Tuesday, March 21, 2023

निर्निमित्त वैराग्य | Untriggered Dispassion

 



निर्निमित्त वैराग्य म्हणजे काही निमित्ताशिवाय, कारणाशिवाय निर्माण झालेले वैराग्य होय.  आपण मागील वैराग्यप्रकरणामध्ये याचा विस्तारपूर्वक अर्थ पाहिला आहे.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये सहजासहजी वैराग्य उत्पन्न होत नाही.  वैराग्याचे अनेक प्रकार आहेत.  पुष्कळ वेळेला प्रासंगिक, तात्कालिक, दुसऱ्याकडे पाहून किंवा नैराश्यामधून माणसाला वैराग्य येते.  म्हणून त्याला स्मशान वैराग्य असा शब्द वापरला जातो.  एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यावेळेस आपण स्मशानात जातो, तेथील शोकाकुल वातावरण पाहतो, त्यावेळी क्षणभर वाटते की, खरेच हे सगळे भोग आणि विषय व्यर्थ आहेत.  मनुष्य दुःखाने व्याप्त होतो.  त्याला काहीच खावेसे, उपभोगावेसे वाटत नाही.  परंतु अंत्यविधि झाले, स्मशानातून बाहेर पडले की, पुन्हा व्यवहार सुरु होतो.  मनुष्य पूर्ववत् विषयासक्त जीवन जगू लागतो.

 

किंवा काही वेळेस एखादा भयंकर प्रसंग घडला, संकट आले, तरीही मनामध्ये वैराग्यवृत्ति निर्माण होते.  परंतु हे वैराग्य दीर्घकाळ टिकत नाही.  प्रसंग निघून गेला की, वैराग्यही निघून जाते.  याला खरे वैराग्य म्हणत नाहीत, कारण हे सनिमित्त वैराग्य आहे.  म्हणजेच या वैराग्याच्या मागे एखादा प्रसंग, व्यक्ति, घटना यांपैकी काहीतरी निमित्त असते.  कशामुळेतरी वैराग्य येऊन मनुष्य काही काळापुरताच आध्यात्मिक झाल्यासारखा वाटतो.  परंतु नंतर पुन्हा तो मनुष्य पूर्ववत् संसारामध्ये आसक्त होऊन विषयांचा उपभोग घेऊ लागतो.  म्हणून याला सनिमित्त किंवा तात्कालिक वैराग्य म्हणतात.

 

असे स्पष्ट करून वसिष्ठ मुनि म्हणातात की, रामा !  तुझे वैराग्य मात्र निर्निमित्त आहे.  असे वैराग्य जन्मतःच लहानपणापासून निर्माण होते.  म्हणून वैराग्यसंपन्न साधु निर्माण करता येत नाही तर तो जन्मालाच यावा लागतो.  श्रीरामांच्या मनामध्ये ऐन तारुण्यावस्थेमध्ये असे अभिजात वैराग्य निर्माण झाले होते.  हे वैराग्य चारु म्हणजे अतिशय सुंदर होते.  जो मनुष्य सतत काहीतरी मागतो, असंतुष्ट असतो त्या मनुष्यापेक्षा समाधानी, तृप्त, शांत असलेला विरक्त मनुष्य चारु म्हणजे खूप सुंदर दिसतो.  कारण त्याच्यामध्ये निर्निमित्त वैराग्य असते.  त्याला वैराग्याचा वेगळा उपदेश देण्याची आवश्यकताच नसते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ