Monday, April 29, 2024

अविचाररूपी निद्रा | The Stupor of Indiscrimination

 



हे राघवा !  अविचाररूपी निद्रा ही काजळाप्रमाणे काळी असून तिच्यामध्ये मदिरेचे धर्म आहेत.  म्हणून हे रामा !  तुझ्यामधून अशा निद्रेचा नाश होवो.  जसे मनुष्याला झोपेमध्ये काहीच कळत नाही, तसेच अविचार ही सुद्धा मनुष्याला दीर्घकाळ लागलेली निद्रा आहे.  एक वेळ रोजची झोप बरी !  कारण त्यामधून सकाळी मनुष्य जागृत होतो.  परंतु अविचाररूपी निद्रेमध्ये झोपलेल्या मनुष्याला असे वाटत असते की, आपल्याला सर्व काही समजते.  परंतु वस्तुतः त्याला काहीही समजत नसते.  अशी ही निद्रा काजळाप्रमाणे अत्यंत गडद म्हणजे अंधारमय, अज्ञानमय आहे.  तसेच मदिरेचे सर्व गुणधर्म या अविचाररूपी निद्रेमध्ये आहेत.  मदिरा प्याली की, जसे मनुष्याला धुंदी चढते, त्याला कसलीच शुद्ध राहत नाही.  मनुष्य विवेकभ्रष्ट झाल्यामुळे आपण काय बोलतो, काय करतो, याचे भान त्याला राहत नाही.  असे आचरण अविचारी पुरुषाचे असते.  म्हणून साधकामध्ये अविचाराचा एक अंश सुद्धा राहू नये.

 

विचाररहित, अज्ञानी मनुष्यामध्ये पुरुषाची बुद्धि अतिशय विकल, अशक्त होते.  बुद्धिमान पुरुषाच्या अंतःकरणामध्ये विवेकरूपी चंद्रप्रकाशामुळे सर्वच स्पष्ट दिसते.  परंतु अविचारी मनुष्याला मात्र कोणत्याच गोष्टीचे स्पष्टपणे ज्ञान होत नाही.  जसे लहान मुलाला अंधारात वेताळाची भीति दाखविली तर त्याला सगळीकडे वेताळच दिसायला लागतो.  त्यामुळे ते मूल भयग्रस्त होते.  तसेच अविचारी मनुष्याला सुंदर चंद्र सुद्धा एखाद्या दगडाप्रमाणे भासू लागतो.  थोडक्यात, विचारभ्रष्ट मनुष्य चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले मानू लागतो.

 

अविचारी मनुष्याचे मन म्हणजे दुःखरूपी धान्याचे कोठार असते.  जसे कोठारे धान्याने गच्च भरलेली असतात, त्याचप्रमाणे अविवेकी मनुष्याच्या मनात अनेक दुःखे असतात.  त्याच्यासमोर कोणी आले तर तो आपले दुःखचरित्र सांगण्यास सुरुवात करतो.  अशा या मनुष्यावर अनेक संकटे येतात.  अविचारी मनुष्याचे मन हे संकटरूपी लता-वेलींना वाढविणाऱ्या वसंत ऋतुप्रमाणे असते.  जेथे अविचार आहे, तेथे दुःख व संकटे येतात.  वसंत ऋतुमध्ये जशा लता-वेली बहरतात तसेच अविचारी मनुष्यावर दुःखांचा व संकटांचा वर्षाव होतो.  म्हणून हे रामा !  अशा अविवेकाचा व अविवेकी लोकांचा साधकाने दुरूनच त्याग करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ