Tuesday, March 23, 2021

बिंब-प्रतिबिंब दृष्टान्त | Source-Reflection Analogy

 आचार्य येथे दृष्टान्त देतात की, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये अनुप्रवेश करतो, त्याप्रमाणे परमात्म्याने उपाधीमध्ये कर्तृत्व-भोक्तृत्व रूपाने प्रवेश केलेला आहे.  जसे सूर्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते.  त्यावेळी सूर्य प्रतिबिंबरूपाने पाण्यामध्ये जणु काही प्रवेश करतो.  सूर्य हा स्वतः अद्वय, एक, स्वयंप्रकाशस्वरूप आहे.  मात्र जेव्हा त्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते, तेव्हा एकच सूर्य अनेक झाल्यासारखा भासतो.  जितक्या बादल्या आपण पाणी भरून ठेवू, तितक्या उपाधि प्राप्त होऊन तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  सूर्याकडूनच प्रतिबिंबांना प्रकाश व सत्ता मिळते.  पाणी हलले की प्रतिबिंब हलते.  बादलीतील पाणी ओतून दिले की, प्रतिबिंबही दिसेनासे होते.  याचे कारण प्रतिबिंब हे उपाधीशी तादात्म्य पावलेले असून उपाधीवर अवलंबून आहे.

 

त्याचप्रमाणे आत्मचैतन्याने सर्व उपाधींच्यामध्ये क्षेत्रज्ञरूपाने अनुप्रवेश केलेला आहे.  म्हणून त्यालाच ‘चिदाभास’ किंवा ‘चित्प्रतिबिंब’ असे म्हटले जाते.  भगवान म्हणतात –

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः |           (गीता अ. १५-७)

‘मी’ आत्मस्वरूपाने अंशरूपाने म्हणजेच चित्प्रतिबिंबरूपाने सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्थित आहे.

 

याठिकाणी उपाधीच्या म्हणजेच पाण्याच्या दृष्टीने प्रतिबिंब आहे.  परंतु बिंबस्थानीय सूर्याच्या दृष्टीने पाणी नाही, उपाधि नाही किंवा प्रतिबिंब ही नाही.  कारण सूर्य हा एक, अखंड, स्वयंप्रकाशमान, साक्षीस्वरूप आहे.  उपाधीमुळे प्रतिबिंबे दिसतात.  जितक्या उपाधि तितकी प्रतिबिंबे निर्माण होतात.  उपाधीमधील विकारांचा परिणाम प्रतिबिंबांच्यावर होतो.  मात्र सूर्यावर कोणताही परिणाम होत नाही.  सूर्य अलिप्त, अस्पर्शित, अविकारी राहतो.

 

त्याचप्रमाणे आत्मचैतन्य अंतःकरणउपाधीमध्ये चित्प्रतिबिंबरूपाने जणु काही अनुप्रवेश करते.  त्या चित्प्रतिबिंबालाच ‘जीव’ असे म्हणतात.  जीवाला उपाधि मिळाली की, जीव या देहोपाधीशी तादात्म्य पावून कर्तृकारकादि प्रत्यय निर्माण करतो.  देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार या सर्वांचे विकार स्वतःवर आरोपित करतो व स्वतः जन्ममृत्युयुक्त, मर्यादित, परिच्छिन्न, अल्पज्ञ-अल्पशक्तिमान-अल्पव्यापी होऊन सुखी-दुःखी, संसारी, बद्ध होतो.

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012- हरी ॐ