Tuesday, May 4, 2021

संसार हा अनर्थकारी का आहे ? | Why Manifestation is Meaningless?

 



संसाराचे वर्णन करीत असताना आचार्यांनी शब्द वापरला आहे – अनेकानर्थसंकुलः संसारः |  संसार हा अनेक अनर्थांचे संकुल आहे.  संसारामध्ये एकामागून एक अशी अनेक संकटे येत राहतात.  आचार्य संसाराचे स्वरूप समजावून देण्यासाठी अनेक दृष्टान्त देतात.  संसार हा मरुमरीचिकावत् |  आहे.  वाळवंटामध्ये उन्हामध्ये वाळू चमकल्यावर वाळूवर जसे भासात्मक पाणी दिसते, तसेच हा संसार भासात्मक, मिथ्या आहे.  दुरून पाहिल्यावर संसारामध्ये, विषयांच्यामध्ये, भोगांच्यामध्ये सुखाचा भास निर्माण होतो.  परंतु जवळ गेल्यावर, प्रत्यक्ष अनुभवत असताना मात्र सुखाची प्राप्ति होत नाही.  मृगजळ जसे आपली तहान भागवू शकत नाही, तसेच सांसारिक भोग मनुष्याला अंतरिक शांति व सुख देऊ शकत नाही.

 

हाच संसार – कदलिस्तम्बवत् |  निःसार आहे.  केळीचा खुंटा जसा बाहेरून हिरवागार, गुबगुबीत दिसतो.  त्याच्या आत काहीतरी असेल असे वाटते.  परुंतु बाहेरून एकेक साल काढत गेले की, आतमध्ये काहीही शिल्लक राहत नाही.  तसेच संसार, विषय, भोग हे सर्व बाहेरून दिसायला छान दिसते.  परंतु संसाराच्या आत काहीही सार किंवा तथ्य नसते.  परंतु हे खूप उशीरा, वयाची अर्धी वर्षे उलटून गेल्यावर समजते.

 

संसार हा गन्धर्वपत्तनवत् |  आहे.  आकाशामध्ये जसे अनेक प्रकारचे ढग दिसतात, त्यामधून विविध आकार निर्माण होतात.  जणु काही आकाशात गंधर्वनगरी तयार होते.  परंतु पाहता-पाहता क्षणार्धात सर्व आकार बदलतात.  गंधर्वनगरी नाहीशी होते.  याप्रमाणेच, संसार क्षणाक्षणाला बदलणारा व गतिमान आहे.  आज आहे, तर उद्या नाही, असे सर्व विश्व आहे.  विषय, मनुष्याचे जीवन, उपभोग, माणसांचे एकत्र येणे हे सर्वच क्षणभंगुर, अनित्य आहे.

 

हा संसार रज्जुसर्पवत् |  मिथ्या आहे.  म्हणजेच दोरीवर भासमान होणाऱ्या सर्पाप्रमाणे अध्यस्त आहे.  तसेच, हा संसार ‘स्वप्नवत्’ आहे.  जसे स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न हे सत्यच भासते.  मात्र जागृत झाल्यानंतर स्वप्नामधील सत्यत्व बुद्धीचा निरास होतो.  तसेच दोरीचे, अधिष्ठानाचे ज्ञान झाल्यावर आरोपित केलेल्या अध्यस्त सर्पाचा व त्यामधून निर्माण झालेला भीतीचा निरास होतो.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ