Tuesday, March 16, 2021

व्यान वायु | Circulation Sub-System

 



येथे श्रुति व्यान वायूचे स्थान व कार्य स्पष्ट करीत आहे.  आपल्या शरीरामध्ये असंख्य नाड्या असून नाड्यांच्यामधून शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा होत असतो.  या नाड्यांचे प्रमुख स्थान हृदय हे आहे.  जीवात्मा हा हृदयामध्ये आहे. सूक्ष्म शरीररूप आत्मा हृदयाकाशामध्ये स्थित असून हृदय हेच सर्व नाड्यांचे उत्पत्तिस्थान आहे.

 

जीवात्म्याला संपूर्ण शरीरामध्ये संचार करण्यासाठी या नाड्या आहेत. शरीरामध्ये नाड्यांचे जाळे पसरलेले आहे. शरीरामध्ये एकूण प्रमुख एकशे एक नाड्या आहेत.  या एकशे एक नाड्यांच्या प्रत्येकी शंभर अशा शाखा निर्माण होतात.  तसेच या नाड्यांना प्रत्येकी ७२ हजार प्रतिशाखा निर्माण होतात. या सर्व मिळून (७२,७२,१०,२०१) बहात्तर कोटी, बहात्तर लाख, दहा हजार, दोनशे एक नाड्या होतात. या सर्व नाड्यांच्यामध्ये व्यान वायू संचार करतो.

 

व्यान वायूने सामान्यतेने संपूर्ण शरीराला व्याप्त केलेले आहे. मात्र व्यान वायू विशेष रूपाने शरीराच्या सांधे, खांदे व मर्मदेश म्हणजेच जननेंद्रिय या स्थानांच्यामध्ये असतो.  ज्यावेळी प्राण व अपान कार्य करीत नाहीत, म्हणजेच ज्यावेळी श्वास व उच्छ्वास ही क्रिया होत नाही, त्यावेळी प्राण व अपान यांच्यामध्ये जो वायू असतो तो व्यान वायू होय. प्राण व अपान यामधील जो संधिकाळ त्यालाच “श्वास रोखणे” असे आपण म्हणतो.  त्यावेळी व्यान वायू वीर्याप्रमाणे निर्माण होतो.

 

व्यानवायूमुळे साहसी, पराक्रमी कृत्ये केली जातात. एखादा वीर पुरुष जेव्हा धनुष्याची प्रत्यंचा ओढून श्वास रोखतो, तेव्हा तेथे व्यानवायू कार्यरत असतो.  तेथे प्राण व अपान वायूची अनुपस्थिती असल्याने त्यावेळी व्यान वायुमुळे धाडसी कृत्ये केली जातात.  असा हा व्यान वायू शरीरामधील सांधे, खांदे आणि जननेंद्रियामध्ये विशेष रूपाने असतो.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012





- हरी ॐ