Tuesday, September 21, 2021

शांति आणि योगसाधना | Silence and Yog Sadhana

 
नीरव शांतस्वरूप आपल्या आतच आहे.  परंतु बहिर्मुख मनामुळे ते असूनही अनुभवायला येत नाही.  त्यासाठी सूर्यास्ताप्रमाणे मनामधील सर्व बहिर्मुख वृत्ति हळुहळू निवृत्त केल्या तर मनामध्येच असलेली परंतु मनाच्याही अतीत असलेली शांति अनुभवायला मिळेल.  सर्व वृत्तींचा निरोध करून मन निवृत्त करणे आणि स्वस्वरूपामध्ये स्थिर करण्यासाठीच योगसाधना आहे.

 

याचा अर्थ शांति बाह्य विषयांमध्ये नाही किंवा घटपटादिप्रमाणे एखादा विषय नाही.  ती आपल्या आतच आहे.  ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावर एकामागे एक समुद्राच्या लाटा सतत येत असतात, त्यामुळे आपल्याला खळखळाट दिसतो.  इतकेच नव्हे, तर एखादा मनुष्य पोहायला लागला तर सतत आघात होणाऱ्या लाटांच्यामुळे हेलकावे खात राहातो.  परंतु त्याच लाटांच्या खाली समुद्राच्या तळाशी गेले तर तेथे लाटांचे आघात होत नाहीत, हेलकावे नाहीत.  याउलट आपल्याला नीरव शांत स्थिति अनुभवायला येते.  त्याचप्रमाणे आपण सर्व मनाच्या अवस्थेमध्येच जगत आहोत.  त्यामुळे, लाटांच्याप्रमाणे मनामध्ये निर्माण होणाऱ्या विषयांच्या वृत्ति, रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचे आघात सतत होत असतात.  असा एकही क्षण नाही की, त्यावेळी रागद्वेष नाहीत, द्वंद्व नाहीत, विक्षेप नाहीत.  या सर्व ऊर्मींच्यामुळे आपण मनाबरोबर हेलकावे अनुभवतो.  आपल्यामधील शांति, सुख हरवून बसतो.  हेच मन स्वरूपाच्या शांतीपासून वंचित करते.

 

म्हणून जर आपल्याला खरोखरच नीरव शांतस्वरूप अनुभवायचे असेल तर मनानेच मनाच्या साहाय्याने मनाच्या अतीत जाण्याचा अभ्यास केला पाहिजे.  मनाच्या अंतरंगामध्ये शांतीचा शोध घेतला पाहिजे.  जसे आपण अंतरंगामध्ये आत जावू त्या प्रमाणामध्ये मनामध्ये वर वर दिसणारे सर्व विक्षेप, संकल्प-विकल्प, द्वंद्व, रागद्वेषांचे परिणाम कमी कमी होतील आणि मन तणावरहित होईल.  मनानेच निर्माण केलेले विचारांचे दडपण कमी होईल.  हळूहळू शांतीचा उत्कर्ष होईल.  यासाठीच योगसाधना आहे.  थोडक्यात मनानेच मनातील सर्व वृत्तींचा त्याग करून मनाने निर्माण केलेल्या सर्व काल्पनिक बंधनांच्यामधून मुक्त होऊन स्वस्वरूपाच्या नीरव शांत स्थितीमध्ये स्वस्थ राहाणे हीच योगाची परमोच्च अवस्था आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ