तू भक्तांना तुझ्या स्वरूपाप्रमाणे बनव.  थोडक्यात तुझ्या भक्तांना पूर्ण कर, तुप्त कर.  हेच त्यांचे रक्षण आहे.
 

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ –