Showing posts with label Yogi. Show all posts
Showing posts with label Yogi. Show all posts

Tuesday, May 13, 2025

योगी पुरुषाची अंतरंगाची अवस्था | Internal State Of A Yogi

 



योगी पुरुष हा व्यवहार करूनही सुषुप्तीप्रमाणे शांत असतो.  कारण सर्व दृश्यरूपी आभास जेथून उत्पन्न होतात, अशा आभासरहित ब्रह्मामध्ये तो स्थित असतो.  योगी पुरुष बहिरंगाने शरीर, इंद्रियादि उपाधींच्या साहाय्याने सर्व प्रकारचे व्यवहार करीत असतो.  परंतु त्याची बुद्धि मात्र एकाद्या झोपलेल्या मनुष्याप्रमाणे अत्यंत शांत असते.

 

ज्याला शांत झोप लागली आहे, अशा मनुष्यांच्या जागृत व स्वप्नामधील व्यवहार पूर्णतः थांबलेला असतो.  गाढ झोपलेल्या मनुष्याला कोणतेही विकार सतावत नाहीत.  त्याला बाह्य विषयांचे भान राहत नाही.  कामक्रोधादींचा प्रभाव क्षीण होतो. झोपल्यावर अहंकार आणि ममकारही राहत नाही.  बाह्य विषयांची तसेच स्वतःच्या शरीराची सुद्धा जाणीव संपते.

 

अशा या सुप्त मनुष्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषांची अंतरंगाची अवस्था असते.  त्यामुळे ज्ञानी पुरुष बाहेरून व्यवहार करीत असेल तरी त्याची बुद्धि मात्र अतिशय शांत व निर्विकार असते.  याचे कारण त्याचे मन ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित असते.  खरे तर ब्रह्मस्वरूपामधूनच सर्व आभास म्हणजे सर्व दृश्य, समष्टि विश्व आणि व्यष्टि जीव उत्पन्न होतात.  परंतु तरीही ब्रह्मस्वरूप मात्र निराभास म्हणजे आभासरहित, विकाररहित असते.  दृश्य जगताचा कोणताही परिणाम ब्रह्मस्वरूपावर होत नाही.  अशा या निर्विकार चैतन्यामध्ये ज्ञानी पुरुष नित्यनिरंतर स्थिर झाल्यामुळे बहिरंगाने सर्व क्रिया करूनही तो निष्क्रिय, निर्विकार, अलिप्त व अस्पर्शित राहतो.  हाच येथे अभिप्राय आहे. 

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, January 21, 2014

योग्याची लक्षणे | Characteristics of a Yogi

 
शुद्ध, निर्मळ, वैराग्यसंपन्न मनाने जो नित्य, निरंतर परमात्मस्वरूपावर अखंड चिंतन करतो त्याला आत्यंतिक आनंदाची प्राप्ति होते.  हेच योगाचे फळ आहे.  आणि हाच खरा योग आहे.  या आनंदाचे वर्णन आचार्यांनी केलेले आहे – तो आनंद उत्कर्ष-अपकर्षरहित, वृद्धी-क्षयरहित, तरतमभावरहित – निस्तरंग सहजस्वाभाविक स्वस्वरूपाचा आनंद आहे.
 
इंद्रियातीत असलेले फक्त शुद्ध आणि सूक्ष्म बुद्धीनेच अनुभवाला येणारे आत्यंतिक सुख जो योगी जाणतो तो परमात्मस्वरूपापासून कधीही विचलित होत नाही.  जे सुख प्राप्त झाले असताना त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ मानीत नाही आणि या अवस्थेत स्थित, दृढ झालेला योगी कितीही अति दारुण दुःखाच्या आघाताने विचलित होत नाही.
 
एकदंडी संन्याशासाठी सात प्रकारचे नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत.  ही आचारसंहिता आत्मसात करणे हेच दण्डि संन्याशाचे खरे तप आहे.
 
१. मौन
२. योगासन – आसनसिद्धि
३. योगचित्तवृत्तींचा निरोध
४. तितिक्षा – सहनशीलता
५. एकांतवासाची आवड
६. निस्पृहता
७. समत्व
 
मन आणि इंद्रिये यांची एकाग्रता करणे, हेच फार मोठे तप आहे.  अहंकाराचा नाश करून स्वस्वरूपामध्ये स्थिर राहाणे, हेच सर्वात मोठे तप आहे.
 
जो विद्वान पुरुष संपूर्ण वागिंद्रिये व त्यांचे व्यापार तसेच मनाचे सर्व व्यापार नियमित करून अप्रतिबद्ध, अखंडाकार वृत्तीने परब्रह्मस्वरूपाचे अखंड चिंतन करतो, त्याला निरतिशय ब्रह्मानंद प्राप्ति होते.  त्याचे मन निरुद्ध होऊन तो स्वतःच सुखस्वरूप होतो.
 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012
 
 
- हरी ॐ


Monday, January 13, 2014

योगी म्हणजे कोण ? | Who is a Yogi ?

 
योगाश्चित्तवृत्तिनिरोधः | तद्वान् योगी |  योग म्हणजे सर्व चित्तवृत्तींचा निरोध करणे होय.  चित्तामध्ये कोणतीही वृत्ति उठू न देणे म्हणजेच चित्ताचा निरोध होय.  योगाभ्यासाने ज्याला अशी अवस्था प्राप्त झालेली आहे तो योगी होय.
 
अथवा – योगः अहं ब्रह्मेति ज्ञानम् तद्वान् योगी |
‘ अहं ब्रह्मास्मि | ’ हे ज्ञान म्हणजेच योग होय, कारण हे ज्ञान अज्ञानजन्य द्वैतभावाचा ध्वंस करून जीवाला साक्षात् ब्रह्मस्वरूप करते आणि सर्व संसाराचा उच्छेद करते. असे एकत्वाचे, अद्वय ज्ञान प्राप्त झालेला आहे तो योगी आहे.
 
म्हणून म्हटले आहे – वृत्तिहीनं मनः कृत्वा क्षेत्रज्ञं परमात्मनि |
एकीकृत्य विमुच्यते योगोयं मुख्य उच्यते ||
मन वृत्तिरहित करून क्षेत्रज्ञस्वरूप परमात्म्यामध्ये स्थिर केल्यामुळे मुक्त होणे हाच योगाचा खरा अर्थ आहे.  यामुळे त्याची दृष्टि अमुलाग्र बदलून तो नित्य स्वस्वरूपामध्ये समाधीमध्ये राहातो.
 
श्रुति म्हणते -
यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः  |
जेथे जेथे मन जाते तेथे तेथे तो ब्रह्मज्ञानी पुरुष, योगी नित्य समाधि अवस्थेमध्ये असतो.
किंवा –      ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ||
 
भगवान गीतेत योगाची व्याख्या करतात -
तं विद्यादुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्  |  (गीता अ. ६ – २३)
दुःखरूप संसाराच्या संयोगापासून वियोग ह्यालाच योग म्हणतात.  कारण याच अवस्थेत मन सर्व अनात्मस्वरूप विषयांच्या संयोगापासून निवृत्त होऊन आत्मस्वरूपामध्ये अनायासाने स्वस्थ असते आणि तेथेच ते सुखाचा आत्यंतिक अनुभव घेते.
 
 
"मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012
 
 
- हरी ॐ