Showing posts with label Mirror. Show all posts
Showing posts with label Mirror. Show all posts

Tuesday, February 15, 2022

दर्पण आणि दृश्य नगरी | Mirror And the City

 



ज्ञानाचे स्वरूप आचार्य स्पष्ट करतात –

विश्वं दर्पणदृश्यमाननगरीतुल्यं निजान्तर्गतम्

पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया |

यः साक्षात्कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं

तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ||                  (श्रीदक्षिणामूर्ति स्तोत्रम्)

 

ज्याप्रमाने आरशामध्ये एखादी नगरी प्रतिबिंबरूपाने भासते, त्याप्रमाणे हे सर्व विश्व आणि भूतमात्रे प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या ब्रह्मस्वरूपामध्ये भासते, प्रचीतीला येते.  नगरी आरशाच्या आत अस्तित्वामध्ये आहे असे वाटते.  परंतु जर अवलोकन केले तर प्रत्यक्षामध्ये नगरी सत्तारूपाने अस्तित्वामध्ये नसतेच.  ती फक्त प्रतिबिंबरूपाने भासते.  म्हणजेच त्या नगरीला स्वतंत्रपणे स्वतःची सत्ता नसते.  तर ती भासते म्हणून नगरी आहे असे म्हणावयाचे.  यामुळे आरशाच्या अधिष्ठानामुळे नगरीचा भास होतो.

 

याचाच अर्थ नगरी कल्पित आहे.  नगरीच्या नाम, रूप, गुण, धर्म, विकार वगैरेंनी अधिष्ठानस्वरूप असलेला आरसा कधीही लिप्त, स्पर्शित किंवा परिणामी होत नाही.  तर तो नित्य अलिप्त, असंग, अस्पर्शित, अविकारी स्वरूपामध्येच राहातो.  परंतु याही पुढे विचार चालू ठेवला तर कळते की, नगरी ही नाहीच.  फक्त आरसाच आहे.  अधिष्ठानरूपी आरशाच्या दृष्टीने पाहिले तर नगरी नाहीच.

 

हे सर्व दृक्-दृष्यात्मक इंद्रियगोचर भासणारे विश्व बाहेर नसून कूटस्थ, असंग, चिद्रूप, साक्षीचैतन्यामध्येच आहे.  द्रष्टा चैतन्यामध्येच आहे आणि दृश्य सुद्धा चैतन्यामध्येच आहे.  म्हणून प्रत्यगात्मस्वरूप असणाऱ्या आत्मचैतन्याच्या दृष्टीने पाहिले तर दृक् आणि दृष्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून या दोघांनाही परब्रह्माची सत्ता आहे.  त्यामुळे सर्व विश्व परब्रह्माच्या सत्तेमध्ये प्रतिबिंबरूपाने प्रचीतीला येते.  म्हणून विश्व भासात्मक असून परब्रह्मापासून ते भिन्न नाही, दूर नाही किंवा बाहेरही नाही.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–




Friday, October 25, 2019

आत्म्याचा आरसा | The Mirror of Self





साधकाला ब्रह्मज्ञान घेण्यासाठी योग्य, निर्दोष असे यथार्थ प्रमाण आवश्यक आहे.  मग शंका येईल की, तत् किं प्रमाणम् ? – “ते प्रमाण कोणते आहे ?”  शिष्याला आत्मज्ञान घ्यावयाची इच्छा आहे, स्वतःचेच ज्ञान घ्यावयाची इच्छा आहे.  पण तो स्वतःच स्वतःचे ज्ञान घेऊ शकत नाही.  बुद्धिमान मनुष्य अन्य प्रमाणांच्या साहाय्याने “मी” व्यतिरिक्त जे जे काही आहे, त्या संपूर्ण विश्वाचे ज्ञान घेतो, पण तो “मी” चे ज्ञान मात्र घेऊ शकत नाही.  त्याला स्वतःला स्वतःचे ज्ञान नाही.  

उदा.  माझा स्वतःचाच चेहरा माझ्या अत्यंत जवळ आहे.  परंतु दुर्दैवाने बाकी सर्व विश्व मी पाहातो, फक्त माझा चेहरा पाहू शकत नाही.  मला स्वतःचाच चेहरा पाहावयाचा असेल, तर त्यासाठी योग्य साधनाची आवश्यकता आहे.  भिंत समोर ठेवली, अन् त्यात “चेहरा पहा” असे म्हटले तर पाहाता येईल का ?  नाही, तर त्यासाठी योग्य, निर्दोष साधनाची – प्रमाणाची आवश्यकता आहे, आणि ते प्रमाण म्हणजेच “आरसा !”  आरशामध्ये मी माझा चेहरा पाहातो आणि पाहून मला समजते की, “मी असा-असा आहे.”  जसे आहे तसे आरशात दिसते.  आरशाचे काम एकच – जसे तुम्ही आहात, तसे बरहुकुम दाखविणे !  तुमचेच तुम्हाला दर्शन करवून देणे, हेच आरशाचे प्रयोजन आणि कार्य आहे.  म्हणून आरसा हे स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी प्रमाण आहे.  तसेच याठिकाणी सांगतात की, जर स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान घ्यावयाचे असेल, “मी” च्या स्वरूपाचे ज्ञान घ्यावयाचे असेल तर - किं प्रमाणम् ?  काय प्रमाण आहे ?  
शास्त्रकार सांगतात – वेदन्तो नाम उपनिषत् प्रमाणम् |          (वेदान्तसार)

वेदान्तशास्त्र हे एकच प्रमाण आहे.  त्यालाच उपनिषद असे म्हटले जाते.  उपनिषद हेच माझ्या स्वरूपाचे ज्ञान घेण्यासाठी योग्य असे यथार्थ साधन आहे.  अन्य कोणतेही साधन नाही.  शास्त्रकार याठिकाणी अन्य सर्व शास्त्रांचे, अन्य सर्व साधनांचे खंडन करतात.  अन्य सर्व साधने, अन्य सर्व व्यावहारिक ज्ञान बाह्य दृश्य विषयांचे ज्ञान देते.  परंतु स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करावयाचे असेल, तर वेदान्तशास्त्र हेच अत्यंत प्रमाणभूत शास्त्र आहे.



- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ–


Tuesday, May 27, 2014

भगवद्गीतेचे वैशिष्ठ्य | Uniqueness of Bhagwat Geeta


 
विश्वामधील सर्व ग्रंथ निरनिराळ्या प्रकाराने बाह्य विषयांचे ज्ञान देतात.  मग ते भौतिकशास्त्र असो, शरीरशास्त्र किंवा मानसशास्त्र वगैरे कोणतेही शास्त्र असो.  परंतु जीवनाचे गूढ रहस्य उलगडून जीवनाला दिशा देणारा, प्रेरणा आणि स्फूर्ति देणारा, जीवनाचा विकास करून जीवन परिपूर्ण करणारा असा एकही मार्गदर्शक ग्रंथ नाही.

याउलट अनेक प्रकारच्या विषयांचे ज्ञान मनुष्याच्या मनामध्ये रागद्वेष, कामक्रोधलोभ वगैरेदि विकार निर्माण करून विषयासक्त बनविते.  मनुष्यामधील श्रद्धा, प्रेम, सेवा, कर्तव्यपरायणता, त्याग, निस्वार्थ वृत्ति, माणुसकी नाहीशी करते.  मनुष्य अधिक उन्नत न होता स्वैर, उच्छ्रुंखल, हिंसाचारी, पशुतुल्य बनतो.  हेच आपल्या दृष्टोत्पत्तीस येते.  त्यामुळे जगामध्ये असा एकही ग्रंथ नाही की, जो मनुष्याच्या अंतःकरणामधील पाशवी आणि राक्षसी प्रवृत्तींचा नाश करून सद्गुणांचा, श्रेष्ठ नीतिमूल्यांचा उत्कर्ष करून मनुष्याला सद्विचार आणि सदाचारामध्ये प्रवृत्त करेल.  जीवनाचे सर्वांगसुंदर दर्शन घडविणारा असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय.

भगवद्गीता आरशाप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाचे दर्शन देणारा अलौकिक ग्रंथ आहे.  आपल्या स्वतःचा चेहरा आपल्याजवळच असूनही आपण कधीही पाहू शकत नाही.  तो अत्यंत जवळ असूनही फार फार दूर आहे.  तो पाहाण्यासाठी आरशाची आवश्यकता असते.  त्यासाठी आरसा हा साधन होतो.

त्याचप्रमाणे जीवनाचे खरे परिपूर्ण दर्शन आपल्या अंतरंगामध्येच स्वस्वरूपाने आहे.  परंतु अज्ञानाच्या आवरणामुळे ते दिसत नाही, अनुभवायला येत नाही.  ते दर्शन घेण्यासाठी असलेला आरसा म्हणजेच ‘श्रीमद्भगवद्गीता’ होय.  या महाकाव्यामधून भगवंतांनी हळूवारपणे प्रत्येकाचे अंतरंग उलगडून स्वस्वरूप प्रकट केलेले आहे.  भगवद्गीतेचे चिंतन करणे योग्य कर्तव्य आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ –
 

Tuesday, December 24, 2013

ज्ञानप्राप्तीचे प्रमाण | Evidence of Knowledge


कोणतेही ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता आहे.  प्रमाकरणं प्रमाणम् | प्रमा म्हणजे ज्ञान.  करण म्हणजे साधन.  ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणजे प्रमाण.  विश्वातील दृश्य विषयांच्या दर्शनासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, रसास्वादासाठी जिव्हा आणि सुगंधासाठी घ्राणेंद्रिये यांची आवश्यकता आहे.  म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या अनुभूतीसाठी कर्ण, त्वचा, डोळे, जिव्हा व घ्राणेंद्रिये ही पंचेंद्रिये प्रमाण आहेत, कारण प्रमाणाशिवाय प्रमा म्हणजे ज्ञान होऊ शकत नाही.

पंचेंन्द्रियांद्वारे बाह्य विश्वातील दृश्य विषयांचेच ज्ञान देण्यासाठी प्रमाण आहेत.  परंतु आत्मा हा शब्द स्पर्शाप्रमाणे किंवा घटपटाप्रमाणे विश्वातील विषय नाही.  त्यामुळे आत्मा इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही.  आत्मा हा इंद्रियअगोचर आहे.  इंद्रियांच्या कक्षेपलीकडे आहे.  तो इंद्रियांचा आत्मा आहे.  त्याच्या अस्तित्वाने इंद्रियांना अस्तित्व आणि चेतना मिळते आणि ती आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यान्वित होतात.  म्हणून पंचज्ञानेंद्रिये आत्मज्ञान देण्यासाठी असमर्थ आहेत.

तसेच सुखदुःखाप्रमाणे आत्मा मनाचा विषय नाही, कारण तो मनाचाही आत्मा आहे.  त्याच्या अस्तित्वामुळे मनाला चेतना मिळते आणि मन त्याच्या व्यापारामध्ये कार्यान्वित होते.  म्हणून आत्मा मनालाही अगोचर आहे.  थोडक्यात व्यावहारिक ज्ञान देणारी सर्व प्रमाणे आत्म्याचे ज्ञान देण्यास असमर्थ ठरतात.  मग आत्मज्ञानासाठी कोणते प्रमाण आहे? शास्त्रकार सांगतात – वेदान्तो नाम उपनिषद प्रमाणम् |

वेदान्त म्हणजे उपनिषदे आत्मस्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी प्रमाण आहेत.  ज्याप्रमाणे आपले मुख पाहण्यासाठी दर्पणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आत्म्याचे स्वरूप पाहण्यासाठी वेदांतशास्त्र म्हणजे उपनिषदे दर्पणाप्रमाणे आहेत; कारण सर्व उपनिषदे आपले अज्ञान दूर करून शुद्ध आत्मस्वरूप प्रकट करतात.  साधकाला सच्चिदानंदाची प्राप्ति करून देऊन तृप्त, संतुष्ट करतात.  म्हणून साधकाने, जिज्ञासूने वेदांतशास्त्राचाच आश्रय घ्यावा.

 
- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010



- हरी ॐ –