Showing posts with label Sense. Show all posts
Showing posts with label Sense. Show all posts

Tuesday, August 18, 2026

विषयरूपी वाऱ्याने अस्वस्थ | Tossed-up By Sense Objects

 



साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर व शांत होतो.  त्यावेळी त्याच्या चित्तामधील सर्व इच्छा गळून पडतात.  मन, बुद्धी, इंद्रिये शांत होतात. ज्ञा नी पुरुष वासनाशून्य झाल्यामुळे त्याची कर्मे सुद्धा क्षीण होतात.

 

ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राचे बटन दाबले कि यंत्र चालू होते व पुन्हा दाबले कि ते बंद होते.  यंत्राला शक्ति मिळाली नाही की, आपोआपच शांत होऊन बंद पडते.  त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये वासना किंवा इच्छा उत्पन्न होत नसल्यामुळे ज्ञानी पुरुषाच्या क्रिया शांत होतात.  तसेच त्याला जगताचे मिथ्यात्व समजल्यामुळे शरीरयात्रार्थ कर्मे करूनही तो अकर्ताच राहतो.  ती कर्मे त्याला बद्ध करीत नाहीत.  सर्व शरीर प्रारब्धाला समर्पित करून तो शांतीने आणि आनंदाने राहातो.

 

पूर्वीच्या काळी एडक्यांचा खेळ होता.  दोरीच्या दोन टोकांना एडके बांधले जायचे.  त्यांच्यामध्ये एक नळी असायची.  नळीमधील दोरी जसजशी हलेल, तसतसे ते एडके हलायचे.  त्याप्रमाणेच हे रामा !  हे मनरूपी यंत्र चालण्यासाठी विषयभोगवासना हीच कारण आहे.  वासनाच मनुष्याच्या मनाला आयुष्यभर खेळवितात.  वासनांच्यामुळे मनुष्याचे मन सतत अस्वस्थ व अस्थिर होते.

 

हे रामा !  ज्याप्रमाणे वाऱ्याची हालचाल ही  वाऱ्यामध्येच होत असते, त्याचप्रमाणे विषयांच्या ज्ञानामध्येच इंद्रियांची हालचाल होत असते.  इंद्रियांचे सर्व व्यापार विषयोपभोगांमध्ये होतात.  म्हणून विषयरूपी वारा आला की, अज्ञानी लोकांचे मन अस्वस्थ व विकारयुक्त होते.  

 

परंतु याउलट आत्मज्ञान मात्र अत्यंत शुद्ध ज्ञान आहे.  जसजसे, अंतःकरणामध्ये आत्मज्ञान उदयाला येते, तसतसे ज्ञानी पुरुष अंतर्मुख होतो आणि त्याला सर्व पदार्थ, सर्व दिशा, सर्व काळ, या सर्वांचे दर्शन आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये होते.  म्हणजेच  तो संपूर्ण दृश्य विश्व आत्मचैतन्यस्वरूपामध्ये पाहतो.  हे संपूर्ण दृश्य विश्व भासमान व मिथ्या असून वस्तुतः आत्मस्वरूपामध्येच अधिष्ठित आहे, याचे त्याला ज्ञान असते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–




Tuesday, May 25, 2021

भोगप्रवृत्तीमुळे सर्वनाश | Sense Gratification Leads to Destruction



 

आजपर्यंत विश्वामध्ये विषयांचे स्वैर, उच्छृंखल उपभोग घेऊन कोणीही मनुष्य सुखी, आनंदी, कृतकृत्य झाला नाही.  तर उलट भोगांच्यामुळे मनुष्यजीवन अधःपतित झाल्याचे दिसते.  मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळी भोगप्रवृत्ति निर्माण होते, त्यावेळी मनुष्य प्रथम त्या विषयांची प्राप्ति करतो आणि येथेच्छ उपभोग घेतो.  त्यानंतर दुसरी कामना निर्माण करून तीही पूर्ण करतो.  याप्रमाणे सतत एकामधून दुसरी, तिसरी अशा अनंत कामना निर्माण करतो.  

 

जर सरळ मार्गाने आपली कामना पूर्ण झाली नाही तर मनुष्य वाममार्गाचे, अधर्माचरणाचे अनुसरण करतो.  त्याचवेळी त्याच्या मनात स्वार्थ, असूया, द्वेष, कपट, मत्सर वगैरे वृत्ति, कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर येतात.  तो स्वतःची कामना पूर्ण करण्यासाठी, स्वार्थ पूर्ण करण्यासाठी धर्म, सदाचार, न्याय, नीति झुगारून देतो.  विकारवश होऊन निंद्य, निषिद्ध कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  याप्रकारे विषयभोग मनुष्यामधील न्यायनिष्ठा, धर्मनिष्ठा, आचार-विचार-उच्चार यांचा नाश करून त्याला अधःपतित, स्वैर, पशुतुल्य बनवितात.  

 

म्हणूनच आज भोगवादी, चंगळवादी असणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांच्यामध्ये एका बाजुला प्रचंड मोठी, बुद्धीला थक्क करणारी वैज्ञानिक प्रगति आहे.  एका बाजूला डोळे दीपवणारी भोगसाधने आहेत.  बटन दाबले की, हातात सर्वकाही मिळते.  परंतु दुसऱ्या बाजूला सर्वांचे अंतरंग कामक्रोधादि भस्मासुरांनी पोखरून काढले आहे.  भोगवाद मनुष्याला कधीच शांति देऊ शकत नाही.  भोगवादाची परिणती युद्धांच्यामध्ये व महायुद्धांच्यामध्ये होऊन अंतिम दुःखामध्ये, अशांतीमध्ये होते.  हेच जगाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाने सिद्ध केलेले आहे.  

 

म्हणूनच हे यमराजा !  तू कितीही उपभोग दिलेस तरी ते अनित्य व दुःखस्वरूप आहेत.  भोग भोगण्यासाठी कितीही दीर्घायुष्य दिलेस तरी ते मुळातच नाशवान असल्यामुळे अल्पच आहे.  भोग भोगून इंद्रियेही गलितगात्र, तेजोहीन होतात.  परलोकही नाशवान आहे.  पुण्यसंचयाने ब्रह्मलोकापर्यंत गेले तरी पुण्यक्षयानंतर पुन्हा मर्त्यलोकातच यावे लागणार, हे निश्चित आहे.  

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ–





Tuesday, May 18, 2021

भोगांची निरर्थकता | Futility of Sense Gratification

 



यमराजाकडून ऐहिक व स्वर्गीय भोगांचे रसाळ वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा नचिकेत्याच्या मनामध्ये कामनेने लेशमात्र प्रवेश केला नाही.  त्याचे मन एखाद्या सरोवराप्रमाणे धीरगंभीर, शांत, तरंगरहित, कामनारहित, क्षोभरहित, उद्रेगरहित, अविचल राहिले.  असा हा प्रखर वैराग्यशील असणारा नचिकेत यमराजाला म्हणतो – हे यमराजा !  तू आता ज्या ज्या भोगांचे वर्णन केलेस, ते सर्व भोग उद्या असतील की नसतील याबद्दल काहीच सांगू शकत नाही.  त्यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होते, कारण हे सर्व भोग कर्मामधून निर्माण झालेले असल्यामुळे नाशवान आहेत.  

 

जे जे जन्माला येते, ते सर्व काळाच्या ओघात निश्चितपणे नाश पावते.  हा विश्वाचा नियम आहे.  हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  विश्वामध्ये कोणतीही वस्तु शाश्वत, चिरंतन नाही.  या सर्व भोगांना भोगणारा भोक्ता मनुष्यही मर्त्य आहे.  तूच या सर्व मनुष्यांचा मृत्युरूपाने नाश करतोस.  कितीही दीर्घायुष्य मिळाले तरी एक ना एक दिवस या शरीराचा मृत्यु अटळ, अपरिहार्य आहे.  

 

ज्यावेळी मनुष्य इंद्रियांच्या साहाय्याने विश्वामधील सुंदर, मोहक, आकर्षक विषयांचा, कनक-कांचन-कामिनी यांचा उपभोग घेतो, तेव्हा इंद्रियांची शक्ति क्षीण होत जाते.  भोगून-भोगून शेवटी इंद्रिये शक्तिहीन, गलितगात्र होतात. इंद्रियांचे तेज, सामर्थ्य कमी होते.  या स्वैर इंद्रियभोगांच्यामुळे मनुष्यामधील धर्मप्रवृत्ति, वीर्य, प्रज्ञाशक्ति, तेज, यश या सर्वांचा ऱ्हास होतो.  इंद्रिय व विषय यांच्या संयोगामधून सुखाचा क्षणिक आभास निर्माण होतो, परंतु ते सुख मनुष्याला खऱ्या अर्थाने सुखी करू शकत नाही.  तृप्त करू शकत नाही.  

 

भर्तृहरि वर्णन करतात –    

भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः |  तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ||

तपो न तप्तं वयमेव तप्ताः |  कालो न यातो वयमेव याताः ||            (वैराग्यशतक)

आपण जीवनभर भोग भोगले नाहीत, तर उलट भोगांनीच आपल्याला भोगले.  आपली तृष्णा जीर्ण झाली नाही, तर आपणच जीर्ण झालो.  आपण तपाचरण केले नाही, तर आपण तप्त झालो, काळ पुढे गेला नाही तर आपणच काळाच्या ओघात पुढे गेलो.  

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ–