Tuesday, April 20, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘ॐ’ | Effects of Omkar Worship - ‘ॐ’

 



तीन मात्रांनी युक्त असणाऱ्या ओंकाराचे ध्यान करणाऱ्या उपासकाला तेजोमय असणाऱ्या सूर्यलोकाची प्राप्ति होऊन तो सूर्यमंडलस्थ पुरुषाशी म्हणजेच हिरण्यगर्भाशी एकरूप होतो.  त्याला हिरण्यगर्भावस्था प्राप्त होते.  शरीरपातानंतर तो उपासक सूर्यलोकाला गेल्यानंतर पुन्हा तो मृत्युलोकाला येत नाही.  त्यास तेथे ब्रह्माजीबरोबरच क्रममुक्ति प्राप्त होते.  ज्याप्रमाणे सर्प आपल्या जीर्ण त्वचेचा त्याग करतो व पुन्हा नवचैतन्य प्राप्त करतो, त्याचप्रमाणे उपासक उपासनेच्या साहाय्याने दैवीगुणसंपन्न होऊन सर्व पापांच्यापासून मुक्त होतो.  उपासनेच्या प्रभावाने साधकाच्या अंतःकरणामधील मल व विक्षेप हे दोष नाहीसे होतात.  रागद्वेषादि कलुषितता निघून जाते.  त्याचे मन अतिशय शुद्ध होते.  तोच हिरण्यगर्भाच्या ‘सत्य’ नावाच्या लोकाला जातो.

 

ज्याप्रमाणे सूत्र-म्हणजेच धागा सर्व मण्यांच्यामधून आरपार जाऊन त्यांच्यामध्ये एकसंधता ठेवतो, त्याचप्रमाणे हिरण्यगर्भ सर्व जीवांच्या आत राहून सर्वांच्यावर नियमन करतो.  तोच सूत्रात्मा प्राण, आनंदघन असून सर्वव्यापी, ईशनशील, नियामक आहे.  व्यष्टि, समष्टि, सात ऊर्ध्वलोक (भू: भुवः स्वः महः जनः तपः सत्यं), सात अधोलोक (अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल, महातल) या सर्वांच्यामध्ये सूत्रात्मा अनुप्रवेश करतो.  भगवान म्हणतात –

            क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत |    (गीता अ. १३-२)

 

सर्व भूतमात्रांच्यामध्ये अहं, अहं स्वरूपाने अनुभवायला येणारा क्षेत्रज्ञ हा मी-परमात्मा आहे.  मी-परमात्म्याने चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे.  तोच मी-परमात्मा सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा असून समष्टि लिंग शरीरामध्ये सर्व व्यष्टि जीव एकत्र झालेले आहेत.  म्हणून परमात्म्याला येथे ‘जीवघन’ असे म्हटले आहे.  परमात्मा हा व्यष्टि व समष्टीने युक्त, संपन्न आहे.

 

त्रिमात्रारूप ओंकाराचे ध्यान करणारा उपासक हा या जीवघन, हिरण्यगर्भ क्षेत्रज्ञापेक्षाही उत्तम श्रेष्ठ असणाऱ्या म्हणजेच कार्यकारणाच्या अतीत, क्षरअक्षराच्या अतीत असणाऱ्या परमात्मस्वरूपाला पाहतो.  तो उपासक परमात्म्याला जाणतो.  हेच ओंकारोपासनेचे फळ आहे.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ