सर्वत्राधीयानोऽपविघ्नो
भवति |
जो
सदासर्वकाळ ‘अथर्वशीर्ष’ म्हणतो तो निर्विघ्न होतो. याचा अर्थ
अथर्वशीर्ष पठण करणाऱ्याला पापकर्म करण्यासाठी परवाना दिलेला नाही. पाप हे
प्रत्यक्ष कर्म नसून त्यामागे असलेली दुष्ट, लुबाडण्याची प्रवृत्ति म्हणजे ‘पाप’
आहे.
अथर्वशीर्षाच्या
पठणाने भक्ताची अदृष्ट शक्तीमध्ये श्रद्धा वृद्धिंगत होते.
श्रीगणेशउपासनेमध्ये निष्ठा वाढून तल्लीनता, तन्मयता वाढते. कर्मानुष्ठानाच्या
वेळी किंवा उपासनेच्या वेळी वृत्ति काही प्रमाणात रागद्वेषरहित होऊन शुद्ध, स्थिर
होते, अधिक सात्त्विक होते. त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. व्यवहार
करतानाही वृत्ति थोडी शुद्ध राहते आणि आपल्या हातून वाईट कर्म किंवा पापकर्म न
होण्याची काळजी घेतो. याप्रमाणे पापकर्म करण्याची वृत्तीच नाहीशी होऊन
सद्वृत्ति प्रधान होते.
तो
श्रीगणेशाचा भक्त आहे ही सतत जाणीव राहिल्याने जे जे काही घडेल ते ते सर्व
श्रीगणेशाची इच्छा किंवा कृपा आहे या दृष्टीने घेत असल्यामुळे त्याची सहनशीलता
वाढते. सर्व घटना आनंदाने आणि प्रसन्न वृत्तीने घेतो. याचा परिणाम म्हणजे
रागद्वेषात्मक विक्षेप कमी होतात. चित्त शुद्ध होते, निष्पाप होते.
यामुळे
चिंतनशील वृत्ति वाढते आणि श्रीगणेश अथर्वशीर्षाच्या गूढार्थावर अखंड, नित्यनिरंतर
चिंतन करतो. त्याला कोणतेच विघ्न राहात नाही. प्रत्येक प्रसंग, इतकेच नव्हे तर
सर्व जीवनच साधनामय होते. तो सर्वच प्रसंग अत्यंत सहजतेने, लीलया, आनंदाने,
प्रसन्न वृत्तीने पाहू शकतो. सहन करू शकतो. तो निर्विघ्न होतो.
"श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 5th Edition, 2010
- Reference: "Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 5th Edition, 2010
No comments:
Post a Comment