Showing posts with label Personality. Show all posts
Showing posts with label Personality. Show all posts

Tuesday, August 4, 2015

पुरुषसूक्ताचे महात्म्य | Significance of Purushsuktam


वेदांच्यामध्ये अनेक देवतांची स्तुति आहे.  त्यामुळे त्या त्या देवतांची सूक्ते आहेत.  त्यामध्ये पुरुष म्हणजेच साक्षात ब्रह्मस्वरूपाची स्तुति असणारे अत्यंत प्रसिद्ध पुरुषसूक्त सोळा ऋचांचे आहे.  सूक्त याचा अर्थ स्तवन, स्तुति ! सूक्तं – शोभनं उक्तम् | या सोळा ऋचांमधून श्रुति पुरुषाची म्हणजेच ब्रह्माची स्तुति करते.  ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांच्यामध्ये पुरुषसूक्त अंतर्भूत होते.

सर्व वेदात याला महत्व आहे, कारण यात श्रुति केवळ निर्गुण स्वरूप न सांगता सगुण व निर्गुण दोन्हीही स्वरूप प्रतिपादित करते.  तसेच सर्व वेदांचा सिद्धांत ‘तत् त्वम् असि |’  देखील प्रतिपादित करते.

पुरुषसूक्तामध्ये प्रत्येक मनुष्याला वैयक्तिक जीवनाच्या विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे.  त्याचबरोबर एक मनुष्य म्हणून ज्यावेळी आपण या विश्वात, समाजात, निसर्गात जीवन जगतो त्यावेळी प्रत्येकाचा अधिकार, कर्तव्ये, माणसा-माणसांच्यामधील परस्परसंबंध, मनुष्याची खऱ्या अर्थाने उत्क्रांती व त्यासाठी असणारी साधना यामध्ये सांगितलेली आहे.

मनुष्य, निसर्ग यात काही संबंध, सूत्र आहे. ज्ञात, अज्ञात घटकांमुळेच माणूस जीवन जगतो.  तेव्हा त्याचे कर्तव्य काय आहे ?  स्वतःला दिलेल्या बुद्धीच्या साहाय्याने त्याने प्रगति कशी करावी व परमोच्च अवस्थेला कसे जावे ?  याचे मार्गदर्शन तसेच, व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजविकासाचेही येथे मार्गदर्शन केलेले आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006



- हरी ॐ –

Tuesday, August 20, 2013

मानसिक प्रगति | Mental Development



मनुष्याच्या शरीर व इंद्रियांचा विकास निसर्गनियमाप्रमाणे आपोआपच होत असतो.  जन्मल्यापासून आजपर्यंत शरीरामध्ये, इंद्रियांमध्ये हळुहळू बदल झालेला आहे.  त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नाही.  मात्र या स्थूल शरीराच्या आत असणारे जे मन आहे, त्याचा मात्र प्रयत्नपूर्वक विकास करावा लागतो.  मनाचा विकास करण्यासाठी साधनही मनच आहे.  म्हणून तरी भगवान निश्चयपूर्वक सांगतात – उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |

मानाने मनाच्या साहाय्यानेच मनाचा विकास करावा. यासाठी मनाची दृढ संकल्पशक्ति निर्माण करावी.  आपल्या मनामध्ये आपण अनेक संकल्प करतो.  पण एक संकल्प केला रे केला की, आपलेच मन त्यावर विकल्प निर्माण करते.  छोटेसे उदाहरण घ्यावयाचे झाले तर आपण ठरवितो की “ उद्यापासून रोज सकाळी लवकर उठायचे. ” दुसऱ्याक्षणी आपल्या मनामध्ये विचार येतो की “ आपल्याला खरोखरच उठणे जमेल कां ?  आपल्या तब्येतीला झेपेल का ?  त्यापेक्षा लवकर न उठलेलेच बरे ! ”  
 
याप्रकारे आपलेच मन आपल्या संकल्पाविरुद्ध विकल्प, शंका, संशय निर्माण करते.  आपल्या संकल्पाची पूर्ण शक्ति विकाल्पामुळे खच्ची होते.  म्हणूनच आजकाल “ हे मला येत नाही, जमत नाही, माहीत नाही ” अशी उत्तरे ऐकावयास येतात.  यालाच न्यूनगंड (Inferiority Complex) असे म्हणतात.

हा नकारात्मक विचार (negative thinking), न्यूनगंड मनातून प्रथम काढून टाकला पाहिजे.  जोपर्यंत नकारात्मक विचार आहेत, तोपर्यंत मनुष्य विकास किंवा प्रगति करू शकत नाही.  असे विचार मनुष्याला सुखाने जगू देत नाहीत.  त्यामुळे जीवनामधील उत्साह, उमेद कमी होते.  मनामधील हे विकल्प कमी करण्यासाठीच जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन (positive thinking) आत्मसात केला पाहिजे.  यालाच आत्मविश्वास (self confidence) असे म्हणतात.


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  सप्टेंबर २०११
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, September 2011



- हरी ॐ –


Tuesday, August 13, 2013

प्रकाशमय जीवनाकडे | Towards a Bright Life



इंग्रजी वाङ्मयामध्ये थोर तत्त्वज्ञ प्लेटोने सांगितलेली एक गोष्ट आहे.  एका प्रचंड मोठ्या गुहेमध्ये एक आदिवासी जमात पिढ्यान् पिढ्या राहत होती.  अंधारामध्येच अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि काळाच्या पडद्याआड गेल्या.  त्यांना प्रकाशाची यत्किंचितही कल्पना नव्हती.

त्यांच्यामध्येच एक तरुण मुलगा “ गुहेच्या बाहेर काय असेल ? ” हे पाहण्यासाठी गुहेच्या बाहेरच्या दिशेने चालत राहिला.  पुढे-पुढे सातत्याने दीर्घकाळ गेल्यानंतर गुहेच्या तोंडाशी आल्यावर त्याला अंधारापेक्षा काहीतरी वेगळे दिसले.  तो प्रकाशकिरणांचा झोत पाहून त्याला अत्यानंद झाला.  तो उड्या मारू लागला.  त्याच आनंदामध्ये पुन्हा गुहेमध्ये येऊन त्याने आपल्या आप्तबांधवांना प्रकाशाचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला.  परंतु युगानुयुगे अंधारात राहिलेल्या त्या आदिवासींना प्रकाशाची कल्पनाच सहन झाली नाही.  त्यांनी त्या तरुण मुलाला मारून टाकले.

पुन्हा काही काळ लोटल्यानंतर दोन-तीन मुलांनी असाच प्रयत्न केला.  त्यांना ही प्रकाशाचा शोध लागला.  त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुहेमधील अन्य आदिवासींना परोपरीने समजावून दिले की, “या गुहेच्या बाहेर या !  अंधारापेक्षाही एक वेगळे असे प्रकाशमय जीवन आहे. ”  त्यानंतर गुहेच्या बाहेर येऊन सर्वांनी प्रकाशाचा अनुभव घेतला व त्यांचे म्हणणे मान्य केले.  ही एक छोटीसी बोधप्रद कथा आहे.

याप्रमाणेच मनुष्य जीवनाचा विकास व्हावयाचा असेल तर प्रथम आपण आपल्या मनाच्या कल्पनांच्यामधून बाहेर आले पाहिजे.  मनामधील राग-द्वेष, स्वार्थ, लोभ, कूपमंडुक वृत्ति, अहंकार-ममकार या क्षुद्र मनोवृत्तींचा त्याग केला पाहिजे, कारण याच वृत्ति मनुष्याच्या मनाला पुन्हा-पुन्हा खाली खेचतात, विकास होऊ देत नाहीत.  आपण अज्ञानामधून बाहेर येऊन स्वतःच्या मनाच्या कप्प्यांमधून बाहेर पडलो तरच प्रकाशमय जीवनाचा अनुभव घेऊ शकतो.


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  सप्टेंबर २०११
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, September 2011
 
  
- हरी ॐ –