Tuesday, March 22, 2022

शास्त्रविहित आणि शास्त्रहीन पुरुषार्थ | Pro and Anti Shaastra Efforts

 



शास्त्रविहित पुरुषार्थ आणि शास्त्रहीन पुरुषार्थ, असे पुरुषार्थाचे दोन प्रकार आहेत.  त्यांपैकी शास्त्रहीन पुरुषार्थ अनर्थाला कारण होतो, तर शास्त्रविहित पुरुषार्थ परमार्थाचे साधन होतो.  येथे शास्त्रीय - शास्त्रविहित पुरुषार्थ म्हणजेच धर्माचरण होय आणि अशास्त्रीय पुरुषार्थ म्हणजे अधर्म होय.  हेच सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर म्हणता येईल की, चालल्या कर्माचे चांगले फळ मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.  आपण ज्या प्रतीचे बीज पेरू त्याप्रमाणेच धान्य उगवते.  तसेच "जसे कर्म - तसे फळ" हा लोकप्रसिद्ध न्याय आहे.

 

मनुष्याला कर्म तर केलेच पाहिजे.  करावे किंवा करू नये, यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य नाही.  कर्माशिवाय मनुष्य एक क्षणभरही राहू शकत नाही.  मात्र कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये यामध्ये स्वातंत्र्य आहे.  जन्मल्यापासून मृत्युपर्यंत मनुष्याला कोणते ना कोणते तरी कर्म हे केलेच पाहिजे.  कर्म करायचेच असेल तर वाईट करण्यापेक्षा चांगले कर्म करावे.  कर्म चांगले की वाईट हे ठरविताना शास्त्रालाच प्रमाण मानावे.  कार्य-अकार्य, धर्म-अधर्म यांचा न्यायनिवाडा करताना वेदशास्त्र हेच प्रमाण असून मनुष्याने शास्त्रविहित कर्मच करावे.

 

पुष्कळ वेळेला मनुष्याला शास्त्रविधान माहीत असते.  चांगले-वाईट कर्मही कळत असते.  परंतु ज्यावेळेस चित्तामध्ये काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर-स्वार्थ असे विकार उत्पन्न होतात, त्यावेळी मनुष्य सत्कर्मांचा त्याग करून अधर्मामध्ये प्रवृत्त होतो.  अन्याय, भ्रष्टाचार, हिंसा, व्यभिचार अशी भयंकर कृत्ये त्याच्या हातून घडतात.  म्हणून मनुष्याचा विवेक सतत जागृत पाहिजे.

 

वेद मनुष्याला अनेक आदेश देतात - मातृदेवो भव |  पितृदेवो भव |  आचार्यदेवो भव |  अतिथिदेवो भव |  स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् |  देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् |  सत्यं वद |  धर्मं चर |  हिंसा न कुर्यात् |  कलजं न भक्षयेत् |  सुरां न पिबेत् |  अशा सर्व वेदाज्ञा मनुष्याने पालन केल्या तर याच धर्माचरणाच्या अनुष्ठानाने साधकाचे मन दैवीगुणसंपन्न, शुद्ध होऊन त्याला क्रमाने मोक्षप्राप्ति होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ