Tuesday, February 22, 2022

दैवावर मात | Overcoming the Fate

 



श्रीवसिष्ठ मुनि सांगतात की, या वर्तमान जन्मामध्ये मनुष्याने जर विशेष प्रयत्न केला, दृढ अभ्यास, विवेक आणि उत्साह यांनी युक्त होऊन सातत्याने पुरुषार्थ केला तर मनुष्य आपल्या मागच्या जन्मातील दैवही नाहीसे करू शकतो.  जेथे मेरू पर्वत सुद्धा नष्ट करता येतो, तेथे प्राक्तनाची काय कथा ?  बलवान पुरुषार्थ दैवावर मात करू शकतो, असेच येथे वसिष्ठांना सूचित करावयाचे आहे.

 

वस्तुतः नियमाप्रमाणे दैव बदलणे कोणालाही शक्य नाही.  पण तरीही वसिष्ठांनी येथे असे सांगितले असेल तर त्यामागे काही अर्थ आहे.  आपल्या जीवनात काही वेळेस खूप वाईट प्रसंग आले तर आपण 'दैव' म्हणून निराश होतो.  एकामागून एक प्रतिकूल प्रसंग आले, सगळ्या बाजूंनी विरोध व संकटेच दिसायला लागली की, मनुष्याचे धैर्य खचते.  "माझे नशीबच वाईट" असे म्हणून तो निष्क्रीय व्हायला लागतो.  पुरुषार्थाचा, प्रयत्नांचा त्याग करतो.  स्वस्थ बसून राहतो.  त्यामुळे वर्तमान पुरुषार्थाचा त्याग केल्यामुळे त्याचे भविष्यकाळातील प्रारब्धही नीट घडू शकत नाही.

 

अशा निष्क्रीय बनलेल्या मनुष्याला वसिष्ठ मुनि येथे चेतावणी देतात आणि सांगतात की, अरे !  आताचे दैव कितीही भयंकर असेल तरी एका बाजूला ते भोगत असताना दुसऱ्या बाजूला तुझ्या हातात वर्तमानकाळाचा पुरुषार्थ आहे.  तू ऊठ, दृढ अभ्यास कर, योग्यायोग्याचा विचार कर आणि उत्साहाने सत्कर्मामध्ये प्रवृत्त हो.  कारण सत्कर्म तुझे भवितव्य उज्ज्वल करणार आहे.  तुझे कर्म तू इतके उत्कृष्ठ आणि उदात्त कर की, त्यापुढे आत्ताचे वाईट प्रारब्धही निष्प्रभ ठरावे !

 

आत्ता उत्तम पुरुषार्थ करून वाईट प्रारब्धाचा प्रभाव नष्ट करण्यास मनुष्य समर्थ आहे.  या जगात अशक्य असे काहीच नाही.  मेरू पर्वतासारखा महाकाय पर्वतही मनुष्याने ठरविले तर मुळासकट उपटून टाकता येतो.  त्यामुळे वाईट दैवाचा म्हणजे वाईट दैवाच्या प्रभावाचा नाश आत्ताच्या उत्तम पुरुषार्थाने करता येतो.  यामध्ये कोणताही संदेह नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ