Tuesday, January 24, 2023

मर्यादा आणि नियम का ? | Why Society Needs Regulation ?

 



कलियुगामधील भौतिकवादी, नास्तिकवादी झालेला मनुष्य पूर्णतः अधःपतित झाला.  नास्तिकवाद हे बुद्धीचे लक्षण नसून खरे तर जडबुद्धीचे लक्षण आहे.  कारण नास्तिकवादामध्ये बुद्धीला दृश्याच्या अतीत असणारे काहीही समजत नाही.  त्यामुळे सत्ययुगाचा क्षय झाल्यानंतर, सत्कर्मे क्षीण झाल्यानंतर आता या जीवांना कसा उपदेश द्यावा ?  असा सर्व महर्षींन्नी विचार केला व त्यावर उपाय शोधून काढला.  आपणा सर्वांना जे जे नियम सांगितले जातात, ते या सर्व ऋषिमुनींनी घालून दिलेले नियम आहेत.  आजकालची तरुण पिढी प्रश्न विचारते की, आपल्याच हिंदु धर्मामध्ये इतके नियम, इतके उपवास, इतकी व्रत-वैकल्ये कशासाठी आहेत ?  याचे उत्तर एकच - मर्यादानियमाय च ।  मनुष्याच्या आचारावर, वागण्या-बोलण्यावर कोठेतरी मर्यादा याव्यात, म्हणून नियम सांगितले जातात.

 

जसे व्यवहारामध्ये वाहतुकीचे नियम सुद्धा आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आहेत.  तसेच आपल्या संस्कृतीमध्ये सर्व नियम, मर्यादा या मनुष्याच्या स्वैर व पशुतुल्य प्रवृत्तीवर नियमन करण्यासाठी सांगितल्या आहेत.  चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक सण व परंपरा, कुळधर्म व कुळाचार, नित्य व नैमित्तिक कर्मे, उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो.  या प्रत्येक सणाच्या मागे आणि परंपरेमागे काहीतरी विशिष्ट अर्थ व प्रयोजन आहे.  आपल्या धर्मशास्त्राने कोणतीही गोष्ट किंवा कोणताही नियम निरर्थक सांगितलेला नाही.

 

वेदांनी मनुष्याचे अधःपतनापासून रक्षण करण्यासाठी त्याला विविध कर्मांचे विधान दिले.  वेद आणि ऋषि-मुनींनी तपाचरण, अनुष्ठाने, व्रत-वैकल्ये, उपवास, उपासना, परंपरा, अनेक एकादशी-प्रदोषादि व्रते, अशी अनेक कर्मे सांगितली.  याचबरोबर श्राद्धादि क्रियांचे सुद्धा विधि दिले.  पिंडदान, श्राद्ध, स्वाहा, स्वधा या सर्व क्रिया आवश्यक आहेत.  हे सर्व मनुष्याने केलेच पाहिजे.  यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश असेल तर मनुष्याला हिंसादि भयंकर क्रूर कर्मापासून निवृत्त करून त्याला चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त करावे.  मनुष्याच्या इंद्रियांच्यावर, मनावर आणि दुष्कर्मांच्यावर नियमन व्हावे.  हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सर्व ऋषींनी क्रियाक्रम, विधान, मर्यादा व नियम घालून दिले.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ