Tuesday, September 17, 2013

श्रीगणेश – संस्कारांचे हरणकर्ता I Shree Ganesh – Robber of Impressionsपरब्रह्मस्वरूप श्रीगणेश मायोपाधीवर आरूढ होऊन सर्व जीवांच्या हृदयामध्ये सर्वान्तर्यामी स्वरूपाने सन्निविष्ट आहे.  हे जीव अनेक प्रकारची पापपुण्यात्मक कर्म करून रागद्वेषकामक्रोध वगैरे अनंत, अगणित संस्काररूपी संपत्ति संग्रह करतात.  त्यावेळी सर्वान्तर्यामी परब्रह्मस्वरूप श्रीगणेश मायोपाधिरूपी मूषकावर आरूढ होऊन शरणागत आलेल्या भक्तांच्या अंतःकरणातील संग्रह केलेली संस्काररूपी संपत्ति हरण करतो.  म्हणून मूषक हे गणपतीचे वाहन आहे.

प्रथम विषयासक्त आणि स्वतःला कर्ताभोगता म्हणविणाऱ्या नास्तिकवादी जीवाला मायारूढ झालेला अन्तर्यामी परमेश्वर नकळत जीवाच्या अहंकाराला, कर्तृत्वभोगतृत्व बुद्धीला धक्के देतो.  सर्व प्रयत्न करूनही संकटांच्यावर मात करता येत नाही.  त्यामुळे तो अधिकच बेजार, अगतिक, व्याकूळ होतो.

परंतु भगवान त्याच्यावर कृपा करण्यासाठीच त्याला अनेक दुःखांच्या दरीत फेकून देतो.  अनेक संकटांमधून होरपळून काढतो.  यामुळे परमेश्वरच कर्तुमकर्तुम् आहे, मी नाही हे त्याला उमजते.  यामुळे तो आस्तिक होऊन श्रद्धावान होतो.  परमेश्वराचे भजन, पूजन, उपासना करू लागतो.  ही सर्व धार्मिकता ऐहिक विषयांच्या प्राप्तीसाठी, संकटांचे निवारण करण्यासाठी सकाम असते.

काही काळानंतर तोच अन्तर्यामी परमेश्वर भक्ताच्या मनात विकल्प निर्माण करून विचार करायला प्रवृत्त करतो.  भक्ताला विषयांच्या मागणीमध्ये काही रस वाटत नाही.  परमेश्वराजवळ मी किती मागणार?  कारण जे जे मागतो ते सर्व नश्वर, क्षणभंगुर आहे असे दिसते.  कशामाधूनही त्याला अंतरिक शांति, सुख मिळत नाही असे दिसते.  मग मागायचे तरी कशासाठी?  मला काहीच नको.  मला फक्त आत्मसुख, शांति पाहिजे.  बाकी काहीही नको.  अशाप्रकारची वृत्ति प्रयत्न करून किंवा अभ्यासाने निर्माण होत नाही.  तर अन्तर्यामी गणेशच निष्काम भक्तीची इच्छा निर्माण करतो.  ही श्रीगणेशाची कृपा आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010- हरी ॐ

No comments:

Post a Comment