Showing posts with label Time. Show all posts
Showing posts with label Time. Show all posts

Tuesday, August 25, 2020

उपासना केव्हा करावी? | Ideal Time for Mind Practice




उपासना ही कधीही, केव्हाही करू नये.  काही साधक दुपारी बारा वाजता किंवा रात्री उपासना करतात.  परंतु ब्राह्ममुहुर्त ही उपासनेसाठी सर्वांत उत्कृष्ट वेळ आहे.  याचे कारण आपल्यामध्ये सत्व-रज-तम या गुणांचा प्रभाव आहे.  त्याचप्रमाणे विश्वामध्येही प्रकृतीचे हे तिन्हीही गुण अंतर्भूत आहेत.  

पहाटे ब्राह्ममुहुर्ताला संपूर्ण सृष्टि ही सत्वगुणप्रधान असते.  सूर्योदयापासून पुढे हळुहळू सृष्टीवर रजोगुणाचा प्रभाव असतो आणि सूर्यास्तानंतर रात्री पहाटेपर्यंत सृष्टि तमोगुणप्रधान असते.  रात्रीच्या वेळी नीरव शांतता असेल तरी रात्रीची शांतता, दुपारची शांतता आणि ब्राह्ममुहुर्ताची शांतता यात खूप फरक आहे.  सृष्टीच्या या गुणांचा परिणाम आपल्या मनावरही होत असतो.  

पहाटेच्या वेळी आपले मनही सत्वगुणप्रधान असते.  मनामधील रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव अत्यल्प असतो.  त्यामुळे मन प्रसन्न, शांत, आल्हाददायक असते व बाहेरील सृष्टि सुद्धा अत्यंत प्रसन्न असते.  त्याचवेळी उपासना करावी.  

याउलट सूर्योदयानंतर आपले मनही रजोगुणप्रधान होऊन शरीर, इंद्रिये अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतात.  मनामध्ये कामक्रोधादि विकार क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येत असतात.  असे मन उपासनेमध्ये एकाग्र होत नाही.  

तसेच सूर्यास्तानंतर जसजशी रात्र होते, तसतसा तमोगुणाचा प्रभाव वाढतो.  जसे अंधारामध्ये हिंस्त्र श्वापदांची शक्ति वाढते, त्याचप्रमाणे तमोगुण वर्धन पावला असताना मनामधील राक्षसी प्रवृत्ति प्रबल होतात.  कामवासना उद्दीपित होते.  तसेच शरीर, इंद्रिये व्यापारशून्य होऊन सुंद होतात.  त्यावेळेस मनुष्य निद्रावश होतो.  त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीर, इंद्रिये दिवसभराच्या श्रमामुळे थकलेली असताना, अशा जड, सुंद झालेल्या शरीराने मनही सुंद होते.  असे शरीर व मन उपासना करू शकत नाही.  यामुळे पहाटेच्या वेळी ब्राह्ममुहुर्तालाच उपासना करावी.   


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ


Sunday, January 26, 2020

काळात हरविलेले आयुष्य | Life Lost in Time




कालबद्ध जीवनामध्ये मनुष्य अनेक विषय पाहतो.  त्यामधील काही विषय, काही भोग किंवा काही व्यक्ति त्याला आकर्षित करतात.  त्यामधूनच त्याच्या मनात त्या-त्या विषयांच्या कामना म्हणजेच भोगेच्छा निर्माण होतात.  पैसा मिळविणे, ऐहिक समृद्धी, भरभराट करणे, प्रजोत्पत्ति करणे, मुलांचे संगोपन करणे, त्यांना मोठे करणे, इतकेच आपल्याला आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य वाटते.  

अध्यात्ममार्गामध्ये थोडीशी आवड निर्माण झाली की, मनुष्य या मार्गामध्ये प्रवेश करतो.  स्वतःला साधक म्हणून घेतो.  शास्त्र ऐकून खूप साधना करावी, खूप जप करावा, खूप भजन पूजन करावे, असे वाटते.  परंतु मनुष्य विचार करतो की, सध्या खूप कामामध्ये व्यस्त आहे.  जरा कामाचा ताण कमी झाला की, आपण साधना करू. सध्या नोकरी आहे.  रिटायर झालो की, साधना करू.  कोणी-कोणी तर खास साधनेसाठी लवकरच रिटायर होतात.  

मग वाटते मुले खूप लहान आहेत, ती थोडीशी मोठी झाली की साधना करू.  नंतर मुलांचे शिक्षण झाले की करू.  मुलांना नोकरी लागून ते स्थिरस्थावर झाले की मग करू. नंतर मग वाटते, आता बास् !  शेवटचे कर्तव्य शिल्लक आहे.  मुलांचे विवाह पार पडले की सुटलो.  मग अध्यात्मच करायचे.  मुलांचे विवाह ही होतात.  घरात सुनबाई येतात.  परंतु मुक्त होण्याऐवजी माणसे त्यावेळी संसारामध्ये जास्तच अडकतात.  मग वाटते की, सूनबाई नवीन आहेत.  त्यांना आपल्या चालीरीति सर्व काही शिकवायला हव्यात.  तोपर्यंत नातू येतात.  मग तर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अगदी व्यस्त होऊन जाते.  मग तो साधक म्हणतो की, आता नातवांना सांभाळणे हेच आमचे कर्तव्य आहे.  बस्स !  तिथेच साधना संपते.  साधनेचा संकल्प संपतो.  

आपल्याला वाटते की, ही सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणे, इतकेच आपले जीवन आहे.  परंतु ही सर्व कर्तव्ये पूर्ण करता-करता मनुष्याचे आयुष्य निघून जाते.  मृत्यु समोर येतो, तरी कर्तव्ये संपत नाहीत.  मृत्यु समोर दिसला तरीही मनुष्याच्या इच्छा संपत नाहीत.  एका क्षणामध्ये कालरूपी मृत्यु झडप घालतो व मनुष्याचे जीवन, सर्वस्व हिरावून नेतो.  काळाला दयामाया नसते.  काळामध्ये उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, लहान-वृद्ध असा कोणताही भेद नसतो.  प्रत्येकाला वेळ आली की काळ गिळंकृत करतो.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Saturday, September 14, 2013

श्रीगणेश – कालत्रयातीतः I Shree Ganesh – Beyond Time




त्वं कालत्रयातीतः |

वर्तमान, भूत आणि भविष्य हे तीन काळ आहेत.  वर्तमानक्षणाच्या पूर्वी गेलेला काळ तो भूतकाळ होय आणि पुढे येणारा भविष्यकाळ होय.  त्यामुळे भूत आणि भविष्याला प्रत्यक्ष सत्ता नाही.  तर त्या दोन्हीही मनाच्या वृत्ति आहेत.

वर्तमान क्षणाला सत्ता असल्यामुळे काळाची प्रचीति फक्त वतर्मानक्षणामध्येच येते.  वर्तमानकाळ  ही सुद्धा मनाचीच कल्पना आहे.  जोपर्यंत मन व मनाचे व्यापार आहेत तोपर्यंत काळाची जाणीव आहे, अन्यथा काळाच्या कल्पनेचाच लय होतो.

गाढ सुषुप्ति अवस्थेत काळाचे अस्तित्वही नसते.  त्याची जाणीवही नसते, कारण मनाचे संपूर्ण व्यापार निद्रावस्थेत लय पावलेले असतात.  जागृत आणि स्वप्नामध्ये काळाच्या कल्पनेमुळे मृत्यूची कल्पना निर्माण होते.  परंतु झोपेत मात्र ‘मी मर्त्य आहे’ याची अंधुकशी सुद्धा जाणीव  शिल्लक राहात नाही.  म्हणून ‘काळ’ ही वास्तवता नसून ती मनाने निर्माण केलेली कल्पना असून मनानेच मनाच्या कल्पनेला दिलेली वास्तवता आहे.

मग वर्तमान, भूत आणि भविष्य या तीन्हीही कल्पनांना स्वतःची सत्ता नसेल तर यांना सत्ता कोणी दिली?  कोणाच्या सत्तेमुळे या तीन काळांची जाणीव होते?

साक्षीचैतन्यामुळेच या तीन्हीही काळाच्या कल्पना प्रकाशमान होतात आणि त्यांची जाणीव होते.  साक्षीचैतन्य हेच काळाला सत्ता देते.  म्हणून कूटस्थसाक्षीचैतन्य हे वर्तमान – भूत – भविष्य या तीन्हीही काळाच्या अतीत असल्यामुळे काळाने परिच्छिन्न होत नाही.  त्यामुळे ते जन्ममृत्यूरहित किंवा उत्पत्तिस्थितिलयरहित आहे.  हे गणपतीचे स्वरूप आहे.  म्हणून येथे श्रीगणेशाला ‘कालत्रयातीतः’ असे म्हटले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010


- हरी ॐ