Showing posts with label Mirage. Show all posts
Showing posts with label Mirage. Show all posts

Tuesday, February 15, 2022

दर्पण आणि दृश्य नगरी | Mirror And the City

 



ज्ञानाचे स्वरूप आचार्य स्पष्ट करतात –

विश्वं दर्पणदृश्यमाननगरीतुल्यं निजान्तर्गतम्

पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया |

यः साक्षात्कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं

तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये ||                  (श्रीदक्षिणामूर्ति स्तोत्रम्)

 

ज्याप्रमाने आरशामध्ये एखादी नगरी प्रतिबिंबरूपाने भासते, त्याप्रमाणे हे सर्व विश्व आणि भूतमात्रे प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या ब्रह्मस्वरूपामध्ये भासते, प्रचीतीला येते.  नगरी आरशाच्या आत अस्तित्वामध्ये आहे असे वाटते.  परंतु जर अवलोकन केले तर प्रत्यक्षामध्ये नगरी सत्तारूपाने अस्तित्वामध्ये नसतेच.  ती फक्त प्रतिबिंबरूपाने भासते.  म्हणजेच त्या नगरीला स्वतंत्रपणे स्वतःची सत्ता नसते.  तर ती भासते म्हणून नगरी आहे असे म्हणावयाचे.  यामुळे आरशाच्या अधिष्ठानामुळे नगरीचा भास होतो.

 

याचाच अर्थ नगरी कल्पित आहे.  नगरीच्या नाम, रूप, गुण, धर्म, विकार वगैरेंनी अधिष्ठानस्वरूप असलेला आरसा कधीही लिप्त, स्पर्शित किंवा परिणामी होत नाही.  तर तो नित्य अलिप्त, असंग, अस्पर्शित, अविकारी स्वरूपामध्येच राहातो.  परंतु याही पुढे विचार चालू ठेवला तर कळते की, नगरी ही नाहीच.  फक्त आरसाच आहे.  अधिष्ठानरूपी आरशाच्या दृष्टीने पाहिले तर नगरी नाहीच.

 

हे सर्व दृक्-दृष्यात्मक इंद्रियगोचर भासणारे विश्व बाहेर नसून कूटस्थ, असंग, चिद्रूप, साक्षीचैतन्यामध्येच आहे.  द्रष्टा चैतन्यामध्येच आहे आणि दृश्य सुद्धा चैतन्यामध्येच आहे.  म्हणून प्रत्यगात्मस्वरूप असणाऱ्या आत्मचैतन्याच्या दृष्टीने पाहिले तर दृक् आणि दृष्याला स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून या दोघांनाही परब्रह्माची सत्ता आहे.  त्यामुळे सर्व विश्व परब्रह्माच्या सत्तेमध्ये प्रतिबिंबरूपाने प्रचीतीला येते.  म्हणून विश्व भासात्मक असून परब्रह्मापासून ते भिन्न नाही, दूर नाही किंवा बाहेरही नाही.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Monday, December 11, 2017

मृगजळ आणि विश्वाचे मिथ्यात्व | Discovering Futility through Mirage



जोपर्यंत मृगजळाचे खरे स्वरूप समजत नाही, तोपर्यंत तो भास सत्य वाटतो.  यामुळे प्रत्यक्षामध्ये तेथे पाणी नसूनही पाणी आहे असे वाटून हरीण तहान शमविण्यासाठी त्या दिशेने धावते.  इतकेच नव्हे तर, मनुष्य सुद्धा पाण्याच्या दिशेने जातो.  परंतु स्वानुभवाने जेव्हा ते पाणी नाही तर, पाण्याचा केवळ भासच आहे हे समजते, त्यानंतर डोळ्यांनी जरी पाणी पाहिले तरी मनुष्यामध्ये प्रवृत्ति दिसत नाही.  

त्याचप्रमाणे जोपर्यंत या दृश्य विश्वाचे असलेले अधिष्ठान – परब्रह्मस्वरूप समजत नाही तोपर्यंत बुद्धि विश्वाला सत्यत्व देते आणि या सत्यत्वबुद्धीमुळेच मनामध्ये विषयकामना निर्माण होते.  असत्य, खोट्या विषयाची कामना कधीही निर्माण होत नाही.  म्हणून सत्यत्वबुद्धीमुळे कामना निर्माण होते आणि कामनापूर्तीसाठी मनुष्य अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होतो.  याप्रमाणे तो कामना-कर्म-कर्मफळ पुन्हा कामना अशा चक्रामध्ये अडकतो.  

परंतु ज्यावेळी तत्त्वविचाराने विश्वाच्या मागे असलेले विश्वाचे खरे सत्य समजते त्यावेळी आपोआपच विश्वाला बुद्धीने दिलेले सत्यत्व नाहीसे होते, विश्वाचे मिथ्या स्वरूप समजते आणि मनाने निर्माण केलेल्या प्रवृत्ति आणि निवृत्ति या वृत्तींचा निरास होतो.  त्यानंतर तो ज्ञानी पुरुष विश्वाच्या मागे धावत नाही आणि विश्वापासून पाळूनही जात नाही.  तर तो विश्वामध्ये राहूनच विश्वापासून अलिप्त राहातो.  सर्व प्रकारची कर्मे करूनही अंतरंगामधून साक्षीस्वरूपाने राहून अकर्ता-अभोक्तास्वरूप असलेल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहातो.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, May 24, 2016

मृगजळापासून शिकवण | Lessons from a Mirage


वाळवंटामध्ये सर्वत्र वाळूचे साम्राज्य असते.  प्रखर उन्हाळ्यात त्या वाळूवर सूर्याचे तप्त किरण पडल्यावर वाळू चमकते.  त्यावेळी तेथे एखाद्या तृषार्त झालेल्या मनुष्याला त्या वाळूवर वाळू न दिसता पाणी दिसते.  पाणी दिसल्याबरोबर त्याला एकदम बरे वाटते.  “ लवकरात लवकर तेथे जावे आणि ते पाणी पिऊन तहान शांत करावी ”, या कल्पनेने तो तृषार्त झालेला मनुष्य वाळवंटामध्ये धावतो, चालतो-चालतो आणि त्याच्या लक्षात येते की, जितका तो पाण्याच्या दिशेने जातो, तितके ते पाणी पुढे-पुढे जात आहे.

जे पाणी त्याची तहान भागवू शकेल, असे खरे पाणी त्याला कधीही प्राप्त होत नाही.  त्यानंतर त्याच्या डोळ्यांना पाणी दिसते, परंतु तोच मनुष्य बुद्धीने विचार करतो की, “ ज्याच्यासाठी मी धावत आहे, ज्याला मी डोळ्यांनी पाणी म्हणून पाहत आहे, तेथे पाणी नाही तर फक्त पाण्याचा एक भास आहे. ”  हे विचारांनी तो जाणतो आणि शांत होतो.

या दृष्टांतामध्ये त्या मनुष्याची प्रवृत्तिनिवृत्तिरहित अवस्था होते.  पाणी घेण्यामध्ये ही प्रवृत्ति नाही आणि पाणी त्याग करण्यामध्ये सुद्धा प्रवृत्ति नाही.  म्हणजे प्रवृत्तीही नाही आणि निवृत्ति सुद्धा नाही.  डोळ्यांना पाणी दिसते, परंतु बुद्धीने त्याच पाण्याचा निरास केलेला आहे.  पाण्यामधील सत्यत्वबुद्धीचा विचाराने निरास होऊन त्या मनुष्याला प्रवृत्तिनिवृत्तिरहित अवस्था प्राप्त होते.

आजपर्यंत संसारामधून कोणीही शाश्वत सुख, सार किंवा तथ्य पाप्त केलेले नाही.  “ हा संसार करून मला खरोखरच नित्य फळ मिळणार की अनित्य फळ मिळणार ? ”  यामध्ये साधकाने विचार करावा.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, ार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ