Showing posts with label Society. Show all posts
Showing posts with label Society. Show all posts

Tuesday, January 24, 2023

मर्यादा आणि नियम का ? | Why Society Needs Regulation ?

 



कलियुगामधील भौतिकवादी, नास्तिकवादी झालेला मनुष्य पूर्णतः अधःपतित झाला.  नास्तिकवाद हे बुद्धीचे लक्षण नसून खरे तर जडबुद्धीचे लक्षण आहे.  कारण नास्तिकवादामध्ये बुद्धीला दृश्याच्या अतीत असणारे काहीही समजत नाही.  त्यामुळे सत्ययुगाचा क्षय झाल्यानंतर, सत्कर्मे क्षीण झाल्यानंतर आता या जीवांना कसा उपदेश द्यावा ?  असा सर्व महर्षींन्नी विचार केला व त्यावर उपाय शोधून काढला.  आपणा सर्वांना जे जे नियम सांगितले जातात, ते या सर्व ऋषिमुनींनी घालून दिलेले नियम आहेत.  आजकालची तरुण पिढी प्रश्न विचारते की, आपल्याच हिंदु धर्मामध्ये इतके नियम, इतके उपवास, इतकी व्रत-वैकल्ये कशासाठी आहेत ?  याचे उत्तर एकच - मर्यादानियमाय च ।  मनुष्याच्या आचारावर, वागण्या-बोलण्यावर कोठेतरी मर्यादा याव्यात, म्हणून नियम सांगितले जातात.

 

जसे व्यवहारामध्ये वाहतुकीचे नियम सुद्धा आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आहेत.  तसेच आपल्या संस्कृतीमध्ये सर्व नियम, मर्यादा या मनुष्याच्या स्वैर व पशुतुल्य प्रवृत्तीवर नियमन करण्यासाठी सांगितल्या आहेत.  चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक सण व परंपरा, कुळधर्म व कुळाचार, नित्य व नैमित्तिक कर्मे, उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो.  या प्रत्येक सणाच्या मागे आणि परंपरेमागे काहीतरी विशिष्ट अर्थ व प्रयोजन आहे.  आपल्या धर्मशास्त्राने कोणतीही गोष्ट किंवा कोणताही नियम निरर्थक सांगितलेला नाही.

 

वेदांनी मनुष्याचे अधःपतनापासून रक्षण करण्यासाठी त्याला विविध कर्मांचे विधान दिले.  वेद आणि ऋषि-मुनींनी तपाचरण, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, उपवास, उपासना, परंपरा, अनेक एकादशी-प्रदोषादि व्रते, अशी अनेक कर्मे सांगितली.  याचबरोबर श्राद्धादि क्रियांचे सुद्धा विधि दिले.  पिंडदान, श्राद्ध, स्वाहा, स्वधा या सर्व क्रिया आवश्यक आहेत.  हे सर्व मनुष्याने केलेच पाहिजे.  यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश असेल तर मनुष्याला हिंसादि भयंकर क्रूर कर्मापासून निवृत्त करून त्याला चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त करावे.  मनुष्याच्या इंद्रियांच्यावर, मनावर आणि दुष्कर्मांच्यावर नियमन व्हावे.  हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सर्व ऋषींनी क्रियाक्रम, विधान, मर्यादा व नियम घालून दिले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ–




Tuesday, July 4, 2017

ज्ञानी राजा, उन्नत समाज | Wise Ruler, Progressive Society


इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेSब्रवीत् ||   (श्रीमद् भगवद्गीता अ. ४-०१)
मी हा अविनाशी योग कल्पारंभी विवस्वानाला, विवस्वानाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितला.

श्रेष्ठ ज्ञानाने युक्त असलेले राजे उदात्त ध्येयाने प्रेरित होवून निस्पृह होतात आणि मानवजातीच्या कल्याणासाठी त्यागमय निःस्वार्थ जीवन जगतात.  ते समाजाला प्रेरणा व स्फूर्ति देतात.  राजे लोकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे धर्माचे रक्षण करणे.  धर्माचे रक्षण म्हणजे केवळ मंदिरांचे रक्षण नाही, कारण धर्म हा बाह्य विषयांवर आश्रित नसून मनुष्यावर आश्रित आहे.

त्यामुळे जे धर्माचे अनुसरण करून रक्षण करतात, त्या धर्मनिष्ठ लोकांचे रक्षण करणे हेच राजाचे प्रमुख कर्तव्य आहे, कारण धर्मनिष्ठ विद्वान लोक समाजामध्ये धर्मप्रचार आणि प्रसार, कर्तव्यपारायणता, श्रेष्ठ नीतिमूल्ये आणि सद्गुणांची जोपासना करतात.  समाजाला उदात्त ध्येयाने प्रेरित करतात.  त्यामुळे समाजामध्ये श्रेष्ठ नीतिमूल्यांचे जीवन निर्माण होवून सुसंगति, सुसूत्रता निर्माण होते.  म्हणून समाजाचे आधारस्तंभ असलेल्या श्रेष्ठ विद्वान पुरुषांचे रक्षण करणे हेच कर्तव्य आहे.

याप्रकारे समाजामध्ये विवेकी, क्षत्रिय आणि विद्वान ब्राह्मण यांचा योग्य समन्वय झाला तर तो समाज ध्येयवादी, सुसंस्कृत होतो.  म्हणून अशा प्रकारची दृष्टि असलेला, प्रजेचा हितकर्ता, प्रजेसाठी जगणारा प्रजाहितदक्ष राजा असेल तर समाजाची उन्नति होते.  राजाला धर्माचे अधिष्ठान असेल व ब्राह्मणांना राजाचा आश्रय असेल तर सर्व समाज सुरळीत चालेल.  म्हणून याठिकाणी भगवंतांनी ही दृष्टि लक्षात ठेवून क्षत्रिय परंपरा सांगितलेली आहे.  इतकेच नव्हे तर, हे दिव्य ज्ञान भगवंतांनी रणभूमीवर सर्वश्रेष्ठ अजिंक्य धनुर्धर अर्जुनाला दिलेले आहे.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ –


Tuesday, September 8, 2015

व्यक्तिगत चातुर्वर्ण्य व्यवस्था | Personal Pre-Dispositions


व्यक्तिगत स्थारावारही चातुर्वर्ण्य व्यवस्था दिसते.  कोणताही मनुष्य चोवीस तास एकच वर्णाचा राहू शकत नाही.  दैनंदिन जीवनातही आपण दिवसाचा काही काळ ब्राह्मण, काही काळ क्षत्रिय तर काही काळ वैश्य आणि शूद्र असतो.  प्रत्येक मनुष्य हा गुणप्राधान्याने या चारही वर्णांचे अनुसरण करतो.

प्रत्येक जण हा स्वभावाला वश असतो.  जन्माने प्राप्त झालेली जात ही मनाची वृत्ति किंवा मनुष्याचे कर्म ठरवीत नाही.  जात किंवा कर्म बदलून माणूस बदलू शकत नाही.  मनुष्य कोणते कर्म करतो यापेक्षा ते कसे करतो, याला अधिक महत्व आहे.  बहिरंगाने श्रेष्ठ असणाऱ्या कर्मामागे राग, द्वेष, अहंकार असेल तर ते निकृष्ठ होईल आणि याउलट झाडू मारण्यासारख्या बहिरंगाने निकृष्ठ असणाऱ्या कार्मामागे सेवेचा, भक्तीचा शुद्ध भाव असेल तर ते कर्म सर्वोत्कृष्ट होऊ शकते.  इतकेच नव्हे, तर ते कर्म साधकाला अंतःकरणाच्या शुद्धीचे साधन होऊन मोक्षाचेही साधन होऊ शकते.  प्रत्यक्ष कोणतेही कर्म हे उत्कृष्ट किंवा निकृष्ट नाही तर ते कोणत्या भावाने केले जाते, यावरच त्या कर्माची श्रेष्ठता अवलंबून आहे.

सर्व संत हे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांच्या कर्मांनी, गुणांनी ते श्रेष्ठ ठरले.  म्हणूनच प्रत्येकाने तमोगुण आणि रजोगुणाचा प्रभाव कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  म्हणजेच, शूद्रापासून क्रमाने ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  याचा अर्थच प्रत्येक मनुष्य – मग तो कोणत्याही वर्णाचा, जातीचा, पंथाचा असो, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब कोणताही असो, तो गुणवृत्तीने ब्राह्मण होऊ शकतो.  प्रत्येक मनुष्याला ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

यावरून सिद्ध होत की, चातुर्वर्ण्य हा वस्तुतः समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी अथवा समाजाच्या अधःपतनासाठी सांगितलेला नसून प्रत्येक व्यक्तीच्या उद्धारासाठी सांगितलेला आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ –

Tuesday, August 4, 2015

पुरुषसूक्ताचे महात्म्य | Significance of Purushsuktam


वेदांच्यामध्ये अनेक देवतांची स्तुति आहे.  त्यामुळे त्या त्या देवतांची सूक्ते आहेत.  त्यामध्ये पुरुष म्हणजेच साक्षात ब्रह्मस्वरूपाची स्तुति असणारे अत्यंत प्रसिद्ध पुरुषसूक्त सोळा ऋचांचे आहे.  सूक्त याचा अर्थ स्तवन, स्तुति ! सूक्तं – शोभनं उक्तम् | या सोळा ऋचांमधून श्रुति पुरुषाची म्हणजेच ब्रह्माची स्तुति करते.  ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांच्यामध्ये पुरुषसूक्त अंतर्भूत होते.

सर्व वेदात याला महत्व आहे, कारण यात श्रुति केवळ निर्गुण स्वरूप न सांगता सगुण व निर्गुण दोन्हीही स्वरूप प्रतिपादित करते.  तसेच सर्व वेदांचा सिद्धांत ‘तत् त्वम् असि |’  देखील प्रतिपादित करते.

पुरुषसूक्तामध्ये प्रत्येक मनुष्याला वैयक्तिक जीवनाच्या विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे.  त्याचबरोबर एक मनुष्य म्हणून ज्यावेळी आपण या विश्वात, समाजात, निसर्गात जीवन जगतो त्यावेळी प्रत्येकाचा अधिकार, कर्तव्ये, माणसा-माणसांच्यामधील परस्परसंबंध, मनुष्याची खऱ्या अर्थाने उत्क्रांती व त्यासाठी असणारी साधना यामध्ये सांगितलेली आहे.

मनुष्य, निसर्ग यात काही संबंध, सूत्र आहे. ज्ञात, अज्ञात घटकांमुळेच माणूस जीवन जगतो.  तेव्हा त्याचे कर्तव्य काय आहे ?  स्वतःला दिलेल्या बुद्धीच्या साहाय्याने त्याने प्रगति कशी करावी व परमोच्च अवस्थेला कसे जावे ?  याचे मार्गदर्शन तसेच, व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजविकासाचेही येथे मार्गदर्शन केलेले आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ –