Tuesday, March 17, 2020

सुषुप्तीमधील आनंद | Bliss in Deep Sleep
सुषुप्तीमधील आनंद कसा आहे ?  आचार्य येथे दृष्टांत देतात.  ज्याप्रमाणे आपण व्यवहारात पाहतो की, एखादा मनुष्य आयासरहित, निरायास, काहीही कष्ट, परिश्रम न करता बसत असेल तर आपण त्याच्याविषयी बोलतो की, “व्वा !  काय छान बसला आहे.  याला काही काम नाही.  कष्ट नाहीत.  परिश्रम नाहीत.  सुखी प्राणी आहे !”  याचप्रमाणे सुषुप्ति अवस्था अनुभवणारा जीव हा आयासरहित, दुःखरहित असल्यामुळे त्याला येथे आनंदभुक्, ‘आनंदाचा भोक्ता’ असे म्हटले आहे.  

गाढ सुषुप्ति अवस्थेमध्ये प्रत्येकाला सुखाचा – आनंदाचा अनुभव येतो.  म्हणून तरी प्रत्येक मनुष्य दिवसभर खूप दमला, थकला, वैतागला की, आपण केव्हा झोपायला जाऊ, असे त्याला वाटते.  आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला खूप श्रम झाले की, आपण झोपेचा मार्ग स्वीकारतो.  सहज झोप येत नसेल तर झोपेची गोळी खातो किंवा पोट भर जेवतो.  शरीर सुंद झाले की, मन ही क्रमाने सुंद होते व आपल्याला गाढ झोप लागते.  सकाळी झोपेमधून उठलो की आपण म्हणतो – “मला खूप छान झोप लागली होती.  मी सुखाने झोपलो होतो.”  

यावरून सिद्ध होते की, सुषुप्ति अवस्थेमध्ये जीवाला आयास नसतात.  म्हणूनच तेथे जीव सुख भोगतो.  निद्रा संपवून जागृतावस्थेत येताक्षणीच मात्र द्वैतव्यवहार, मनाचे व्यापार प्रारंभ झाल्यामुळे जीवाला पुन्हा संसाराची, दुःखांची प्रचीति येऊ लागते.  जागृति व स्वप्न संपल्यानंतर जीव पुन्हा सुषुप्ति अवस्थेमध्ये जाऊन तेथे आनंदाचा भोक्ता होतो.  तोच या जीवाचा श्रेष्ठ आनंद आहे.  म्हणून प्रत्येक जीव झोपेवर प्रेम करतो.  

सुषुप्ति अनुभवणारा प्रज्ञानघन हा आनंदमय असेल तरी तो आनंदस्वरूप मात्र नाही, कारण हा आनंद स्वस्वरूपाचा, निरतिशय आनंद नाही.  तर ती अज्ञानाची अवस्था असून तेथे दुःखांचा अनुभव नाही.  म्हणून केवळ त्या अवस्थेला ‘आनंदमय’ म्हटले आहे, इतकेच !  गाढ निद्रेमधील आनंद हा आत्यंतिक निरतिशय होऊ शकत नाही.  - "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016


- हरी ॐ


No comments:

Post a Comment