Tuesday, May 18, 2021

भोगांची निरर्थकता | Futility of Sense Gratification

 



यमराजाकडून ऐहिक व स्वर्गीय भोगांचे रसाळ वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा नचिकेत्याच्या मनामध्ये कामनेने लेशमात्र प्रवेश केला नाही.  त्याचे मन एखाद्या सरोवराप्रमाणे धीरगंभीर, शांत, तरंगरहित, कामनारहित, क्षोभरहित, उद्रेगरहित, अविचल राहिले.  असा हा प्रखर वैराग्यशील असणारा नचिकेत यमराजाला म्हणतो – हे यमराजा !  तू आता ज्या ज्या भोगांचे वर्णन केलेस, ते सर्व भोग उद्या असतील की नसतील याबद्दल काहीच सांगू शकत नाही.  त्यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होते, कारण हे सर्व भोग कर्मामधून निर्माण झालेले असल्यामुळे नाशवान आहेत.  

 

जे जे जन्माला येते, ते सर्व काळाच्या ओघात निश्चितपणे नाश पावते.  हा विश्वाचा नियम आहे.  हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  विश्वामध्ये कोणतीही वस्तु शाश्वत, चिरंतन नाही.  या सर्व भोगांना भोगणारा भोक्ता मनुष्यही मर्त्य आहे.  तूच या सर्व मनुष्यांचा मृत्युरूपाने नाश करतोस.  कितीही दीर्घायुष्य मिळाले तरी एक ना एक दिवस या शरीराचा मृत्यु अटळ, अपरिहार्य आहे.  

 

ज्यावेळी मनुष्य इंद्रियांच्या साहाय्याने विश्वामधील सुंदर, मोहक, आकर्षक विषयांचा, कनक-कांचन-कामिनी यांचा उपभोग घेतो, तेव्हा इंद्रियांची शक्ति क्षीण होत जाते.  भोगून-भोगून शेवटी इंद्रिये शक्तिहीन, गलितगात्र होतात. इंद्रियांचे तेज, सामर्थ्य कमी होते.  या स्वैर इंद्रियभोगांच्यामुळे मनुष्यामधील धर्मप्रवृत्ति, वीर्य, प्रज्ञाशक्ति, तेज, यश या सर्वांचा ऱ्हास होतो.  इंद्रिय व विषय यांच्या संयोगामधून सुखाचा क्षणिक आभास निर्माण होतो, परंतु ते सुख मनुष्याला खऱ्या अर्थाने सुखी करू शकत नाही.  तृप्त करू शकत नाही.  

 

भर्तृहरि वर्णन करतात –    

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः |  तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ||

तपो न तप्तं वयमेव तप्ताः |  कालो न यातो वयमेव याताः ||            (वैराग्यशतक)

आपण जीवनभर भोग भोगले नाहीत, तर उलट भोगांनीच आपल्याला भोगले.  आपली तृष्णा जीर्ण झाली नाही, तर आपणच जीर्ण झालो.  आपण तपाचरण केले नाही, तर आपण तप्त झालो, काळ पुढे गेला नाही तर आपणच काळाच्या ओघात पुढे गेलो.  

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ




Tuesday, May 11, 2021

आत्मस्वरूप दाखविता येत नाही | “Showing” Self-Knowledge

 



अध्यात्ममार्गामध्ये आल्यानंतर शिष्याच्या गुरूंच्याकडून खूप अपेक्षा असतात.  गुरुंच्याकडे आल्याबरोबर गुरूंनी काहीतरी चमत्कार करावा.  अनेक साधकही आश्रमामध्ये येतात.  गुरूंच्यासमोर बसतात व विचारतात, “हे गुरो !  आत्म्याचे दर्शन घडवून द्या. काहीतरी करा.  देव कोठे आहे, दाखवा”.  काही साधकांना तर फोनवरून आत्मज्ञान हवे असते.  काहींना इंटरनेटवरून हवे असते.  या कलियुगात साधकांचे सुद्धा विविध प्रकार आहेत.  साधकांच्या अशा प्रश्नांना उत्तरेच नाहीत, कारण श्रुति येथे सांगते – न तत्र चक्षुः गच्छति...|

 

आपण व्यवहाराप्रमाणे अध्यात्माचे फळ दृश्य रूपात पाहण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न करतो.  वर्षानुवर्षे आत्मसाक्षात्काराची वाट पाहतो.  दुर्दैवाने बहिरंगाने काहीही मिळत नाही.  त्यावेळी मात्र साधक निराश, भकास होतो.  आपल्या नैराश्याचे खापर शास्त्रावर, गुरुंच्यावर फोडतो.  या मार्गापासून च्युत होतो.  याचे कारण एकच आणि ते म्हणजे साधकाने आत्मस्वरूपाविषयी केलेल्या चुकीच्या कल्पना !

 

म्हणुनच येथे श्रुति स्पष्टपणे सांगते की, यथैतदनुशिष्यात् |’  श्रुतीच्या या विधानाचा येथे विशेष अर्थ आहे.  “आत्मस्वरूपामध्ये चक्षुरादि इंद्रिये व मन पोहोचू शकत नसल्यामुळे शिष्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे द्यावे, हे आम्ही जाणत नाही.  त्याला कसे शिकवावे ?  हे आम्हाला समजत नाही.”  असे येथे गुरूंचे विधान आहे.

 

यावरून समजते की, येथे गुरु कोणत्याही प्रकारे शिष्याला घटादि दृश्य पदार्थाप्रमाणे किंवा सुखदुःखादि अनुभवांच्याप्रमाणे आत्म्याचे ज्ञान देण्यास तयार नाहीत.  याचे कारण आत्मा हा ज्ञानाचा दृश्य, इंद्रियगोचर, ज्ञेय विषय कदापि होऊ शकत नाही.  असा गुरूंचा, श्रुतीचा, शास्त्राचा ठाम निर्णय आहे.  त्यामुळे आत्म्याला कोणत्याही घटादिवत् किंवा विश्वामधील एखाद्या दृश्य विषयाप्रमाणे जाणण्याचा प्रयत्न करू नये, हेच श्रुतीने येथे सूचित केलेले आहे.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Tuesday, May 4, 2021

संसार हा अनर्थकारी का आहे ? | Why Manifestation is Meaningless?

 



संसाराचे वर्णन करीत असताना आचार्यांनी शब्द वापरला आहे – अनेकानर्थसंकुलः संसारः |  संसार हा अनेक अनर्थांचे संकुल आहे.  संसारामध्ये एकामागून एक अशी अनेक संकटे येत राहतात.  आचार्य संसाराचे स्वरूप समजावून देण्यासाठी अनेक दृष्टान्त देतात.  संसार हा मरुमरीचिकावत् |  आहे.  वाळवंटामध्ये उन्हामध्ये वाळू चमकल्यावर वाळूवर जसे भासात्मक पाणी दिसते, तसेच हा संसार भासात्मक, मिथ्या आहे.  दुरून पाहिल्यावर संसारामध्ये, विषयांच्यामध्ये, भोगांच्यामध्ये सुखाचा भास निर्माण होतो.  परंतु जवळ गेल्यावर, प्रत्यक्ष अनुभवत असताना मात्र सुखाची प्राप्ति होत नाही.  मृगजळ जसे आपली तहान भागवू शकत नाही, तसेच सांसारिक भोग मनुष्याला अंतरिक शांति व सुख देऊ शकत नाही.

 

हाच संसार – कदलिस्तम्बवत् |  निःसार आहे.  केळीचा खुंटा जसा बाहेरून हिरवागार, गुबगुबीत दिसतो.  त्याच्या आत काहीतरी असेल असे वाटते.  परुंतु बाहेरून एकेक साल काढत गेले की, आतमध्ये काहीही शिल्लक राहत नाही.  तसेच संसार, विषय, भोग हे सर्व बाहेरून दिसायला छान दिसते.  परंतु संसाराच्या आत काहीही सार किंवा तथ्य नसते.  परंतु हे खूप उशीरा, वयाची अर्धी वर्षे उलटून गेल्यावर समजते.

 

संसार हा गन्धर्वपत्तनवत् |  आहे.  आकाशामध्ये जसे अनेक प्रकारचे ढग दिसतात, त्यामधून विविध आकार निर्माण होतात.  जणु काही आकाशात गंधर्वनगरी तयार होते.  परंतु पाहता-पाहता क्षणार्धात सर्व आकार बदलतात.  गंधर्वनगरी नाहीशी होते.  याप्रमाणेच, संसार क्षणाक्षणाला बदलणारा व गतिमान आहे.  आज आहे, तर उद्या नाही, असे सर्व विश्व आहे.  विषय, मनुष्याचे जीवन, उपभोग, माणसांचे एकत्र येणे हे सर्वच क्षणभंगुर, अनित्य आहे.

 

हा संसार रज्जुसर्पवत् |  मिथ्या आहे.  म्हणजेच दोरीवर भासमान होणाऱ्या सर्पाप्रमाणे अध्यस्त आहे.  तसेच, हा संसार ‘स्वप्नवत्’ आहे.  जसे स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न हे सत्यच भासते.  मात्र जागृत झाल्यानंतर स्वप्नामधील सत्यत्व बुद्धीचा निरास होतो.  तसेच दोरीचे, अधिष्ठानाचे ज्ञान झाल्यावर आरोपित केलेल्या अध्यस्त सर्पाचा व त्यामधून निर्माण झालेला भीतीचा निरास होतो.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Sunday, April 25, 2021

मोक्ष नित्यस्वरूपाचा आहे | Liberation is Ever Achieved

 



ज्याप्रमाणे नदी नावेच्या साहाय्याने पार करून गेल्यानंतर त्या पुरुषाला कोठे जावे, कसे जावे, याचे स्वातंत्र्य असते.  तरीही तो नाव सोडीत नाही, असे नाही.  म्हणजेच तो पुरुष नावेचा – साधनाचा त्याग करतो.  ही व्यवहारप्रसिद्धि आहे.  जी वस्तु स्वतःच सिद्ध आहे, तिची सिद्धि पुन्हा अन्य साधनांनी करण्याची इच्छा कोणीही करीत नाही.  त्याचप्रमाणे आत्मस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे.  आत्मस्वरूपाला सिद्ध करण्याची किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ति करण्याची आवश्यकताच नाही, कारण आत्मस्वरूप हे प्रत्येक जीवाचे स्वतःचेच स्वरूप असल्यामुळे ते नित्यप्राप्तस्वरूप आहे.

 

म्हणून ‘मी’ नेहमी ‘मी’च्या जवळच असतो.  इतकेच नव्हे, तर आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार अथवा बदल होत नाही.  याचे कारण आत्मस्वरूप हे नित्य, निर्विकार, अविषय आणि अमूर्त स्वरूपाचे आहे.  म्हणजेच आत्मा हा जन्म-मृत्युरहित, उत्कर्ष-अपकर्षरहित, इंद्रियअगोचर, अव्यय, निर्विशेष, निर्विकार स्वरूपाचा आहे.  श्रुति म्हणते – “न वर्धते कर्मणा” इत्यादि |  आत्मस्वरूप कर्माने वर्धन पावत नाही.

 

आत्मस्वरूपावर संस्कार करणेही शक्य नाही, कारण आत्मा हा नित्यशुद्धस्वरूपत्वात् |  तसेच संस्कार करण्यासाठी परस्परांच्यापासून भिन्न असणाऱ्या दोन वस्तूंची आवश्यकता आहे.  अन्य वस्तूने अन्य वस्तूवर संस्कार करता येतात.  परंतु आत्मस्वरूप हे आत्मस्वरूपाशी अभिन्न, एक असल्यामुळे कोण कोणावर संस्कार करणार ?  अन्यवस्त्वन्तराभावात् |  आत्मस्वरूपापासून भिन्न अशी कोणतीही वस्तु नाही.  म्हणून स्वतःच स्वतःवर संस्कार करण्याची कोणीही इच्छा करीत नाही.  एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर आरोप करणे किंवा एक वस्तु दुसऱ्या वस्तूला प्राप्त होणे, या गोष्टी नित्य स्वरूपाच्या होऊ शकत नाहीत.

 

याचा अर्थ आत्मस्वरूपावर कितीही अनात्म्याचे आरोप झाले तरी त्या सर्वांचा निरास होतो, कारण आत्मस्वरूप हे नित्यमुक्त, स्वभावसिद्ध स्वरूप आहे.  त्यामुळे आत्म्यावर संस्कार करण्याची किंवा काहीतरी कर्म करून आत्म्याला मुक्त करण्याची आवश्यकता नाही.  म्हणून मोक्ष हा नित्यस्वरूपाचा आहे, हे सिद्ध होते.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ




Tuesday, April 20, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘ॐ’ | Effects of Omkar Worship - ‘ॐ’

 



तीन मात्रांनी युक्त असणाऱ्या ओंकाराचे ध्यान करणाऱ्या उपासकाला तेजोमय असणाऱ्या सूर्यलोकाची प्राप्ति होऊन तो सूर्यमंडलस्थ पुरुषाशी म्हणजेच हिरण्यगर्भाशी एकरूप होतो.  त्याला हिरण्यगर्भावस्था प्राप्त होते.  शरीरपातानंतर तो उपासक सूर्यलोकाला गेल्यानंतर पुन्हा तो मृत्युलोकाला येत नाही.  त्यास तेथे ब्रह्माजीबरोबरच क्रममुक्ति प्राप्त होते.  ज्याप्रमाणे सर्प आपल्या जीर्ण त्वचेचा त्याग करतो व पुन्हा नवचैतन्य प्राप्त करतो, त्याचप्रमाणे उपासक उपासनेच्या साहाय्याने दैवीगुणसंपन्न होऊन सर्व पापांच्यापासून मुक्त होतो.  उपासनेच्या प्रभावाने साधकाच्या अंतःकरणामधील मल व विक्षेप हे दोष नाहीसे होतात.  रागद्वेषादि कलुषितता निघून जाते.  त्याचे मन अतिशय शुद्ध होते.  तोच हिरण्यगर्भाच्या ‘सत्य’ नावाच्या लोकाला जातो.

 

ज्याप्रमाणे सूत्र-म्हणजेच धागा सर्व मण्यांच्यामधून आरपार जाऊन त्यांच्यामध्ये एकसंधता ठेवतो, त्याचप्रमाणे हिरण्यगर्भ सर्व जीवांच्या आत राहून सर्वांच्यावर नियमन करतो.  तोच सूत्रात्मा प्राण, आनंदघन असून सर्वव्यापी, ईशनशील, नियामक आहे.  व्यष्टि, समष्टि, सात ऊर्ध्वलोक (भू: भुवः स्वः महः जनः तपः सत्यं), सात अधोलोक (अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल, महातल) या सर्वांच्यामध्ये सूत्रात्मा अनुप्रवेश करतो.  भगवान म्हणतात –

            क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत |    (गीता अ. १३-२)

 

सर्व भूतमात्रांच्यामध्ये अहं, अहं स्वरूपाने अनुभवायला येणारा क्षेत्रज्ञ हा मी-परमात्मा आहे.  मी-परमात्म्याने चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे.  तोच मी-परमात्मा सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा असून समष्टि लिंग शरीरामध्ये सर्व व्यष्टि जीव एकत्र झालेले आहेत.  म्हणून परमात्म्याला येथे ‘जीवघन’ असे म्हटले आहे.  परमात्मा हा व्यष्टि व समष्टीने युक्त, संपन्न आहे.

 

त्रिमात्रारूप ओंकाराचे ध्यान करणारा उपासक हा या जीवघन, हिरण्यगर्भ क्षेत्रज्ञापेक्षाही उत्तम श्रेष्ठ असणाऱ्या म्हणजेच कार्यकारणाच्या अतीत, क्षरअक्षराच्या अतीत असणाऱ्या परमात्मस्वरूपाला पाहतो.  तो उपासक परमात्म्याला जाणतो.  हेच ओंकारोपासनेचे फळ आहे.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, April 13, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘उ’ | Effects of Omkar Worship - ‘उ’

 



ओंकारउपासकाने एकेका मात्राची उपासना केली तरीही तो कधीही दुर्गतीला जात नाही.  त्याला त्याच्या साधनेचे फळ निश्चितच मिळते.

 

जो साधक ओंकाराच्या अकार व उकार या दोन मात्रांचे स्वरूप आणि त्याच्यामधील भेद जाणणारा असेल व तो ओंकाराच्या द्वितीय मात्रेला प्राध्यान्य देवून ओंकारउपासना करीत असेल, तर त्या साधकाला मनरूपी आत्मभाव प्राप्त होतो.  ‘उ’कार ही मात्रा ‘अ’कारापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे श्रेष्ठ आहे.  ‘उ’काराच्या उपासनेने साधक यजुर्वेदस्वरूप असणाऱ्या समष्टि सूक्ष्म शरीराशी म्हणजेच हिरण्यगर्भाशी तादात्म्य पावतो.  हिरण्यगर्भ म्हणजेच अपरब्रह्म किंवा कार्यब्रह्म होय.

 

व्यष्टि       १. व्यष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विश्व’

२. व्यष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘तैजस’

३. व्यष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘प्राज्ञ’

समष्टि      १. समष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विराट’

२. समष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘हिरण्यगर्भ’

३. समष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘मायावी’

 

ही उपासना करीत असताना प्रारब्धवशात् जर त्या साधकाच्या शरीराचा मृत्यु झाला तर मृत्युनंतर तो यजुर्वेदामधील मंत्रांच्या साहाय्याने अंतरिक्षामधील चंद्रलोकाला – सोमलोकाला प्राप्त होतो.  यजुर्वेद हा द्वितीय मात्रास्वरूप, ‘उ’कार स्वरूप आहे.  सोमलोकामध्ये गेल्यावर तो तेथे हिरण्यगर्भाचा महिमा अनुभवतो.  म्हणजेच त्याचे मन हिरण्यगर्भासारखेच शुद्ध, सत्त्वगुणप्रधान होते.

 

तेथे सोमलोकामध्ये महिमा अनुभवल्यानंतर तो उपासक पुन्हा मनुष्यलोकाला, मर्त्यलोकाला प्राप्त होतो.  थोडक्यात ‘अ’कार व ‘उ’कार या दोन्हीही मात्रांची भिन्न-भिन्नपणे उपासना करणाऱ्या दोन्हीही उपासकांना मर्त्यलोक प्राप्त होतो.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, April 6, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘अ’ | Effects of Omkar Worship - ‘अ’

 



जो साधक ‘अ’कार मात्रेची उपासना करतो, त्याच्यावर त्या उपासनेचा संस्कार होतो.  ‘अ’कार ही अत्यंत स्थूल मात्रा आहे.  ‘अ’काराचा उच्चारही स्थूल वाणीने केला जातो.  स्थूलाची उपासना म्हणजे विराटाची उपासना आहे.

 

व्यष्टि       १. व्यष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विश्व’

२. व्यष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘तैजस’

३. व्यष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘प्राज्ञ’

समष्टि      १. समष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विराट’

२. समष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘हिरण्यगर्भ’

३. समष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘मायावी’

 

याप्रमाणे ‘अ’काराची उपासना ही विराटाची उपासना असून उपासक विराटाशी तादात्म्य पावतो.  म्हणजेच तो समष्टि स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो.  या उपासनेचे फळ म्हणजेच, तो उपासक मृत्युनंतर शीघ्र पृथ्वीवर येऊन मनुष्ययोनीला प्राप्त होतो.  ऋगवेद हा ‘अ’कारस्वरूप असल्यामुळे ऋग्वेदामधील ऋचा त्या उपासकाला मनुष्यलोकाला घेऊन जातात.

 

ओंकाराची प्रथम मात्रा ऋगवेदस्वरूप असल्यामुळे तो उपासक मनुष्ययोनीला प्राप्त होऊन तो श्रेष्ठ द्विज होतो.  मनुष्ययोनीमध्ये येऊन तो उपासक कायिक-वाचिक-मानसिक तपश्चर्या करतो.  व्रत, वैकल्ये, उपासना करतो.  लहानपणापासुनच सर्वसंगपरित्याग करून तो कठीण ब्रह्मचर्यव्रताचे पालन करतो.  परमेश्वरावर नितांत श्रद्धा व अनन्य भक्ति ठेऊन तो सेवा, त्याग, समर्पण इत्यादि दैवी गुणांनी संपन्न होतो.  व्रतस्थ, तपस्वी जीवन जगतो.  त्याचे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न होते.  तो प्रसन्न मनाने स्वतःचाच महिमा अनुभवतो.  त्याची श्रद्धा कधीही डळमळीत होत नाही.  त्याच्या मनात कधीही गुरु, शास्त्र, ईश्वर यांच्याबद्दल विकल्प येत नाहीत.  तो सातत्याने उपासना करीत राहतो.  यामुळेच असा उपासक कधीही दुर्गतीला जात नाही.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012





- हरी ॐ