Showing posts with label Truth. Show all posts
Showing posts with label Truth. Show all posts

Tuesday, August 26, 2025

मौन-शांति-सत्य | Speechlessness-Silence-Truth

 




ब्रह्मज्ञानाची प्राप्ति झाल्यानंतर या विश्वामध्ये बोलण्यासारखे काहीच शिल्लक राहात नाही.  अन्यवस्त्वन्तराभावात् |  परब्रह्मस्वरूपाव्यतिरिक्त अन्य सर्व वस्तूंचा आत्मज्ञानाने निरास होतो.  त्यामुळे मिथ्या विश्वाविषयी काय बोलणार ?  रज्जुमधून जो सर्प कधीही निर्माण झाला नाही, अशा मिथ्या सर्पाची चर्चा निरर्थक आहे.  त्याचप्रमाणे परब्रह्मस्वरूप हे एकच सत्य आहे.  या विश्वात घडून घडून काय घडणार ?  उत्पत्ति, विनाश आणि त्यामध्ये घडामोडी !  त्याची चर्चा करून काहीच साध्य होणार नाही.  उलट साधकाचे मन मात्र बहिर्मुख, विषयाभिमुख, अस्थिर होते.  

 

म्हणूनच ब्रह्मज्ञानी पुरुष विश्वाबद्दल तर बोलत नाहीच आणि ब्रह्मस्वरूपाबद्दलही बोलत नाही.  मौन हे परब्रह्माचे स्वरूप आहे.  भगवान भाष्यकार म्हणतात - मौनव्याख्याप्रकटितपरब्रह्मतत्त्वं युवानम् |  (श्री दक्षिणामूर्तिस्तोत्रम् ).  मौनरूपी व्याख्यानामधून गुरु शिष्याला परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान प्रदान करतात.  येथे आत्मा हाही मौनस्वरूप, आत्मस्वरूपाचे ज्ञान देणाऱ्या आचार्यांनीही मौन धारण केलेले आहे आणि आचार्यांचा उपदेश, व्याख्यानही 'मौन' हेच आहे.

 

ईश्वरदर्शनाच्या इच्छेने एक मनुष्य एका साधु पुरुषाकडे जातो आणि म्हणतो, "साधु महाराज !  मला ईश्वराचा साक्षात्कार हवा आहे.  तो कोठे आहे ?  कसा आहे ?  त्याचे स्वरूप काय आहे ?  याचे ज्ञान हवे आहे."  यावर साधु महाराज हसतात आणि शांत बसतात.  हा मनुष्य आतुरतेने उत्तराची प्रतीक्षा करीत असतो.  पाच मिनिटे होतात.  दहा मिनिटे होतात, पंधरा-वीस-पंचवीस-तीस-अर्धा तास जातो.  ही शांतता त्या मनुष्याला सहन होत नाही.  त्याचे शरीर, मन अस्वस्थ होते.  तो वैतागून, चिडून पुन्हा विचारतो, "परमेश्वर कोठे आहे ?  याचे उत्तर मला हवे आहे."  यावर साधु पुरुष उत्तर देतात - "बाळा, तुझ्या प्रश्नाला माझ्या मौनामधून मी तत्क्षणीच उत्तर दिलेले आहे.  तुला ते समजले नाही.  त्याला मी काय करू ?  मौन हेच परमेश्वराचे खरे स्वरूप आहे.  परमेश्वर हा स्वतःच मौनस्वरूप आहे.  मौन म्हणजेच शांती !"

 

Silence is the Truth. Truth is the Silence.  Awareful Silence is the nature of myself.  ज्यावेळी वाणीची व्यर्थ बडबड संपेल, वाणी, मन शांत होईल तेथेच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल.  तेथेच निरतिशय, नीरव शांतीचा, आनंदाचा अनुभव येईल.  म्हणूनच ज्ञानी पुरुष हा मौनी, मौनस्वरूप म्हणजेच शांतस्वरूप, आनंदस्वरूप आहे.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ



Tuesday, April 22, 2025

सत्य-तपस्-ज्ञान-ब्रह्मचर्य | Truth-Penance-Knowledge-Celibacy

 



श्रुति साधकाला ज्ञानासाठी साहाय्कारी असणारी साधने सूचित करते.  जर यथार्थ आणि सम्यक् ज्ञान प्राप्त करावयाचे असेल, तर ज्ञान निष्प्रतिबंधक झाले पाहिजे.  त्यासाठी अंतःकरणामधील मल, विक्षेपादि दोष नाहिसे होणे आवश्यक आहे.  म्हणूनच श्रुति येथे निवृत्तिप्रधान असणारी सत्यादि साधने प्रतिपादित करते की, ज्या साधनांच्यामुळे साधक बाह्य विषय आणि भोगांच्यामधून निवृत्त होऊ शकेल.

 

सत्य हे प्रथम साधन सांगतात.  हा आत्मा सत्याने प्राप्त होतो.  सत्य म्हणजेच सत्यभाषण होय.  ज्या वाणीमध्ये सत्याच्या व्यतिरिक्त असणारे म्हणजेच जे जे असत्य, अनृत, मिथ्या, निरर्थक आहे, त्यांचा अभाव असतो.  त्यास ‘सत्य’ असे म्हणतात.

 

तप हे दुसरे साधन सांगतात.  तपाने आत्मा प्राप्त होतो.  मन आणि पंचकर्मेंद्रिये आणि पंचज्ञानेंद्रिये यांना एकाग्र करणे, हेच सर्वश्रेष्ठ तप आहे.  तप याचा अर्थच मन आणि इंद्रिये यांचा स्वैर, बहिर्मुख प्रवृत्तीवर पूर्णतः नियमन करून त्यांना अंतर्मुख व एकाग्र करणे होय.  हेच तप म्हणजेच शम व दम हे दोन दैवी गुण आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अनुकूल आहेत.  या अंतरिक तपानेच आत्मप्राप्ति होते.

 

यापुढील साधन सांगतात सम्यक् ज्ञानेन |  सम्यक् ज्ञान म्हणजेच यथार्थ, संशयविपर्ययरहित ज्ञान होय.  अशा जीवब्रह्मैक्यज्ञानाने आत्मप्राप्ति होते.  ज्ञान हेच आत्मप्राप्तीचे पुष्कल व प्रधान साधन आहे.

 

यापुढील साधन सांगतात – नित्यं ब्रह्मचर्येण |  ब्रह्मचर्य याचा अर्थ इंद्रियांच्या कामुक प्रवृत्तीवर नियमन करणे, मैथुनाचा त्याग करणे होय.  जे साधक, यति सत्य वगैरेदि साधनांचे सातत्याने, दीर्घ काळ अनुष्ठान करतात, कोणत्याही प्रकारचा प्रमाद, टाळाटाळ, दुर्लक्ष न करता अखंडपणे साधनेमध्ये तत्पर व परायण होतात, त्यांच्या अंतःकरणामधील कामक्रोधादि सर्व दोष नष्ट होतात.  त्यांचे अंतःकरण शुद्ध, सत्वगुणप्रधान होते.  तेच यति त्या आत्मस्वरूपाला अपरोक्षस्वरूपाने पाहतात, स्पष्टपणे जाणतात.  असे याठिकाणी श्रुति प्रतिपादित करते.  म्हणून सत्य, तपस्, ज्ञान व ब्रह्मचर्य यामध्ये साधकांनी नित्यनिरंतर प्रवृत्त व्हावे, त्यामध्येच तल्लीन, तन्मय व्हावे हाच अभिप्राय आहे.  अशा प्रकारे श्रुति येथे सत्यादि साधनांची स्तुति करते.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, November 15, 2022

आत्मोद्धाराची साधने – सत्य व तीर्थयात्रा | Means of Self-Upliftment – Truth & Pilgrimage

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.  नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II  (श्रीमद्  भागवत)  अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

सत्य म्हणजे यथार्थ वचन होय.  जसे आहे तसे बोलणे होय.  सत्य बोलणे हा मनुष्याचा आद्य धर्म आहे.  सत्याच्या आधारानेच या पृथ्वीला धारण केले जाते.  सत्याच्या सामर्थ्यानेच सूर्य तप्त होतो, अग्नि जाळण्यास समर्थ होतो, असे सत्याचे महत्त्व अवर्णनीय आहे.  म्हणून मनुष्याने जीवनभर सत्याने वागावे.  सत्याचा कधीही त्याग करू नये.

 

ईश्वराने अनेक तीर्थे निर्माण केली.  तीर्थांच्यामध्ये स्थानमहात्म्य असते.  त्या त्या ठिकाणी जो श्रद्धापूर्वक जाईल आणि दानधर्मादि आचरण करेल त्याला अगणित पुण्यफळ प्राप्त होते.  तीर्थयात्रा म्हणजे पर्यटन नव्हे.  तीर्थयात्रेत आपले मन अत्यंत शुद्ध हवे.  तसेच आपले आचरणही अतिशय शुद्ध व स्वच्छ हवे.  तीर्थाच्या ठिकाणी केलेले पाप हे वज्रलेपाप्रमाणे होते.  म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर दुसऱ्याशी भांडण करणे, वैषयिक चर्चा करणे, निंदा-नालस्ती करणे, चोरी करणे, ईश्वराप्रति अश्रद्धेचा भाव निर्माण करणे ही भयंकर पापे आहेत.

 

मात्र जो अतिशय श्रद्धेने तीर्थयात्रा करेल, तेथे दानधर्मादींचे आचरण करेल, ईश्वराचे नामस्मरण करेल, त्यालाच तीर्थयात्रा फलदायी होऊन ईश्वराच्या अस्तित्वाची विशेषत्वाने अनुभूति येऊ शकेल.  तीर्थयात्रेला बाहेर पडल्यामुळे निदान काही प्रमाणात साधकाचे मन रोजच्या व्यवहारापासून, संसाराच्या आसक्तीपासून निवृत्त होऊ शकेल.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Wednesday, November 24, 2021

सत् म्हणजे काय ? | What is ‘Sat’ ?

 



‘सत्य’ या शब्दाचा अर्थ भिन्न-भिन्न आहे.  जो अपरा विद्येचा विषय कर्मफळाचे लक्षण सत्य सांगितले, ते सत्य पारमार्थिक सत्य नसून सापेक्षित सत्य आहे.  सत्य जरी म्हटले असेल, तरी सुद्धा ते सर्व कर्मफळ नाशवान आणि अनित्य आहे.  मग त्याला सत्य का म्हटले ?  अशी शंका येईल.  यावर आचार्य सांगतात की, अविद्यावान पुरुषाच्या दृष्टीने ते फळ सत्य आहे.  त्याला ते फळ सत्य वाटते.  त्याच्याशिवाय दुसरे काहीही सत्य नाही.  ऐहिक भोग आणि पारलौकिक भोगांनाच तो सत्य मानतो.

 

याठिकाणी सत्य हा शब्द परा विद्येचा विषय आहे.  ते पारमार्थिक, निरतिशय स्वरूपाचे सत्य आहे.  मग सत्य म्हणजे काय ?  त्रिकाले अपि तिष्ठति इति सत् |  - भूत, भविष्य, वर्तमान या तीन्हीही काळांच्यामध्ये जे अस्तित्वामध्ये असते, ज्याचा कधीही, कोणत्याही कारणाने निरास होऊ शकत नाही, त्याला ‘सत्’ म्हणतात.  याउलट जे विचाराने निरास होते, जे विवेकाने निरास होते, त्याला ‘असत्’ असे म्हणतात.  म्हणून इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हणतात – That which cannot stand for enquiry is unreal.  ज्याचा ज्याचा निरास होतो, ती प्रत्येक वस्तु मिथ्या आहे.

 

भगवान गीतेमध्ये सिद्धान्त मांडतात -

नासतो विद्यते भावो नाभवो विद्यते सतः |

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ||         (गीता अ. २-१६)

असतः भावः न विद्यते |  हा पहिला सिद्धान्त आहे आणि दुसरा सिद्धान्त – सतः अभावः न विद्यते

 | जी वस्तु असत्, मिथ्या आहे, त्या वस्तूला कधीही सत्ता, वस्तुस्तिथि, अस्तित्व नसते आणि जी वस्तु सत् आहे, त्या वस्तूचा कधीही अभाव नसतो.  म्हणजेच सत्य वस्तु ही नित्य अस्तित्वामध्ये असते आणि असत्य वस्तु कधीही अस्तित्वामध्ये नसते.  म्हणून ती दिसली, भासली तरी सुद्धा ती सत्य असेलच असे सांगता येत नाही.  तर उलट जे जे दिसते, इंद्रियांना अनुभवायला येते, मनाला, बुद्धीला जाणता येते, ते सर्वच विवेकाने निरास होते.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Friday, January 1, 2016

निदिध्यासना | Contemplation



शास्त्रश्रवण व मनन ही साधना झाल्यावर निदिध्यासनेत ब्रह्मस्वरुपाबद्दल कोणत्याही प्रकारचे तार्किक विचारमंथन नाही किंवा आत्म्याची मीमांसा (Logical thinking and enquiry) नाही.  सत्, चित्, आनंद हे शब्द उच्चारल्याबरोबर थेट त्या शब्दाने निर्देशित केलेल्या तत्त्वाचे अंतिम सत्य पाहण्याचा अभ्यास निदिध्यासनेत करावा.

जसे ‘घट’ शब्द उच्चारल्याबरोबर, घट या शब्दावर आपण चिंतन करत नाही, तर तत्क्षणी त्या शब्दातून अभिप्रेत होणारा तो विषय किंवा अर्थ स्पष्टपणे डोळ्यासमोर उभा राहतो.  म्हणजे शब्द सत्य नाही तर शब्दाने प्रतिपादित केलेला विषय सत्य आहे.  विषय किंवा सत्य प्रकटीकरणासाठी शब्द हे साधन आहे.  घट हा शब्द उच्चारताच घटस्वरुपाची वृत्ति निर्माण होते.  त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यशुद्धबुद्धमुक्त हे जे स्वरूप शब्दात प्रकट केलेले आहे, त्या आत्मस्वरुपाची सजातीय वृत्ति सतत निर्माण करावी.

म्हणजेच See the Content of the word. The Content is the Truth.  ही ब्रह्मस्वरुपाची वृत्ति इतकी दृढ व स्थिर करावी की, ब्रह्मस्वरुप हा स्वभाव बनला पाहिजे.  ब्रह्मस्वरुपाची सहजस्वाभाविक अवस्था प्राप्त झाली पाहिजे. हिलाच ज्ञाननिष्ठा म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेला मराठीत ‘सहजसमाधि’ म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेमुळे हा ज्ञानी कोणतीही शारीरिक, मानसिक क्रिया करो, त्याची तत्त्वाची म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची दृष्टि सतत कायम असते.  उठता, बसता, खाता, पिता तो “मी स्वतः काहीच करत नाही” अशा वृत्तीने कर्म करतो.

या ब्रह्मनिष्ठेत ब्रह्मस्वरुपाच्या विस्मृतीचा पूर्ण अभाव असतो, कारण तो ज्ञानी ब्रह्मस्वरुप झालेला असतो.  म्हणूनच हा ब्रह्मविद् म्हणतो – ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |  त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ||  या तत्त्ववेत्याचे मन अखंड चैतन्य, सच्चिदानन्दस्वरुपच पाहाते.  ही ज्ञाननिष्ठा प्राप्त होईपर्यंत मुमुक्षूने निदिध्यासना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Tuesday, September 10, 2013

ऋतं वच्मि सत्यं वच्मि | I Speak “ The Truth ”



ऋतं वच्मि सत्यं वच्मि | 
मी सत्य बोलतो.  मी बोलतो ते सत्यच आहे.

‘ऋत’ शब्दाचा मनाशी संबंध येतो आणि ‘सत्य’ शब्दाचा वाणीशी संबंध येतो.  जे अनृतात्मक असुर भावाच्या अभिमानाने रहित आहे ते ऋत आहे.  मी गणेशभक्त असल्यामुळे माझी बुद्धि, मिथ्या, कपटी कुटील किंवा अनृतात्मक नाही.  मी निष्कपट आहे.  म्हणून वेदांच्यामध्ये जे तुझे स्वरूप प्रकट केले आहे तेच बोलत आहे.

हे स्वरूप मनोकल्पित नाही, तर वेदप्रमाणजनित आहे.  इतकेच नव्हे, तर ही माझी अनुभूति आहे.  ‘ त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् | सर्वं खल्विदं ब्रह्म | अहं ब्रह्मास्मि | ’  हा माझा अनुभव आहे. म्हणून मी सत्य तेच बोलत आहे.  तसेच मी बोलतो ते ‘सत्या’ विषयीच आहे.

कर्मजन्य आणि ज्ञानजन्य नाश ज्या वास्तूमध्ये होत नाहीत तीच त्रिकालबाधित आणि तीन्हीही काळामध्ये असणारी ‘सत् वस्तु आहे.  हे गणपते, ते सत्स्वरूप तुझे असल्यामुळे तुझ्याच स्वरूपाविषयी मी बोलत आहे.  म्हणून ते सत्यच आहे.

शिव, विष्णु वगैरे देवता ईश्वरवाचक असून ब्रह्मस्वरूप प्रतिपादन करणाऱ्या आहेत.  परंतु गणेशदेहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ ईश्वरवाचक नसून ‘तत्त्वमसिमहावाक्याने दर्शविलेला जीवात्मक आणि ईश्वरात्मक असून त्यांच्यामधील संपूर्ण ब्रह्मात्मैक्य सिद्ध करणारा आहे.  हेच पारमार्थिक सत्य आहे.  ते मी बोलतो.

याप्रमाणे श्रीगणेशाचे तत्त्वमस्यात्मक असणारे पारमार्थिक स्वरूप सांगून ते सर्व भक्तांना त्यांच्याच हृदयामध्ये प्रत्यागात्मस्वरूपाने उपलब्ध आहे, हे प्रतिपादन केले.  म्हणून जे भक्त श्रीगणेशाचा आश्रय घेऊन त्याची अनन्य भक्ति करतात त्यांच्यावर प्रसन्न होऊन तो भक्तांच्या अधीन होतो, कारण अनन्य भक्तीने तो लुब्ध होतो.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ