योगभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट हे दोन्हीही भिन्न
पुरुष आहेत. कर्मभ्रष्ट पुरुष हा
धर्माधर्म न जाणणारा, आचारधर्म न जाणणारा असतो. तो अविवेकी, अविचारी असून कामांध झालेला असतो. त्यामुळे तो स्वैर, अनियंत्रित, उच्छृंखल होतो.
स्वधर्म आणि सदाचार, सत्कर्माचा त्याग
करुन अनाचार, पापाचरण आणि अधर्माचरण हेच त्याचे जीवन असते. त्यामध्ये त्याला आवड असते. तामसी उपभोगामध्येच तो रममाण होत असतो. त्यामुळे त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होत नाही.
याउलट योगभ्रष्ट पुरुष हा निश्चितपणे
दैवीगुणसंपन्न असून ब्रह्मचर्य, अहिंसा वगैरे तप अनुष्ठान केलेला तपस्वी, तसेच इंद्रियसंयमन, मनःसंयमन करून शमदमादि
संपन्न पुरुष असतो. तो विवेकवैराग्ययुक्त
असून सदाचार, सत्कर्म आणि धर्मानुष्ठान करणारा असतो. परंतु त्याला योगनिष्ठा प्राप्त झालेली नसते म्हणून
तो योगभ्रष्ट आहे असे वाटते. परंतु मृत्युनंतर
त्याला ऊर्ध्वलोकप्राप्ति होते आणि तेथे राहून पुण्यक्षय झाला की, पुन्हा मर्त्यलोकामध्ये
आचारधर्माने संपन्न असलेल्या धार्मिक, पुण्यवान श्रीमंताच्या पोटी जन्माला येतो.
सत्त्वगुणामध्ये
दृढ झालेले सात्त्विक
उपासक ऊर्ध्वलोकात जातात. तेथे दीर्घकाळ राहून पुण्यकर्माचे फळ स्वर्गादि
भोग भोगून, पुण्यकर्मांचा क्षय झाल्यानंतर मर्त्यलोकामध्ये शुचिर्भूत असलेल्या
श्रीमंत लोकांच्या कुळामध्ये जन्माला येतात. म्हणजेच ज्याची योनि, कुळ आणि कर्म शुद्ध आहे
अशा भाग्यवान श्रीमंत कुळामध्ये योगभ्रष्ट पुरुष जन्माला येतो. परंतु कर्मभ्रष्ट पुरुष मात्र पुण्यवान ऊर्ध्वलोकांना
प्राप्त तर होत नाहीत, इतकेच नव्हे तर शुचिर्भूत श्रीमंत कुळामध्येही जन्माला येत
नाही. कदाचित श्रीमंत कुळ असेल, परंतु त्याचे
कुळ आणि आचार शुद्ध नसतील. किंवा कुळ आणि
आचार शुद्ध असतील तर तो श्रीमंत असेलच असे नाही. म्हणून येथे विशेषकरून शुचिर्भूत श्रीमंत कुळ
असे म्हटले आहे.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad
Bhagavad Geeta" by Param
Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd
Edition, December 2002
- हरी ॐ–