Tuesday, September 24, 2013

दैन्य भाव | The Attitude of Destitution



धर्मपारायण जीवन जगत असताना संतांच्या जीवनामध्येही अनेक चांगले-वाईट प्रसंग येतात.  प्रतिकूल - वाईट प्रसंगांच्यामध्ये संकटांच्यामध्येच साधकामधील दैवीगुणांची, श्रद्धेची परीक्षा होते.  चांगली परिस्थिति असताना ईश्वरावर कोणीही श्रद्धा ठेवेल.  परंतु जेव्हा संकटे येतात, तेव्हा मनुष्य अधिक व्याकूळ व अगतिक होतो.  त्याच्या मनामध्ये दीनतेचा, शरणागतीचा भाव निर्माण होऊन तो भगवंताला अनन्य भावाने प्रार्थना करतो.  त्यावेळी तो भगवंताच्या अधिक जवळ जातो.  

परमेश्वराविषयी असा भाव सहजासहजी निर्माण होत नाही.  वर्षानुवर्षे जप, तप, श्रवण करूनही मनामध्ये ईश्वराविषयी उत्कट भक्ति अनुभवायला येत नाही.  व्याकुळता निर्माण होत नाही.

याचे कारण एकच !  आणि ते म्हणजे आजपर्यंत जरी आपण श्रद्धावान असू, साधना करीत असू, सदाचाराचे जीवन जगत असू, तरीही अन्तःकरणामध्ये कर्तृत्वबुद्धि, अहंकार, अभिमान असतो व जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत भगवत्प्राप्ति अशक्य आहे, कारण भगवान नारदमहर्षि म्हणतात – दैन्यप्रियत्वात् अभिमानद्वेषित्वात् |    (नारदभक्तिसूत्र)

परमेश्वरला भक्तामधील दैन्यभाव म्हणजे समर्पण भाव प्रिय आहे.  परमेश्वर भक्तामधील अभिमानाचा तिरस्कार करतो.  दैन्यभाव याचा अर्थ दुबळेपणा नव्हे.  तर दैन्यभाव म्हणजेच परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होणे होय.  स्वतःच्या कर्तृत्वाच्या मर्यादा बुद्धीला समजल्या की, आपोआपच मनुष्य परमेश्वरासमोर नतमस्तक होतो.
 

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ
 

Wednesday, September 18, 2013

श्रीगणेश – फलश्रुति - निर्विघ्नता | Shree Ganesh – Freedom from Calamities

 

सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति |

जो सदासर्वकाळ अथर्वशीर्ष म्हणतो तो निर्विघ्न होतो. याचा अर्थ अथर्वशीर्ष पठण करणाऱ्याला पापकर्म करण्यासाठी परवाना दिलेला नाही. पाप हे प्रत्यक्ष कर्म नसून त्यामागे असलेली दुष्ट, लुबाडण्याची प्रवृत्ति म्हणजे ‘पाप’ आहे.

अथर्वशीर्षाच्या पठणाने भक्ताची अदृष्ट शक्तीमध्ये श्रद्धा वृद्धिंगत होते. श्रीगणेशउपासनेमध्ये निष्ठा वाढून तल्लीनता, तन्मयता वाढते. कर्मानुष्ठानाच्या वेळी किंवा उपासनेच्या वेळी वृत्ति काही प्रमाणात रागद्वेषरहित होऊन शुद्ध, स्थिर होते, अधिक सात्त्विक होते. त्यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. व्यवहार करतानाही वृत्ति थोडी शुद्ध राहते आणि आपल्या हातून वाईट कर्म किंवा पापकर्म न होण्याची काळजी घेतो. याप्रमाणे पापकर्म करण्याची वृत्तीच नाहीशी होऊन सद्वृत्ति प्रधान होते.

तो श्रीगणेशाचा भक्त आहे ही सतत जाणीव राहिल्याने जे जे काही घडेल ते ते सर्व श्रीगणेशाची इच्छा किंवा कृपा आहे या दृष्टीने घेत असल्यामुळे त्याची सहनशीलता वाढते. सर्व घटना आनंदाने आणि प्रसन्न वृत्तीने घेतो. याचा परिणाम म्हणजे रागद्वेषात्मक विक्षेप कमी होतात. चित्त शुद्ध होते, निष्पाप होते.

यामुळे चिंतनशील वृत्ति वाढते आणि श्रीगणेश अथर्वशीर्षाच्या गूढार्थावर अखंड, नित्यनिरंतर चिंतन करतो. त्याला कोणतेच विघ्न राहात नाही. प्रत्येक प्रसंग, इतकेच नव्हे तर सर्व जीवनच साधनामय होते. तो सर्वच प्रसंग अत्यंत सहजतेने, लीलया, आनंदाने, प्रसन्न वृत्तीने पाहू शकतो. सहन करू शकतो. तो निर्विघ्न होतो.      

"श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010
 


 
 
 
- हरी ॐ

Tuesday, September 17, 2013

श्रीगणेश – संस्कारांचे हरणकर्ता I Shree Ganesh – Robber of Impressions



परब्रह्मस्वरूप श्रीगणेश मायोपाधीवर आरूढ होऊन सर्व जीवांच्या हृदयामध्ये सर्वान्तर्यामी स्वरूपाने सन्निविष्ट आहे.  हे जीव अनेक प्रकारची पापपुण्यात्मक कर्म करून रागद्वेषकामक्रोध वगैरे अनंत, अगणित संस्काररूपी संपत्ति संग्रह करतात.  त्यावेळी सर्वान्तर्यामी परब्रह्मस्वरूप श्रीगणेश मायोपाधिरूपी मूषकावर आरूढ होऊन शरणागत आलेल्या भक्तांच्या अंतःकरणातील संग्रह केलेली संस्काररूपी संपत्ति हरण करतो.  म्हणून मूषक हे गणपतीचे वाहन आहे.

प्रथम विषयासक्त आणि स्वतःला कर्ताभोगता म्हणविणाऱ्या नास्तिकवादी जीवाला मायारूढ झालेला अन्तर्यामी परमेश्वर नकळत जीवाच्या अहंकाराला, कर्तृत्वभोगतृत्व बुद्धीला धक्के देतो.  सर्व प्रयत्न करूनही संकटांच्यावर मात करता येत नाही.  त्यामुळे तो अधिकच बेजार, अगतिक, व्याकूळ होतो.

परंतु भगवान त्याच्यावर कृपा करण्यासाठीच त्याला अनेक दुःखांच्या दरीत फेकून देतो.  अनेक संकटांमधून होरपळून काढतो.  यामुळे परमेश्वरच कर्तुमकर्तुम् आहे, मी नाही हे त्याला उमजते.  यामुळे तो आस्तिक होऊन श्रद्धावान होतो.  परमेश्वराचे भजन, पूजन, उपासना करू लागतो.  ही सर्व धार्मिकता ऐहिक विषयांच्या प्राप्तीसाठी, संकटांचे निवारण करण्यासाठी सकाम असते.

काही काळानंतर तोच अन्तर्यामी परमेश्वर भक्ताच्या मनात विकल्प निर्माण करून विचार करायला प्रवृत्त करतो.  भक्ताला विषयांच्या मागणीमध्ये काही रस वाटत नाही.  परमेश्वराजवळ मी किती मागणार?  कारण जे जे मागतो ते सर्व नश्वर, क्षणभंगुर आहे असे दिसते.  कशामाधूनही त्याला अंतरिक शांति, सुख मिळत नाही असे दिसते.  मग मागायचे तरी कशासाठी?  मला काहीच नको.  मला फक्त आत्मसुख, शांति पाहिजे.  बाकी काहीही नको.  अशाप्रकारची वृत्ति प्रयत्न करून किंवा अभ्यासाने निर्माण होत नाही.  तर अन्तर्यामी गणेशच निष्काम भक्तीची इच्छा निर्माण करतो.  ही श्रीगणेशाची कृपा आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ

Monday, September 16, 2013

श्रीगणेश – मोह पाशांपासून मुक्ति I Shree Ganesh – Reliever from Bondages



आसक्ति मनुष्याला बद्ध करते.  हा मोहरूपी पाश आहे.  या मोहरूपी पाशामुळे विवेकबुद्धि भ्रष्ट होऊन मनुष्य अविवेकी होतो आणि अनेक प्रकारच्या मोहांना बळी पडतो.  भक्तांच्या या मोहरूपी पशांचा नाश करण्यासाठी श्रीगणेशाने हातात पाश धारण केलेला आहे.

विषयभोगतृष्णारूपी मोह तसेच स्रक्चंदनवनितादि यांनी निर्देशित केलेला मानसन्मान यश, कीर्ति, प्रतिष्ठा वगैरेंचा मोह, शारीरिक आणि इंद्रियोपभोग, सत्तेचा, धनाचा आणि स्त्रीचा या सर्व मोहांचा श्रीगणेश नाश करतो.

त्या भक्ताचे लक्ष पूर्ण विषयासक्त असते ते परमेश्वराकडे वळवितो.  त्याच्या मनात आस्तिक्य बुद्धि निर्माण करून परमेश्वराच्या पूजन, भजन, कीर्तनामध्ये प्रीति निर्माण करतो.  त्यामुळे तो परमेश्वराच्या कर्मानुष्ठानामध्ये प्रवृत्त होतो.  याचा परिणाम म्हणजे त्याची परमेश्वरामध्ये अधिक श्रद्धा, निष्ठा निर्माण होते.  त्यामाधुनच ईश्वराविषयीची तळमळ तीव्र होते.  त्याचे मन सहजपणे भजनपूजानामध्ये एकाग्र होते.  तन्मय होते.  म्हणजेच विषयांच्यामधून निवृत्त होऊन अंतर्मुख होतो.  त्यामध्ये त्याला खूप आनंद व समाधान मिळते.

परमेश्वराच्या कृपेने त्याच्या मनात सत्संगाची इच्छा निर्माण होते.  सत्संगाच्या दृढ संस्कारामुळे आणि आचार्यांनी केलेल्या शास्त्रोपदेशामुळे विचारप्रवृत्त होऊन विषयदोषदर्शनामुळे विषयांचे खरे स्वरूप – अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं आणि मिथ्यात्वं – समजते.

श्रीगणेश अज्ञानी जीवांच्याप्रमाणे पाशाने बद्ध नसून तो मुक्त आहे.  यामुळेच तो भक्तांचा पाश नष्ट करणारा आहे.  बंधनातून मुक्त करणारा आहे.  म्हणून गणपतिसहस्त्रनामात ‘पाशविमोचक’ असे गणपतीस संबोधिले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ

Sunday, September 15, 2013

श्रीगणेश – एकदन्त I Shree Ganesh – The Master of Illusion



एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि |
तन्नो दन्ती प्रचोदयात् |

आम्ही एकदन्ताला जाणतो.  त्या वक्रतुण्डाचे आम्ही ध्यान करतो.  तो एकदन्त आम्हाला प्रेरणा देवो.’

या गायत्री मंत्रामध्ये ‘एकदन्त’ शब्दामध्ये ‘एक’ शब्द मायावाचक असून ‘दन्त शब्द सत्तावाचक आहे.  या दोघांचा संयोग म्हणजे एकदन्त होय.  एक शब्दाने निर्देशित केलेल्या मायेचा सत्ताधीश म्हणजे मायाधीश किंवा मायाधिपति परमेश्वर होतो.  तो श्रीगणेशस्वरूप असून तो सगुण ब्रह्मस्वरूप आहे.  त्याला आम्ही जाणतो.

‘एक’ शब्द मायावाचक असून त्या मायेमधून सर्व ‘जगत’ उत्पन्न झालेले आहे.  ती माया भ्रान्तीला उत्पन्न करून मोह निर्माण करणारी आहे आणि नाना प्रकारच्या जगताच्या रूपाने खेळ-क्रीडा करणारी असून पूर्ण आहे.  म्हणून मायेचे पहिले कार्य विश्व निर्माण करणे व दुसरे कार्य जीवांच्या बुद्धीवर मोहाचे आवरण घालून अनेक प्रकारची भ्रान्ति निर्माण करणे होय.  ही भ्रान्ति अनंत अपार तऱ्हेने करून अगणित प्रकारे विश्वामध्ये क्रीडा करणारी आहे.

‘दन्त स्वरूप सत्तावाचक असून मायेचा स्वामी सत्ताधारण करणारा, मायेला स्वतःच्या अधीन ठेवणारा मायेचा चालक मायाधीश आहे.  तोच मायाधिपति प्रतिबिंबरूपाने मायेच्या उपाधीमुळे जीवरूपाला येतो आणि संसारी बनतो.  परंतु स्वतः मात्र मायेपासून अलिप्त राहून स्वस्वरूपाच्या स्वानन्द स्वरूपामध्ये रममाण असतो.

म्हणून जीव साक्षात परब्रह्मस्वरूप असूनही अज्ञानजन्य भ्रान्तिप्रत्ययामुळे जन्ममृत्यूरूपी संसारात अडकतो.  परंतु परब्रह्मस्वरूप मात्र जीवामध्ये कूटस्थअसंगचिद्रूपसाक्षीचैतन्यस्वरूपाने असंसारी रूपाने राहाते.  अशा ‘एकदन्त’ मायाधिपति श्रीगणेशाला जाणणे हेच भक्ताचे कर्तव्य आहे.  तोच पुरुषार्थ आहे.

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010


- हरी ॐ
 

Saturday, September 14, 2013

श्रीगणेश – कालत्रयातीतः I Shree Ganesh – Beyond Time




त्वं कालत्रयातीतः |

वर्तमान, भूत आणि भविष्य हे तीन काळ आहेत.  वर्तमानक्षणाच्या पूर्वी गेलेला काळ तो भूतकाळ होय आणि पुढे येणारा भविष्यकाळ होय.  त्यामुळे भूत आणि भविष्याला प्रत्यक्ष सत्ता नाही.  तर त्या दोन्हीही मनाच्या वृत्ति आहेत.

वर्तमान क्षणाला सत्ता असल्यामुळे काळाची प्रचीति फक्त वतर्मानक्षणामध्येच येते.  वर्तमानकाळ  ही सुद्धा मनाचीच कल्पना आहे.  जोपर्यंत मन व मनाचे व्यापार आहेत तोपर्यंत काळाची जाणीव आहे, अन्यथा काळाच्या कल्पनेचाच लय होतो.

गाढ सुषुप्ति अवस्थेत काळाचे अस्तित्वही नसते.  त्याची जाणीवही नसते, कारण मनाचे संपूर्ण व्यापार निद्रावस्थेत लय पावलेले असतात.  जागृत आणि स्वप्नामध्ये काळाच्या कल्पनेमुळे मृत्यूची कल्पना निर्माण होते.  परंतु झोपेत मात्र ‘मी मर्त्य आहे’ याची अंधुकशी सुद्धा जाणीव  शिल्लक राहात नाही.  म्हणून ‘काळ’ ही वास्तवता नसून ती मनाने निर्माण केलेली कल्पना असून मनानेच मनाच्या कल्पनेला दिलेली वास्तवता आहे.

मग वर्तमान, भूत आणि भविष्य या तीन्हीही कल्पनांना स्वतःची सत्ता नसेल तर यांना सत्ता कोणी दिली?  कोणाच्या सत्तेमुळे या तीन काळांची जाणीव होते?

साक्षीचैतन्यामुळेच या तीन्हीही काळाच्या कल्पना प्रकाशमान होतात आणि त्यांची जाणीव होते.  साक्षीचैतन्य हेच काळाला सत्ता देते.  म्हणून कूटस्थसाक्षीचैतन्य हे वर्तमान – भूत – भविष्य या तीन्हीही काळाच्या अतीत असल्यामुळे काळाने परिच्छिन्न होत नाही.  त्यामुळे ते जन्ममृत्यूरहित किंवा उत्पत्तिस्थितिलयरहित आहे.  हे गणपतीचे स्वरूप आहे.  म्हणून येथे श्रीगणेशाला ‘कालत्रयातीतः’ असे म्हटले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010


- हरी ॐ



 

Friday, September 13, 2013

श्रीगणेश – विश्व तुझी प्रचीती I World is your Manifestation



सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति |
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |

नानाविध रूपांनी प्रचीतीला येणारे, सावयव, देशकालवस्तूने परिच्छिन्न असलेले, विकारयुक्त, अनित्य विश्व परब्रम्हस्वरूप गणेशामधून निर्माण झाले, त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये लय पावते.  हे गणपते ! तूच हे विश्वस्वरूप असल्यामुळे तुझ्या स्वरूपामध्येच विश्वाची प्रचीति येते.

ज्याप्रमाणे लाटा – तरंग – बुडबुडे वगैरे पाण्यातुनच निर्माण झाले असल्यामुळे पाण्यातच अस्तित्वात आहेत.  त्यामुळे स्थितिकाळामध्ये त्यांची प्रचीति पाण्यामध्येच येते.  एवढेच नव्हे तर पाण्याशिवाय तरंगबुडबुडयांचा अनुभवच येत नाही.  म्हणून जेथे जेथे तरंगांचा अनुभव येतो तेथे तेथे पाण्याचा अनुभव येतो, कारण पाणी हे तरंगांचे अधिष्ठान आहे.  त्यामुळे तरंगबुडबुडयाच्या रूपाने पाण्याचीच प्रचीति येते किंवा अलंकारांच्या रूपाने सोन्याची प्रचीति येते.

त्याचप्रमाणे हे गणपते, तूच मायेच्या साहाय्याने नानाविध रुपाला प्राप्त होऊन, ब्रह्म होऊन, द्रष्टा आणि दृश्य रूपाने प्रचीतीला येतोस.  म्हणून तूच विश्वात्मक झालेला विराटस्वरूप आहेस.

भक्तांच्यावर कृपा आणि अनुग्रह करण्यासाठी तू सगुण, साकार रुपाला प्राप्त होतोस.  म्हणून हे सर्व विश्व तुझी विभूति किंवा महिमा आहे.  त्यामुळे माझे म्हणण्यासारखे या विश्वात काहीच नाही.  सर्व तुझे आहे.  इतकेच नवे तर हे शरीर सुद्धा माझे नाही.  ते तुझेच रूप आहे.  प्रत्येक ठिकाणी तुझीच प्रचीति येते.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ