हे रामा ! या विश्वाची निर्मिती अविचारामधून झालेली आहे.
भीति, शोक, मोह यांनी युक्त असणारा हा संसार खरे तर रज्जुवरील सर्पाप्रमाणे अस्तित्वातच
नाही. परंतु तरीही अनुभवायला येत असेल तर त्याचे
अविचार हेच एकमेव कारण आहे. जसे दोरीचे
अज्ञान असल्यामुळे मनुष्य दिसणाऱ्या सापामध्ये विचार न करताच तो साप खरा आहे, असे गृहीत
धरतो. त्यामुळे अविचारामधून सर्प निर्माण होतो.
तसेच आज आपणास अनुभवायला येणारा हा संसार,
सुख-दुःखे, यातना यामध्ये विचार न केल्यामुळे संसाराची उत्पत्ति होते. संसार सत्य भासतो.
या सर्वांना वास्तविक सत्ता नसून
भासात्मक असणारी मनाच्या कल्पनेची सत्ता आहे. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत संसार आहे. मनाचा लय झाला की, संसाराचा सुद्धा आपोआप लय होतो. जसे गाढ निद्रावस्थेमध्ये मन लय पावल्यामुळे
आपल्याला सुखदुःखादि संसाराचा लेशमात्रही अनुभव येत नाही. परंतु मन जागृत झाल्यानंतर पुन्हा संसाराचा अनुभव
येतो. म्हणून संसाराचा नाश करावयाचा असेल
तर मनामध्येच विचार करून शोध घेतला पाहिजे.
जसजसे आपण या मनाचा विचार करतो,
तसतसे मनही नाहीसे होते. कारण मन सुद्धा निर्मित
कार्य असून नाशवान आहे. 'मन' ही एक वृत्ति
किंवा कल्पना आहे. जे मन आपल्याला अनेक विकार निर्माण करून त्रस्त करते,
आयुष्यभर नाचविते, त्या मनाला साधकाने प्रश्न विचारावा की, हे मन आले कोठून ? मनाचे उगमस्थान कोणते आहे ? ही सर्व सुख-दुःखे, नैराश्य, उद्विग्नता, विक्षेप
हे सर्व कोठून निर्माण झाले ? याचा शोध घेत
घेत आपण सखोल विचार करायला लागतो तर हे सर्व जादूसारखे नाहीसे होते. संसाराचे, या कल्पनांचे अस्तित्व संपते. मन, सुखदुःखादि
अनुभव, शोक-मोह या सर्व भ्रमाचा निरास होतो आणि या सर्वांचे अधिष्ठान असणारे आत्मचैतन्यस्वरूप
फक्त शिल्लक राहते.
जन्मानुजनमे वर्धन केलेल्या संसाराचा
नाश क्षणार्धात विचाररूपी शस्त्राने करता येतो. म्हणून हे राघवा ! मायेपासून संरक्षण करण्यासाठी विचार हे एकमेव
साधन आहे. शास्त्रकार मायेची व्याख्या
करतात - विचारं न सहते इति माया | जिला
विचार सहन होत नाही, म्हणजे विचारापुढे जिचे अस्तित्व टिकत नाही, तिला 'माया' असे म्हणतात.
म्हणून संसाररूपी निर्माण केलेली दीर्घ कल्पना,
हा संसारवेताळ विचारानेच नष्ट होतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–