Tuesday, September 10, 2013

ऋतं वच्मि सत्यं वच्मि | I Speak “ The Truth ”



ऋतं वच्मि सत्यं वच्मि | 
मी सत्य बोलतो.  मी बोलतो ते सत्यच आहे.

‘ऋत’ शब्दाचा मनाशी संबंध येतो आणि ‘सत्य’ शब्दाचा वाणीशी संबंध येतो.  जे अनृतात्मक असुर भावाच्या अभिमानाने रहित आहे ते ऋत आहे.  मी गणेशभक्त असल्यामुळे माझी बुद्धि, मिथ्या, कपटी कुटील किंवा अनृतात्मक नाही.  मी निष्कपट आहे.  म्हणून वेदांच्यामध्ये जे तुझे स्वरूप प्रकट केले आहे तेच बोलत आहे.

हे स्वरूप मनोकल्पित नाही, तर वेदप्रमाणजनित आहे.  इतकेच नव्हे, तर ही माझी अनुभूति आहे.  ‘ त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् | सर्वं खल्विदं ब्रह्म | अहं ब्रह्मास्मि | ’  हा माझा अनुभव आहे. म्हणून मी सत्य तेच बोलत आहे.  तसेच मी बोलतो ते ‘सत्या’ विषयीच आहे.

कर्मजन्य आणि ज्ञानजन्य नाश ज्या वास्तूमध्ये होत नाहीत तीच त्रिकालबाधित आणि तीन्हीही काळामध्ये असणारी ‘सत् वस्तु आहे.  हे गणपते, ते सत्स्वरूप तुझे असल्यामुळे तुझ्याच स्वरूपाविषयी मी बोलत आहे.  म्हणून ते सत्यच आहे.

शिव, विष्णु वगैरे देवता ईश्वरवाचक असून ब्रह्मस्वरूप प्रतिपादन करणाऱ्या आहेत.  परंतु गणेशदेहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ ईश्वरवाचक नसून ‘तत्त्वमसिमहावाक्याने दर्शविलेला जीवात्मक आणि ईश्वरात्मक असून त्यांच्यामधील संपूर्ण ब्रह्मात्मैक्य सिद्ध करणारा आहे.  हेच पारमार्थिक सत्य आहे.  ते मी बोलतो.

याप्रमाणे श्रीगणेशाचे तत्त्वमस्यात्मक असणारे पारमार्थिक स्वरूप सांगून ते सर्व भक्तांना त्यांच्याच हृदयामध्ये प्रत्यागात्मस्वरूपाने उपलब्ध आहे, हे प्रतिपादन केले.  म्हणून जे भक्त श्रीगणेशाचा आश्रय घेऊन त्याची अनन्य भक्ति करतात त्यांच्यावर प्रसन्न होऊन तो भक्तांच्या अधीन होतो, कारण अनन्य भक्तीने तो लुब्ध होतो.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ

 

1 comment: