कोणतेही
ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता आहे. प्रमाकरणं प्रमाणम् | प्रमा
म्हणजे ज्ञान. करण म्हणजे साधन. ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणजे प्रमाण. विश्वातील दृश्य विषयांच्या दर्शनासाठी डोळे,
ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, रसास्वादासाठी जिव्हा आणि सुगंधासाठी
घ्राणेंद्रिये यांची आवश्यकता आहे. म्हणजे
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या अनुभूतीसाठी कर्ण, त्वचा, डोळे, जिव्हा व
घ्राणेंद्रिये ही पंचेंद्रिये प्रमाण आहेत, कारण प्रमाणाशिवाय प्रमा म्हणजे ज्ञान
होऊ शकत नाही.
पंचेंन्द्रियांद्वारे
बाह्य विश्वातील दृश्य विषयांचेच ज्ञान देण्यासाठी प्रमाण आहेत. परंतु आत्मा हा शब्द स्पर्शाप्रमाणे किंवा घटपटाप्रमाणे
विश्वातील विषय नाही. त्यामुळे आत्मा
इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. आत्मा
हा इंद्रियअगोचर आहे. इंद्रियांच्या
कक्षेपलीकडे आहे. तो इंद्रियांचा आत्मा
आहे. त्याच्या अस्तित्वाने इंद्रियांना
अस्तित्व आणि चेतना मिळते आणि ती आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यान्वित होतात. म्हणून पंचज्ञानेंद्रिये आत्मज्ञान देण्यासाठी
असमर्थ आहेत.
तसेच सुखदुःखाप्रमाणे
आत्मा मनाचा विषय नाही, कारण तो मनाचाही आत्मा आहे. त्याच्या अस्तित्वामुळे मनाला चेतना मिळते आणि
मन त्याच्या व्यापारामध्ये कार्यान्वित होते. म्हणून आत्मा मनालाही अगोचर आहे. थोडक्यात व्यावहारिक ज्ञान देणारी सर्व
प्रमाणे आत्म्याचे ज्ञान देण्यास असमर्थ ठरतात. मग आत्मज्ञानासाठी कोणते प्रमाण आहे? शास्त्रकार
सांगतात – वेदान्तो नाम उपनिषद प्रमाणम् |
वेदान्त
म्हणजे उपनिषदे आत्मस्वरूपाचे ज्ञान
देण्यासाठी प्रमाण आहेत. ज्याप्रमाणे आपले मुख पाहण्यासाठी
दर्पणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आत्म्याचे
स्वरूप पाहण्यासाठी वेदांतशास्त्र म्हणजे उपनिषदे दर्पणाप्रमाणे आहेत; कारण सर्व उपनिषदे
आपले अज्ञान दूर करून शुद्ध आत्मस्वरूप प्रकट करतात. साधकाला सच्चिदानंदाची प्राप्ति करून देऊन तृप्त,
संतुष्ट करतात. म्हणून साधकाने,
जिज्ञासूने वेदांतशास्त्राचाच आश्रय घ्यावा.
- Reference: "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 7th Edition, 2010
-
हरी ॐ –
No comments:
Post a Comment