Tuesday, April 20, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘ॐ’ | Effects of Omkar Worship - ‘ॐ’

 



तीन मात्रांनी युक्त असणाऱ्या ओंकाराचे ध्यान करणाऱ्या उपासकाला तेजोमय असणाऱ्या सूर्यलोकाची प्राप्ति होऊन तो सूर्यमंडलस्थ पुरुषाशी म्हणजेच हिरण्यगर्भाशी एकरूप होतो.  त्याला हिरण्यगर्भावस्था प्राप्त होते.  शरीरपातानंतर तो उपासक सूर्यलोकाला गेल्यानंतर पुन्हा तो मृत्युलोकाला येत नाही.  त्यास तेथे ब्रह्माजीबरोबरच क्रममुक्ति प्राप्त होते.  ज्याप्रमाणे सर्प आपल्या जीर्ण त्वचेचा त्याग करतो व पुन्हा नवचैतन्य प्राप्त करतो, त्याचप्रमाणे उपासक उपासनेच्या साहाय्याने दैवीगुणसंपन्न होऊन सर्व पापांच्यापासून मुक्त होतो.  उपासनेच्या प्रभावाने साधकाच्या अंतःकरणामधील मल व विक्षेप हे दोष नाहीसे होतात.  रागद्वेषादि कलुषितता निघून जाते.  त्याचे मन अतिशय शुद्ध होते.  तोच हिरण्यगर्भाच्या ‘सत्य’ नावाच्या लोकाला जातो.

 

ज्याप्रमाणे सूत्र-म्हणजेच धागा सर्व मण्यांच्यामधून आरपार जाऊन त्यांच्यामध्ये एकसंधता ठेवतो, त्याचप्रमाणे हिरण्यगर्भ सर्व जीवांच्या आत राहून सर्वांच्यावर नियमन करतो.  तोच सूत्रात्मा प्राण, आनंदघन असून सर्वव्यापी, ईशनशील, नियामक आहे.  व्यष्टि, समष्टि, सात ऊर्ध्वलोक (भू: भुवः स्वः महः जनः तपः सत्यं), सात अधोलोक (अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल, महातल) या सर्वांच्यामध्ये सूत्रात्मा अनुप्रवेश करतो.  भगवान म्हणतात –

            क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत |    (गीता अ. १३-२)

 

सर्व भूतमात्रांच्यामध्ये अहं, अहं स्वरूपाने अनुभवायला येणारा क्षेत्रज्ञ हा मी-परमात्मा आहे.  मी-परमात्म्याने चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त केलेले आहे.  तोच मी-परमात्मा सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा असून समष्टि लिंग शरीरामध्ये सर्व व्यष्टि जीव एकत्र झालेले आहेत.  म्हणून परमात्म्याला येथे ‘जीवघन’ असे म्हटले आहे.  परमात्मा हा व्यष्टि व समष्टीने युक्त, संपन्न आहे.

 

त्रिमात्रारूप ओंकाराचे ध्यान करणारा उपासक हा या जीवघन, हिरण्यगर्भ क्षेत्रज्ञापेक्षाही उत्तम श्रेष्ठ असणाऱ्या म्हणजेच कार्यकारणाच्या अतीत, क्षरअक्षराच्या अतीत असणाऱ्या परमात्मस्वरूपाला पाहतो.  तो उपासक परमात्म्याला जाणतो.  हेच ओंकारोपासनेचे फळ आहे.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, April 13, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘उ’ | Effects of Omkar Worship - ‘उ’

 



ओंकारउपासकाने एकेका मात्राची उपासना केली तरीही तो कधीही दुर्गतीला जात नाही.  त्याला त्याच्या साधनेचे फळ निश्चितच मिळते.

 

जो साधक ओंकाराच्या अकार व उकार या दोन मात्रांचे स्वरूप आणि त्याच्यामधील भेद जाणणारा असेल व तो ओंकाराच्या द्वितीय मात्रेला प्राध्यान्य देवून ओंकारउपासना करीत असेल, तर त्या साधकाला मनरूपी आत्मभाव प्राप्त होतो.  ‘उ’कार ही मात्रा ‘अ’कारापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे श्रेष्ठ आहे.  ‘उ’काराच्या उपासनेने साधक यजुर्वेदस्वरूप असणाऱ्या समष्टि सूक्ष्म शरीराशी म्हणजेच हिरण्यगर्भाशी तादात्म्य पावतो.  हिरण्यगर्भ म्हणजेच अपरब्रह्म किंवा कार्यब्रह्म होय.

 

व्यष्टि       १. व्यष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विश्व’

२. व्यष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘तैजस’

३. व्यष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘प्राज्ञ’

समष्टि      १. समष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विराट’

२. समष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘हिरण्यगर्भ’

३. समष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘मायावी’

 

ही उपासना करीत असताना प्रारब्धवशात् जर त्या साधकाच्या शरीराचा मृत्यु झाला तर मृत्युनंतर तो यजुर्वेदामधील मंत्रांच्या साहाय्याने अंतरिक्षामधील चंद्रलोकाला – सोमलोकाला प्राप्त होतो.  यजुर्वेद हा द्वितीय मात्रास्वरूप, ‘उ’कार स्वरूप आहे.  सोमलोकामध्ये गेल्यावर तो तेथे हिरण्यगर्भाचा महिमा अनुभवतो.  म्हणजेच त्याचे मन हिरण्यगर्भासारखेच शुद्ध, सत्त्वगुणप्रधान होते.

 

तेथे सोमलोकामध्ये महिमा अनुभवल्यानंतर तो उपासक पुन्हा मनुष्यलोकाला, मर्त्यलोकाला प्राप्त होतो.  थोडक्यात ‘अ’कार व ‘उ’कार या दोन्हीही मात्रांची भिन्न-भिन्नपणे उपासना करणाऱ्या दोन्हीही उपासकांना मर्त्यलोक प्राप्त होतो.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, April 6, 2021

ओंकार उपासनेचे फळ – ‘अ’ | Effects of Omkar Worship - ‘अ’

 



जो साधक ‘अ’कार मात्रेची उपासना करतो, त्याच्यावर त्या उपासनेचा संस्कार होतो.  ‘अ’कार ही अत्यंत स्थूल मात्रा आहे.  ‘अ’काराचा उच्चारही स्थूल वाणीने केला जातो.  स्थूलाची उपासना म्हणजे विराटाची उपासना आहे.

 

व्यष्टि       १. व्यष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विश्व’

२. व्यष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘तैजस’

३. व्यष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘प्राज्ञ’

समष्टि      १. समष्टि स्थूलशरीरअभिमानी आत्मा – ‘विराट’

२. समष्टि सूक्ष्मशरीरअभिमानी आत्मा – ‘हिरण्यगर्भ’

३. समष्टि कारणशरीरअभिमानी आत्मा – ‘मायावी’

 

याप्रमाणे ‘अ’काराची उपासना ही विराटाची उपासना असून उपासक विराटाशी तादात्म्य पावतो.  म्हणजेच तो समष्टि स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो.  या उपासनेचे फळ म्हणजेच, तो उपासक मृत्युनंतर शीघ्र पृथ्वीवर येऊन मनुष्ययोनीला प्राप्त होतो.  ऋगवेद हा ‘अ’कारस्वरूप असल्यामुळे ऋग्वेदामधील ऋचा त्या उपासकाला मनुष्यलोकाला घेऊन जातात.

 

ओंकाराची प्रथम मात्रा ऋगवेदस्वरूप असल्यामुळे तो उपासक मनुष्ययोनीला प्राप्त होऊन तो श्रेष्ठ द्विज होतो.  मनुष्ययोनीमध्ये येऊन तो उपासक कायिक-वाचिक-मानसिक तपश्चर्या करतो.  व्रत, वैकल्ये, उपासना करतो.  लहानपणापासुनच सर्वसंगपरित्याग करून तो कठीण ब्रह्मचर्यव्रताचे पालन करतो.  परमेश्वरावर नितांत श्रद्धा व अनन्य भक्ति ठेऊन तो सेवा, त्याग, समर्पण इत्यादि दैवी गुणांनी संपन्न होतो.  व्रतस्थ, तपस्वी जीवन जगतो.  त्याचे मन अत्यंत शुद्ध, शांत, प्रसन्न होते.  तो प्रसन्न मनाने स्वतःचाच महिमा अनुभवतो.  त्याची श्रद्धा कधीही डळमळीत होत नाही.  त्याच्या मनात कधीही गुरु, शास्त्र, ईश्वर यांच्याबद्दल विकल्प येत नाहीत.  तो सातत्याने उपासना करीत राहतो.  यामुळेच असा उपासक कधीही दुर्गतीला जात नाही.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012





- हरी ॐ





Monday, March 29, 2021

आत्मस्वरूपाचे गुण | Properties of the “Self-Consciousness”

 


श्रुति अनेक शब्दांच्यामधून आत्मस्वरूपाचे प्रतिपादन करीत आहे.  

 

१. अच्छायं – आत्मचैतन्यस्वरूप हे छायारहित, म्हणजेच तमोगुणरहित अज्ञानरहित आहे.  

२. अशरीरं – आत्मस्वरूप नामरूपउपाधिरहित, निरुपाधिक आहे.  

३. अलोहितं – लोहित म्हणजे रक्त-लाल रंगाने युक्त होय. अलोहित म्हणजे रूपरंगरहित निर्विशेष, निराकार स्वरूप आहे.  

४. शुभ्रं – आत्मस्वरूप हे अत्यंत शुद्धस्वरूप, मायारहित आहे.  

५. अक्षरं – ते स्वरूप क्षररहित, म्हणजे अविनाशी, नित्य, शाश्वत आहे.   

६. सत्य – नित्य असल्यामुळेच ते स्वरूप सत्य असून ते तिन्हीही काळांच्यामध्ये सत् स्वरूपाने राहते.  

७. पुरुषाख्यं – तेच स्वरूप ‘पुरुष’ या नावाने संबोधिले जाते. पूर्णत्वात् पुरुषः |  पुरीशयनात् पुरुषः |  जो स्वतःच परिपूर्णस्वरूप असून या शरीरामध्ये निवास करतो, त्यास ‘पुरुष’ असे म्हणतात.  

८. अप्राणं – ते स्वरूप प्राणरहित आहे.  

९. अमनोगोचरं – ते स्वरूप मनबुद्धीला अगोचर असून मन बुद्धीच्याही अतीत आहे.  

१०. शिव – ते स्वरूप आनंदस्वरूप आहे.  

११. शान्तं – ते स्वरूप अत्यंत शांत, निस्तरंग, उत्कर्ष-अपकर्षरहित, वृद्धिक्षयरहित, आविर्भाव-तीरोभावरहित आहे.  ते चैतन्य कधी येत नाही अथवा जातही नाही.  त्यामध्ये कोणतीही वृद्धि किंवा क्षय होत नाही.

१२. सबाह्याभ्यंतरं – ते स्वरूप सर्वांना अंतर्बाह्य व्याप्त करते.  

१३. अजं – ते स्वरूप जन्ममृत्युरहित आहे.  

 

याप्रमाणे असे हे आत्मस्वरूप, जो सर्वत्यागी आहे, तोच जाणू शकेल.  

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, March 23, 2021

बिंब-प्रतिबिंब दृष्टान्त | Source-Reflection Analogy

 



आचार्य येथे दृष्टान्त देतात की, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये अनुप्रवेश करतो, त्याप्रमाणे परमात्म्याने उपाधीमध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व रूपाने प्रवेश केलेला आहे.  जसे सूर्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते.  त्यावेळी सूर्य प्रतिबिंबरूपाने पाण्यामध्ये जणु काही प्रवेश करतो.  सूर्य हा स्वतः अद्वय, एक, स्वयंप्रकाशस्वरूप आहे.  मात्र जेव्हा त्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते, तेव्हा एकच सूर्य अनेक झाल्यासारखा भासतो.  जितक्या बादल्या आपण पाणी भरून ठेवू, तितक्या उपाधि प्राप्त होऊन तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  सूर्याकडूनच प्रतिबिंबांना प्रकाश व सत्ता मिळते.  पाणी हलले की प्रतिबिंब हलते.  बादलीतील पाणी ओतून दिले की, प्रतिबिंबही दिसेनासे होते.  याचे कारण प्रतिबिंब हे उपाधीशी तादात्म्य पावलेले असून उपाधीवर अवलंबून आहे.

 

त्याचप्रमाणे आत्मचैतन्याने सर्व उपाधींच्यामध्ये क्षेत्रज्ञरूपाने अनुप्रवेश केलेला आहे.  म्हणून त्यालाच ‘चिदाभास’ किंवा ‘चित्प्रतिबिंब’ असे म्हटले जाते.  भगवान म्हणतात –

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः |           (गीता अ. १५-७)

‘मी’ आत्मस्वरूपाने अंशरूपाने म्हणजेच चित्प्रतिबिंबरूपाने सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्थित आहे.

 

याठिकाणी उपाधीच्या म्हणजेच पाण्याच्या दृष्टीने प्रतिबिंब आहे.  परंतु बिंबस्थानीय सूर्याच्या दृष्टीने पाणी नाही, उपाधि नाही किंवा प्रतिबिंब ही नाही.  कारण सूर्य हा एक, अखंड, स्वयंप्रकाशमान, साक्षीस्वरूप आहे.  उपाधीमुळे प्रतिबिंबे दिसतात.  जितक्या उपाधि तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  उपाधीमधील विकारांचा परिणाम प्रतिबिंबांच्यावर होतो.  मात्र सूर्यावर कोणताही परिणाम होत नाही.  सूर्य अलिप्त, अस्पर्शित, अविकारी राहतो.

 

त्याचप्रमाणे आत्मचैतन्य अंतःकरणउपाधीमध्ये चित्प्रतिबिंबरूपाने जणु काही अनुप्रवेश करते.  त्या चित्प्रतिबिंबालाच ‘जीव’ असे म्हणतात.  जीवाला उपाधि मिळाली की, जीव या देहोपाधीशी तादात्म्य पावून कर्तृकारकादि प्रत्यय निर्माण करतो.  देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार या सर्वांचे विकार स्वतःवर आरोपित करतो व स्वतः जन्ममृत्युयुक्त, मर्यादित, परिच्छिन्न, अल्पज्ञ-अल्पशक्तिमान-अल्पव्यापी होऊन सुखी-दुःखी, संसारी, बद्ध होतो.

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, March 16, 2021

व्यान वायु | Circulation Sub-System

 



येथे श्रुति व्यान वायूचे स्थान व कार्य स्पष्ट करीत आहे.  आपल्या शरीरामध्ये असंख्य नाड्या असून नाड्यांच्यामधून शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा होत असतो.  या नाड्यांचे प्रमुख स्थान हृदय हे आहे.  जीवात्मा हा हृदयामध्ये आहे. सूक्ष्म शरीररूप आत्मा हृदयाकाशामध्ये स्थित असून हृदय हेच सर्व नाड्यांचे उत्पत्तिस्थान आहे.

 

जीवात्म्याला संपूर्ण शरीरामध्ये संचार करण्यासाठी या नाड्या आहेत. शरीरामध्ये नाड्यांचे जाळे पसरलेले आहे. शरीरामध्ये एकूण प्रमुख एकशे एक नाड्या आहेत.  या एकशे एक नाड्यांच्या प्रत्येकी शंभर अशा शाखा निर्माण होतात.  तसेच या नाड्यांना प्रत्येकी ७२ हजार प्रतिशाखा निर्माण होतात. या सर्व मिळून (७२,७२,१०,२०१) बहात्तर कोटी, बहात्तर लाख, दहा हजार, दोनशे एक नाड्या होतात. या सर्व नाड्यांच्यामध्ये व्यान वायू संचार करतो.

 

व्यान वायूने सामान्यतेने संपूर्ण शरीराला व्याप्त केलेले आहे. मात्र व्यान वायू विशेष रूपाने शरीराच्या सांधे, खांदे व मर्मदेश म्हणजेच जननेंद्रिय या स्थानांच्यामध्ये असतो.  ज्यावेळी प्राण व अपान कार्य करीत नाहीत, म्हणजेच ज्यावेळी श्वास व उच्छ्वास ही क्रिया होत नाही, त्यावेळी प्राण व अपान यांच्यामध्ये जो वायू असतो तो व्यान वायू होय. प्राण व अपान यामधील जो संधिकाळ त्यालाच “श्वास रोखणे” असे आपण म्हणतो.  त्यावेळी व्यान वायू वीर्याप्रमाणे निर्माण होतो.

 

व्यानवायूमुळे साहसी, पराक्रमी कृत्ये केली जातात. एखादा वीर पुरुष जेव्हा धनुष्याची प्रत्यंचा ओढून श्वास रोखतो, तेव्हा तेथे व्यानवायू कार्यरत असतो.  तेथे प्राण व अपान वायूची अनुपस्थिती असल्याने त्यावेळी व्यान वायुमुळे धाडसी कृत्ये केली जातात.  असा हा व्यान वायू शरीरामधील सांधे, खांदे आणि जननेंद्रियामध्ये विशेष रूपाने असतो.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012





- हरी ॐ




Wednesday, March 10, 2021

ईश्वर निर्मिती कशी करतो ? | How God Ideates?

 


ईश्वर विश्वामधील सर्व लौकिक व शास्त्रीय पदार्थांची निर्मिती करतो.  लौकिक पदार्थ म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंधादि हे बाह्य पदार्थ होय व शास्त्रीय पदार्थ म्हणजे पापपुण्यादि फळे होय.  हे सर्व पदार्थ ईश्वराच्या अंतःकरणामध्ये अव्यक्तरूपाने, वासनारूपाने राहतात.  ईश्वर या पदार्थांना संकल्परूपाने आपल्या आताच ठेवतो.  नंतर ईश्वरच बहिश्चित्त होऊन या सर्व वासनारूप, अव्यक्त पदार्थांना व्यक्त करतो.

 

सर्व पदार्थ ईश्वराच्या चित्तामध्ये वासनारूपाने, अव्यक्तरूपाने राहतात.  त्यावेळी त्या पदार्थांचे नाम-रूपादि धर्म प्रत्यक्ष अनुभवायला येत नसल्यामुळे ते पदार्थ व्यवहारास अयोग्य असतात.  म्हणूनच त्यांना अव्यक्त असे म्हटले आहे.  नंतर ईश्वरच बाह्य विश्वामधील पृथ्वीसारखे स्थिर पदार्थ व विजेसारखे अस्थिर, क्षणिक पदार्थ कल्पित करतो.  म्हणजेच ईश्वर बहिर्मुख होऊन बाह्य, दृश्य, स्थूल, व्यवहारयोग्य असणाऱ्या अनंत पदार्थांची कल्पना करतो.

 

ज्याप्रमाणे एखादा कुंभार घटाची किंवा विणकर वस्त्राची निर्मिती करतो.  त्यावेळी प्रथम कुंभार किंवा विणकर अव्यक्त, अदृश्य, व्यवहार-अयोग्य असणाऱ्या घटपटाची कल्पना त्यांच्या अंतःकरणामध्ये करून नंतरच मग त्या अव्यक्त घटपटाला नामरूपांच्या साहाय्याने व्यक्त करतात.  त्याचप्रमाणे विश्वकर्ता ईश्वर सुद्धा पुढे निर्माण होणारे सर्व पदार्थ प्रथम आपल्या आतच कल्पित करतो.  मायेच्या साहाय्याने कल्पित कारून पाहतो व नंतरच बहिश्चित्त होऊन त्या पदार्थांना व्यक्त करतो.  त्यावेळी ते सर्व पदार्थ नामरूपांनी संपन्न झाल्यामुळे सर्वांची दृश्यरूपाने व भिन्न-भिन्न स्वरूपाने आपणास प्रचीति येते.


थोडक्यात, प्रथम अव्यक्त, अदृश्य रूपामध्ये असणारे पदार्थच ईश्वराच्या संकल्पाने व्यक्त होऊन दृश्य, स्थूल रूपाला प्राप्त होतात.  ईश्वरच केवळ संकल्पमात्राने अंतर्बाह्य सर्वच पदार्थांची कल्पना करतो.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ