यमराजाकडून ऐहिक व स्वर्गीय भोगांचे रसाळ
वर्णन ऐकल्यानंतर सुद्धा नचिकेत्याच्या मनामध्ये कामनेने लेशमात्र प्रवेश केला
नाही. त्याचे मन एखाद्या सरोवराप्रमाणे धीरगंभीर, शांत, तरंगरहित, कामनारहित, क्षोभरहित, उद्रेगरहित,
अविचल राहिले. असा हा प्रखर वैराग्यशील
असणारा नचिकेत यमराजाला म्हणतो – हे यमराजा ! तू आता ज्या ज्या भोगांचे वर्णन केलेस, ते सर्व
भोग उद्या असतील की नसतील याबद्दल काहीच सांगू शकत नाही. त्यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होते,
कारण हे सर्व भोग कर्मामधून निर्माण झालेले असल्यामुळे नाशवान आहेत.
जे जे जन्माला येते, ते सर्व काळाच्या ओघात
निश्चितपणे नाश पावते. हा विश्वाचा नियम
आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. विश्वामध्ये कोणतीही वस्तु शाश्वत, चिरंतन नाही.
या सर्व भोगांना भोगणारा भोक्ता मनुष्यही
मर्त्य आहे. तूच या सर्व
मनुष्यांचा मृत्युरूपाने नाश करतोस. कितीही
दीर्घायुष्य मिळाले तरी एक ना एक दिवस या शरीराचा मृत्यु अटळ, अपरिहार्य आहे.
ज्यावेळी मनुष्य इंद्रियांच्या साहाय्याने
विश्वामधील सुंदर, मोहक, आकर्षक विषयांचा, कनक-कांचन-कामिनी यांचा उपभोग घेतो,
तेव्हा इंद्रियांची शक्ति क्षीण होत जाते. भोगून-भोगून शेवटी इंद्रिये शक्तिहीन, गलितगात्र
होतात. इंद्रियांचे तेज, सामर्थ्य कमी होते. या स्वैर इंद्रियभोगांच्यामुळे मनुष्यामधील
धर्मप्रवृत्ति, वीर्य, प्रज्ञाशक्ति, तेज, यश या सर्वांचा ऱ्हास होतो. इंद्रिय व विषय यांच्या संयोगामधून सुखाचा
क्षणिक आभास निर्माण होतो, परंतु ते सुख मनुष्याला खऱ्या अर्थाने सुखी करू शकत
नाही. तृप्त करू शकत नाही.
भर्तृहरि वर्णन करतात –
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः | तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ||
तपो न तप्तं वयमेव तप्ताः | कालो न यातो वयमेव याताः || (वैराग्यशतक)
आपण जीवनभर भोग भोगले नाहीत, तर उलट
भोगांनीच आपल्याला भोगले. आपली तृष्णा
जीर्ण झाली नाही, तर आपणच जीर्ण झालो. आपण
तपाचरण केले नाही, तर आपण तप्त झालो, काळ पुढे गेला नाही तर आपणच काळाच्या ओघात
पुढे गेलो.
- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०११
- Reference: "Kathopanishad" by Param Poojya
Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011
- हरी ॐ–