Tuesday, August 13, 2013

प्रकाशमय जीवनाकडे | Towards a Bright Lifeइंग्रजी वाङ्मयामध्ये थोर तत्त्वज्ञ प्लेटोने सांगितलेली एक गोष्ट आहे.  एका प्रचंड मोठ्या गुहेमध्ये एक आदिवासी जमात पिढ्यान् पिढ्या राहत होती.  अंधारामध्येच अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि काळाच्या पडद्याआड गेल्या.  त्यांना प्रकाशाची यत्किंचितही कल्पना नव्हती.

त्यांच्यामध्येच एक तरुण मुलगा “ गुहेच्या बाहेर काय असेल ? ” हे पाहण्यासाठी गुहेच्या बाहेरच्या दिशेने चालत राहिला.  पुढे-पुढे सातत्याने दीर्घकाळ गेल्यानंतर गुहेच्या तोंडाशी आल्यावर त्याला अंधारापेक्षा काहीतरी वेगळे दिसले.  तो प्रकाशकिरणांचा झोत पाहून त्याला अत्यानंद झाला.  तो उड्या मारू लागला.  त्याच आनंदामध्ये पुन्हा गुहेमध्ये येऊन त्याने आपल्या आप्तबांधवांना प्रकाशाचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला.  परंतु युगानुयुगे अंधारात राहिलेल्या त्या आदिवासींना प्रकाशाची कल्पनाच सहन झाली नाही.  त्यांनी त्या तरुण मुलाला मारून टाकले.

पुन्हा काही काळ लोटल्यानंतर दोन-तीन मुलांनी असाच प्रयत्न केला.  त्यांना ही प्रकाशाचा शोध लागला.  त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुहेमधील अन्य आदिवासींना परोपरीने समजावून दिले की, “या गुहेच्या बाहेर या !  अंधारापेक्षाही एक वेगळे असे प्रकाशमय जीवन आहे. त्यानंतर गुहेच्या बाहेर येऊन सर्वांनी प्रकाशाचा अनुभव घेतला व त्यांचे म्हणणे मान्य केले.  ही एक छोटीसी बोधप्रद कथा आहे.

याप्रमाणेच मनुष्य जीवनाचा विकास व्हावयाचा असेल तर प्रथम आपण आपल्या मनाच्या कल्पनांच्यामधून बाहेर आले पाहिजे.  मनामधील राग-द्वेष, स्वार्थ, लोभ, कूपमंडुक वृत्ति, अहंकार-ममकार या क्षुद्र मनोवृत्तींचा त्याग केला पाहिजे, कारण याच वृत्ति मनुष्याच्या मनाला पुन्हा-पुन्हा खाली खेचतात, विकास होऊ देत नाहीत.  आपण अज्ञानामधून बाहेर येऊन स्वतःच्या मनाच्या कप्प्यांमधून बाहेर पडलो तरच प्रकाशमय जीवनाचा अनुभव घेऊ शकतो.


- "व्यक्तिमत्त्व विकास" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  सप्टेंबर २०११
- Reference: "Wyaktimattwa Wikaas (Personality Development)" by P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, September 2011
 
  
- हरी ॐ

No comments:

Post a Comment