Tuesday, November 17, 2020

संसार म्हणजे काय ? | Meaning of “Sansaar”

 


सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाने त्या त्या प्रमाणे कर्म घडतात आणि मनुष्याला त्या कर्माप्रमाणेच फळ प्राप्त होते.  याप्रमाणेच तीन गुण, त्यांचे कार्य आणि फळ यांच्या समूहालाच ‘संसार’ असे म्हणतात.  संसार म्हणजे गृहस्थाश्रम नव्हे.  संसार हा प्रत्यक्ष बाहेर नसून आपल्या मनामध्येच आहे.

 

चित्तमेव हि संसारः तत्प्रयत्नेन शोधयेत् |

यच्चित्तस्तन्मयो मर्त्यो गुह्यमेतत्सनातनम् ||

आपले चित्त म्हणजेच संसार होय, कारण चित्तामधील प्रत्येक वृत्तीशी मर्त्य जीव तादात्म्य पावतो.  चित्तामध्ये जी जी वृत्ति निर्माण होईल, त्यानुरूप मनुष्याची प्रवृत्ति दिसते.  मनुष्य त्या गुणांच्या आहारी जातो.  मनामध्ये कर्तृत्वादि अहंकार निर्माण करून अनेक कर्मे करतो आणि भोक्तृत्व बुद्धीमुळे मी सुखी-मी दु:खी या कल्पना करवून घेतो.  मनानेच मनामध्ये हा रागद्वेषात्मक, सुखदु:खात्मक संसार निर्माण करतो.  श्रुति म्हणते – मनःस्पंदितम् इति |  हा सर्व संसार मनानेच कल्पित केलेला आहे.

 

भगवान गौडपादाचार्य म्हणतात – हे सर्व चराचरात्मक, द्वैतात्मक, दृश्य विश्व मनानेच निर्माण केलेले आहे.  मन आहे तोपर्यंतच संसार आहे.  ज्यावेळी मन अमनीभावाला प्राप्त होते, मनाचा लय होतो त्यावेळी या द्वैतप्रपंचाचाही निरास होतो.  

 

म्हणून भगवान सुद्धा अर्जुनाला उपदेश करतात – निस्त्रैगुण्यो भवार्जुन | (गीता अ. २-४५)

हे अर्जुना ! हा सर्व संसार त्रिगुणात्मक असल्यामुळे हे तीन गुण जीवाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे संकल्प निर्माण करून त्याला कर्म-कर्मफळाच्या दुष्ट चक्रामध्ये बद्ध करतात.  म्हणून तू या त्रिगुणांच्याही अतीत हो.  म्हणजेच त्रिगुणांच्या आहारी जाऊ नकोस.  इंद्रियांच्यावर, मनावर संयमन करून त्यांना धर्माचरणामध्ये, ईश्वरचिंतनामध्ये रममाण करावे.  दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष करावा.  जीवन जगत असताना अंतरिक दृष्टि बदलावी.  हीच अंतरंग साधना आहे.  मनानेच मनामध्ये प्रयत्न करावेत आणि मनोकल्पित संसाराचा निरास करण्याचा प्रयत्न करावा.  

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ