साधकाच्या जीवनामध्ये शास्त्र, गुरु व स्वतःचे
प्रयत्न या तीन गोष्टी आवश्यक आहेत. शास्त्र
व गुरुवाक्य हेच साधकासाठी प्रमाण आहे. त्यानुसारच
साधकाने नित्यनिरंतर प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक साधनेमध्ये प्रवृत्त झाले पाहिजे.
त्यासाठी शास्त्र व गुरूंच्यावर नितांत श्रद्धा
हवी. आदि शंकराचार्य व्याख्या करतात - शास्त्रस्य
गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणा | सा श्रद्धा
कथिता सद्भिः यया वस्तूपलभ्यते || शास्त्रवाक्य
व गुरुवाक्य यावर पूर्ण विश्वास असणे, तीच वाक्ये सत्य आहेत, अशी बुद्धीची धारणा होणे,
यालाच 'श्रद्धा' असे म्हणतात. या नितांत श्रद्धेच्या
साहाय्यानेच साधकाला आत्मवस्तूची प्राप्ति होते.
म्हणून साधकाच्या जीवनामध्ये एकच श्रद्धास्थान
हवे. जे काही सांगायचे, जे काही ऐकायचे, जे
काही मार्गदर्शन घ्यायचे, ते एकच स्थान पाहिजे. दोन-तीन-अनेक जणांना विचारून त्याचा काही उपयोग होत
नाही. तसेच गुरूंनी सांगितल्यावर त्यांचा शब्द
प्रमाण मानून त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे. त्याचबरोबर गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रद्धापूर्वक
श्रवण करावे. आत्मविद्या साधकाला केवळ स्वतःच्या
बुद्धीने प्राप्त होत नाही. बुद्धीने शास्त्राचे
शाब्दिक ज्ञान होते. परंतु शास्त्राची अनुभूति
मात्र गुरुकृपेनेच येते.
याप्रमाणे येथे 'गुरु' हे प्रथम प्रमाण आहे.
येथे दुसरे प्रमाण 'शास्त्र' सांगितले आहे.
जगामध्ये अनेक प्रकारची शास्त्रे, विद्या
व त्या त्या विद्यांचे गुरु आहेत. त्यांपैकी
ब्रह्मविद्या ही सर्वश्रेष्ठ असून त्यासाठी वेदांतशास्त्र हे प्रमाणभूत शास्त्र आहे.
वेदन्तो नाम उपनिषत् प्रमाणम् | (वेदांतसार) वेदांत म्हणजे उपनिषदे हीच आत्मविद्येसाठी प्रमाण
आहेत. याप्रमाणे साधकाने गुरु व शास्त्र
यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून स्वतःचे प्रयत्न करावेत. मनापासून सातत्याने साधना करावी. अशा या पुरुषार्थानेच साधकाला आत्मसिद्धि प्राप्त
होते. दैवामुळे कधीही परमपुरुषार्थाची प्राप्ति
होत नाही.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–