घरामध्ये
नादमधूर संगीत चालू असताना जर बाहेरून कर्णकर्कश आवाज आला तर त्या आवाजाच्या
प्रभावाने सुरेल संगीताचा ध्वनि लुप्त झाल्यासारखा वाटतो. किंवा सुगंधी अगरबत्ती पेटविल्यानंतर तिचा सुगंध
घरात दरवळतो. परंतु दुर्गंधाच्या
प्रभावाने सुगंध लुप्त झाल्यासारखा वाटतो.
त्याचप्रमाणे
समाधिअवस्थेमध्ये ‘अहं ब्रह्मास्मि’ ही वृत्ति निर्माण होते आणि त्यामुळे साधकाला
निरतिशय आनंदाचा अनुभव येतो. परंतु समाधिअवस्थेमधून
बाहेर आल्यानंतर देहाच्या संगाने देहतादात्म्य निर्माण होऊन ‘मी’ देह आहे ही
वृत्ति पुन्हा प्रबल होते. त्यामुळे
समाधिअवस्थेमधील ‘मी’ ब्रह्म आहे हे ज्ञान लुप्त झाल्यासारखे वाटते. तसेच निरतिशय आनंदाची अनुभूति सुद्धा नाहीशी
होते आणि पूर्ववत मी मर्त्य आहे, मी सुखीदुःखी आहे या वृत्ति निर्माण होतात. याचा अर्थ साधक स्वस्वरूपामध्ये दृढ झालेला
नाही. म्हणून साधकाने निष्ठा प्राप्त
करण्यासाठी ब्रह्माभ्यास करावा.
यासाठी
आचार्य सांगतात – तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनम् |
(तृप्तिदीप)
सतत
ब्रह्माकार वृत्तीचा अभ्यास करावा. एकांतामध्ये
बसून सर्व वृत्तींचा निरास करून सजातीय ब्रह्माकार वृत्ति निर्माण करावी. तसेच अन्य साधकांबरोबर
ब्रह्मस्वरूपाची चर्चा करून शंका निरसन कराव्यात आणि अज्ञानी मनुष्याच्या
संगतीमध्ये त्याला आत्मस्वरूपाचे प्रबोधन करावे. या सर्व अभ्यासाने सतत ब्रह्माकार वृत्ति
निर्माण होते व हळूहळू सर्व संशय, विपार्याय निरास होऊन वृत्ति दृढ होते.
याप्रमाणे
बुद्धीची आत्मस्वरूपामध्ये निश्चलता प्राप्त होते. अशी ज्यांची दृढ वृत्ति झालेली आहे ते तन्निष्ठ
झालेले आहेत असे म्हटले आहे.
श्रुति
म्हणते – यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः
| (दृक्दृश्यविवेक)
ज्या
ज्या विषयाकडे मन जाते तेथेच त्याची समाधि असते. म्हणजेच विषय पाहात असताना सुद्धा तो
स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो.
- "श्रीमद्
भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, December 2002
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment