आज
आपल्याला सतत विश्वामधील दृश्य विषय व भोग पाहण्याचीच इंद्रियांना सवय लागलेली
आहे. त्यामुळे मन सतत विषयाभिमुख व
बहिर्मुख होते. मनामध्ये रागद्वेषादि
विकार निर्माण होतात. परंतु पूजेसारख्या
साधनांनी मन क्रमाक्रमाने ईश्वराभिमुख होऊ लागते. मनाने निदान काही काळ तरी ईश्वरचिंतन होऊ लागते.
श्रीमद्भागवतामध्ये
भगवान स्वतःच उद्धवाला मनाच्या शुद्धीसाठी पूजा व पूजेला अनुकूल असणारी अनेक कर्म
व साधना यांचे वर्णन करतात. भगवान उद्धवास
मोठ्या प्रेमाने सांगतात की, उद्धवा ! भक्ताने
सर्वांना माझ्या अवताराच्या – जन्माच्या व लीलांच्या कथा सांगाव्यात. माझी जयंती वगैरे उत्सवांच्यामध्ये आनंदाने व
उत्साहाने भाग घ्यावा. गायन, नृत्य,
वादन, कथा यांच्या साहाय्याने मंदिराच्यामध्ये माझे उत्सव साजरे करावेत. वार्षिक पर्वकाळांच्यामध्ये सर्व ठिकाणी
तीर्थयात्रा करून विधिपूर्वक पूजा कराव्यात.
वेदविहित
व तंत्रोक्त दीक्षा घेऊन त्याप्रमाणे मत्परायण होऊन व्रतांचे अनुष्ठान करावे. माझ्या मूर्तिस्थापनेमध्ये पूर्ण श्रद्धा
ठेवावी. स्वतः तसेच सर्वांनी मिळून उद्याने
व माझ्या सुंदर मंदिरांचे निर्माण करावे, तसेच माझ्या मंदिरातील केर काढावा,
सडा घालावा, जमीन गोमयाने सारवून घ्यावी, त्यावर सुंदर रांगोळी घालावी. अशा प्रकारे एखाद्या दासाप्रमाणे, सेवकाप्रमाणे
माझ्या गृहाची – मंदिराची निष्कपट भावाने सेवा करावी.
ही सर्व
कर्मे भक्तिभावाने करणारे भक्त परमेश्वराला अतिशय प्रिय होतात. अशा पूजेमध्ये मनही तल्लीन होते. मन रागद्वेषरहित, विकाररहित, अत्यंत शुद्ध व
निर्मळ होते. विश्वाचे भान, विषयांचे भान
संपते. भोगासक्ति कमी होऊन विषयांबद्दल
वाटणारे आकर्षण कमी-कमी व्हायला लागते. मन
त्या चैतन्यमय असणाऱ्या सगुण रूपाशी एकरूप होते. तिथे मी व परमेश्वर इतकेच शिल्लक राहते. कारण तिथे परमेश्वर म्हणजे केवळ एक विग्रह न
राहता तो भक्तासाठी साक्षात चैतन्याचा पुतळा होतो. ती चैतन्यस्वरूपाचीच पूजा होते. भक्ताला समोर, बाहेर, आत सर्व ठिकाणी
चैतन्यस्वरूपाचे दर्शन होते.
- "भज
गोविंदम् |” या
परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम
आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
- Reference: "Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment