Showing posts with label Joy. Show all posts
Showing posts with label Joy. Show all posts

Tuesday, September 3, 2019

योग आणि सुख-दुःख | Yoga and Joy & Grief



दुःखसंयोगरहित असणारी अवस्था म्हणजे योग, हे सांगताना दुःख या शब्दाच्या अनुषंगाने असलेले विषयसुख हे सुद्धा गृहीत आहे.  याचे कारण ज्यावेळी इंद्रियांचा विषयांशी सन्निकर्ष होतो त्यावेळी त्या सन्निकर्षामधून अनुकूल आणि प्रतिकूल अंतःकरणवृत्ति निर्माण होते.  अनुकूल वृत्ति सुखवर्धन करणारी, सुखाची अनुभूति देणारी असते आणि प्रतिकूल वृत्ति दुःखवर्धन करणारी, दुःखाची अनुभूति देणारी असते.  त्यामुळे दुःख हा शब्द आपोआपच सुखाचा निर्देश करतो.  

सुखाशी होणारा संयोग तात्कालिक असल्यामुळे कोणतेही सुख शेवटी दुःखालाच कारण होते म्हणून इंद्रियसन्निकर्षाने प्राप्त होणारे सर्व सुख-दुःख हे दुःखस्वरूपच आहे असे समजावे.  या सुखदुःखाशी होणारा संयोग म्हणजेच संसार होय आणि सुखदुःखाशी होणाऱ्या संयोगाचा वियोग म्हणजे योग होय.

बाह्य सुखदुःखादि प्रसंगांना प्रकाशित न करण्याची अंतःकरणाची जी विशेष अवस्था आहे, त्या अवस्थेला योग असे म्हणावे.  इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग झाला की, अंतःकरणामध्ये अनुकूल-प्रतिकूल वृत्ति निर्माण होऊन सुखदुःखांचा अनुभव येतो.  ज्या अवस्थेमध्ये या सुखदु:खांचा अनुभव येत नाही, म्हणजेच जी सुखदुःखरहित, संकल्पविकल्परहित अवस्था प्राप्त होते, ती अंतरिक अवस्था ही आत्मस्वरूपाची सुस्थिति होय.  याच अवस्थेला ‘योग’ असे म्हणतात.

यामध्ये योगाभ्यासाच्या साधनेने प्रथम सुखदु:खांचा आवेग आणि त्यामागे असणाऱ्या रागद्वेषांचा प्रभाव हळुहळू कमी होतो आणि बाह्य परिस्थिति अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्यामध्ये मन चलबिचल न होता मनाचे संतुलन कायम राहाते.  यामुळे वृत्ति अंतर्मुख होऊन श्रवणादि साधनेमध्ये एकाग्र होते.  त्यानंतर योगाभ्यासाने वृत्ति ब्रह्माकार होते.  कालांतराने दीर्घ अभ्यासाने वृत्ति परिपक्व होऊन ब्रह्मस्वरूप होते.  त्या अवस्थेमध्ये सुखदुःखांशी झालेला संयोग पूर्णपणे नाहीसा होतो.  ही स्वस्वरूपामध्ये राहण्याची जी विशेष अवस्था, त्यालाच योग असे म्हणावे.  त्यालाच योगारूढ असे म्हणतात.  ही मनाची अवस्था नसून स्वस्वरूपाची स्थिति आहे.  अशी ही योगाची परमोच्च अवस्था प्राप्त झाली म्हणजे साधकाला अखंड नित्य आत्मतृप्ति मिळते.

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ –


Saturday, February 25, 2017

श्रीराम म्हणजे कोण ? | Who is Shree Rama ?


रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे.  प्रभु श्रीरामाला राज्याभिषेक झाल्यानंतर हनुमान प्रभु रामचंद्र व सीतामातेला नतमस्तक होतो.  त्यावेळी सीता हनुमंताला उपदेश देते –
रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम् |  सर्वोपाधिविनिर्मुक्तं सत्तामात्रमगोचरम् ||
हे हनुमंता !  ‘श्रीराम’ म्हणजे एखादी मर्त्य व्यक्ति नाही, एक शरीरही नाही, किंबहुना ‘श्रीराम’ हा माझा केवळ पति नाही.  तर ‘श्रीराम’ हा स्वतःच सच्चिदानंदस्वरूप असणारा, सर्व शरीरांच्याही अतीत आहे.  श्रीराम म्हणजे सर्वांच्यामध्ये सत्तास्वरूपाने अंतर्बाह्य अनुस्यूत असणारे तत्त्व आहे.  श्रीराम हा स्वतःच अंतर्यामी स्वरूप आत्माराम आहे.

श्री समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात –
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा |  नभाचे परी व्यापकू जाण तैसा ||
सदा संचला येत ना जात कांहीं |  तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ||
प्रभु श्रीराम हा सर्वव्यापी, सर्वांतर्यामी आहे.  परंतु राम सर्वांच्या आत असूनही दुर्दैवाने आपल्याला ‘तो’ अनुभवायला येत नाही.  म्हणू तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनाचा अनुभव सांगत असतो – ‘सगळं काही आहे हो !  जीवनामध्ये मी सर्व काही प्राप्त केलेले आहे.  पण सगळं असूनही जीवनात काही राम नाही.’  आपल्या जीवनातून राम निघून गेलेला आहे.

राम म्हणजेच आनंद !  राम म्हणजेच जीवनामध्ये असणारा अर्थ, जीवनामध्ये असणारे सार किंवा रहस्य होय. आपल्या जीवनामध्ये बहिरंगाने अनेक विषय, उपभोग आहेत. आपण स्वकर्तृत्व आणि प्रयत्नाने सर्व काही प्राप्त करतो.  पैसा, संपत्ति, मान-सन्मान, प्रतिष्ठा, विषय, उपभोग आहेत, सभोवती पती, पत्नी, मुले, नातू, आप्तस्वकीय, बांधव, मित्रपरिवार सर्व काही आहे.  परंतु दुर्दैवाने जीवनामधील आनंद हरविल्यासारखा वाटतो.  म्हणजेच जीवनामधील ‘राम’ निघून गेल्यासारखा वाटतो.  वास्तविक ‘राम’ हा बाहेर नाही, तर आपल्याच आत, अंतरंगामध्ये आहे.

संत ज्ञानदेव सुद्धा म्हणतात – तैसा हृदयामध्ये मी रामु |  सर्व सुखाचा आरामु ||
“सर्व प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये मी, हा ‘राम’ आनंदस्वरूपाने, चैतन्यस्वरूपाने सन्निविष्ट आहे.”  म्हणून राम हा स्वतःच आनंदस्वरूप आहे.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "Dasharathi Ram
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, March 22, 2016

सुख-दुःखांचे अनुभव का येतात ? | Why We Experience Joy & Grief ?


इंद्रियांचा बाह्य विषयांशी संयोग येतो त्यावेळी इंद्रिये कोणताही विषय असो, त्या विषयाच्या स्वभावप्रमाणे शीत-उष्ण वगैरे अनुभव देतात.  परंतु हे अनुभव आपल्या मनात प्रत्येक वेळी दोन प्रकारच्या प्रतिक्रिया निर्माण करतात.  कधी सुखकारक, कधी दुःखकारक, कारण एकच वस्तु स्थानकालभेदाप्रमाणे अनुकूल ठरते तर भिन्न काळात प्रतिकूल ठरते.  थंड पेय उन्हाळ्यामध्ये सुखकारक असते, परंतु थंडीमध्ये मात्र दुःखकारक ठरते.  त्याउलट उष्ण पेय थंडीमध्ये खूप आनंद देणारे होते तर उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणारे होते.

याचाच अर्थ इंद्रियांचा विषयांशी झालेला संयोग प्रत्यक्ष सुखदुःखांचा अनुभव देत नाही.  इंद्रियांचे कार्य फक्त बाह्य विषयांचे जसेच्या तसे ग्रहण करणे होय. सुखदुःखाला आपले मनच कारण आहे.

तो प्रत्येक प्रसंग अनुकूल, प्रतिकूल निर्माण करतो, कारण प्रत्येक प्रसंग, अनुभव हा स्वतःनेच निर्माण केलेल्या कल्पनांच्यामधून तूलानात्मक दृष्टीने पाहातो.  मला ग्रीन लेबलचा चहा आवडत असेल तर त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही चहा मला समाधान देत नाही.  हा प्रत्येकाचा अनुभव आहे.  यामधून तो मनात अनेक प्रकारची द्वंद्वे निर्माण करून दुःखांचा, यातनांचा अनुभव घेतो.  म्हणून हे सर्व अनुभव प्रत्यक्ष विषय देत नसून स्वतःचे राग-द्वेष देत असतात.  विषय फक्त निमित्तमात्र असतात.

म्हणून साधकाने विषयांच्या किंवा प्रसंगांच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या रागद्वेषात्मक प्रतिक्रिया कमी करण्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  रागद्वेषांच्या द्वंद्वांच्या आहारी न जाता मन द्वंद्वरहित करून संतुलित ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे.  म्हणजेच अशा प्रकारचे मन तयार केले पाहिजे की, बाह्य विषय, प्रसंग, अनुभव मनाला विचलित, अस्वस्थ करणार नाहीत.  यामुळे रागद्वेषांचा मनावर होणारा परिणाम कमी होईल.  मन अधिक अंतर्मुख होऊन चिंतनशील होईल.  ही साधना करणे आवश्यक आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ –