थोडा
विचार केला तर प्रश्न येतो की, कर्तृत्व करायला अंतरिक शक्ति, प्रेरणा, सामर्थ्य
कोण देतो ? मनुष्य स्वकर्तृत्वाने
परमेश्वराच्या सत्तेशिवाय मातीचा कण तरी निर्माण करू शकतो का ? नव्हे डोळ्यांची उघडझाप तरी करू शकतो का ? ही त्या जगन्नियामक, सर्वशक्तिमान परमेश्वराची
कृपा नाही का ? म्हणून कार्य करायला शक्ति
देणारा व कार्यसिद्धि करणारा तोच परमेश्वर आहे. हे जाणून पुरुषप्रयत्नाने प्राप्त झालेली
संपत्ति आपली स्वतःची नसून परमेश्वराचीच आहे, हे जाणावे व अहंकार सोडवा.
अवतारकार्यात
प्रभू रामचंद्रालाही अहंकार झाला होता, मग सामान्य अज्ञ मानवाची काय कथा ? श्रीरामाची छोटीशी सुंदर कथा ! वानरसेना दगडावर रामाचे नाव लिहून सेतु तयार
करण्यासाठी समुद्रात दगड टाकत होती व तो प्रत्येक दगड तरंगत होता. रामाला ते पाहून गर्व झाला. केवढा आपल्या नामाचा महिमा ! आपणही असाच दगड टाकावा. पण रामाने टाकलेला दगड सरळ तळाला गेला.
हे
सर्व त्याचा भक्त हनुमान पाहात होता. त्यालाही
मनातल्या मनात हसू आले. काय आश्चर्य ! स्वतः अवतारी रामाने टाकलेला दगड तरंगला नाही,
पण त्याच्या नावाने वानरांनी टाकलेले दगड मात्र तरंगत होते. प्रत्यक्ष रामात कुठे सामर्थ्य होते ? पण वानरांच्या रामावरील शुद्ध, निरतिशय
श्रद्धेने व भक्तीने दगडही तरून गेले.
श्रद्धा
व निष्ठा हीच ताकद व हेच सामर्थ्य ! या
प्रचंड सामर्थ्याने अशक्यप्राय घटनाही सहज शक्य होतात. मानवाला प्रदान केलेली मनाची शक्ति, श्रद्धा
व निष्ठा ही सुद्धा परमेश्वराची संपत्ति आहे. मानवाचे त्यात काही सुद्धा कर्तृत्व नाही. तसेच विश्वही मानवाचे नाही. मानवाला दिलेले सुंदर शरीर, इंद्रिय, मन,
बुद्धि, विवेक व वैराग्य यांच्याबद्दल त्याने ईश्वराची कृतज्ञता मानावी व धन्य
व्हावे.
- "साधना पञ्चकम्"
या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
- Reference: "Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, September 2005
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment