Friday, January 1, 2016

निदिध्यासना | Contemplationशास्त्रश्रवण व मनन ही साधना झाल्यावर निदिध्यासनेत ब्रह्मस्वरुपाबद्दल कोणत्याही प्रकारचे तार्किक विचारमंथन नाही किंवा आत्म्याची मीमांसा (Logical thinking and enquiry) नाही.  सत्, चित्, आनंद हे शब्द उच्चारल्याबरोबर थेट त्या शब्दाने निर्देशित केलेल्या तत्त्वाचे अंतिम सत्य पाहण्याचा अभ्यास निदिध्यासनेत करावा.

जसे ‘घट’ शब्द उच्चारल्याबरोबर, घट या शब्दावर आपण चिंतन करत नाही, तर तत्क्षणी त्या शब्दातून अभिप्रेत होणारा तो विषय किंवा अर्थ स्पष्टपणे डोळ्यासमोर उभा राहतो.  म्हणजे शब्द सत्य नाही तर शब्दाने प्रतिपादित केलेला विषय सत्य आहे.  विषय किंवा सत्य प्रकटीकरणासाठी शब्द हे साधन आहे.  घट हा शब्द उच्चारताच घटस्वरुपाची वृत्ति निर्माण होते.  त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यशुद्धबुद्धमुक्त हे जे स्वरूप शब्दात प्रकट केलेले आहे, त्या आत्मस्वरुपाची सजातीय वृत्ति सतत निर्माण करावी.

म्हणजेच See the Content of the word. The Content is the Truth.  ही ब्रह्मस्वरुपाची वृत्ति इतकी दृढ व स्थिर करावी की, ब्रह्मस्वरुप हा स्वभाव बनला पाहिजे.  ब्रह्मस्वरुपाची सहजस्वाभाविक अवस्था प्राप्त झाली पाहिजे. हिलाच ज्ञाननिष्ठा म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेला मराठीत ‘सहजसमाधि’ म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेमुळे हा ज्ञानी कोणतीही शारीरिक, मानसिक क्रिया करो, त्याची तत्त्वाची म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची दृष्टि सतत कायम असते.  उठता, बसता, खाता, पिता तो “मी स्वतः काहीच करत नाही” अशा वृत्तीने कर्म करतो.

या ब्रह्मनिष्ठेत ब्रह्मस्वरुपाच्या विस्मृतीचा पूर्ण अभाव असतो, कारण तो ज्ञानी ब्रह्मस्वरुप झालेला असतो.  म्हणूनच हा ब्रह्मविद् म्हणतो – ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |  त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ||  या तत्त्ववेत्याचे मन अखंड चैतन्य, सच्चिदानन्दस्वरुपच पाहाते.  ही ज्ञाननिष्ठा प्राप्त होईपर्यंत मुमुक्षूने निदिध्यासना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005
- हरी ॐ

No comments:

Post a Comment