Tuesday, October 11, 2016

आपण मुक्त का नाही आहोत ? | Why We are Not Free ?आत्मस्वरूप सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये ‘अहं’ ‘अहं’ प्रत्ययाने अंतःस्फूर्तपणे स्पष्टपणे अनुभवाला येत असेल तर प्रयत्न न करता अनायासाने सर्व जीव मुक्तच का नाहीत ?  सर्व जीव स्वभावतः जन्मापासून मुक्त पाहिजेत.  परंतु वस्तुस्थिति पाहिली तर, सर्व जीव दुःखी, मर्त्य, संसारी दिसतात. असे का ?

सर्व जीव स्वतःला अहं प्रत्ययाच्या आलंबनाने जाणत असले तरीही त्यांच्या दृष्टीवर अज्ञानरूपी आच्छादन आल्यामुळे स्वतःला असंगचिदानन्दस्वरूपाने स्पष्टपणे जाणत नाहीत.  अहं अस्मि  ‘मी आहे’ हा सर्वांचा अनुभव आहे.  ‘मी’ या प्रत्ययाचे आलंबन देह होतो आणि देहाबरोबर ‘मी’ सुद्धा जन्ममृत्युयुक्त होतो.  यामधूनच ‘मी मर्त्य आहे’ ही भावना निर्माण होते.  थोडक्यात ‘मी आहे’ हे सर्वजण जाणत असले तरीही ‘मी सत्यस्वरूप आहे’ हे कोणीही जाणत नाही.  सत् म्हणजे नित्य अविनाशी होय.  त्रिकालेSपि तिष्ठति इति सत् |  भूत भविष्य, वर्तमान या तीन्हीही काळात सत्तास्वरूपाने असणाऱ्या स्वस्वरूपाची जाणीव असत नाही.

विश्वातील सर्व विषयांचे ज्ञान मी घेतो.  म्हणजेच हे सर्व विश्व ज्ञेय आहे आणि मी त्या सर्वांचा ज्ञाता आहे.  परंतु दुर्दैवाने तो जितके बाह्य विश्वातील विषयांचे ज्ञान घेतो तितक्या प्रमाणात त्याला स्वतःच्या अज्ञानाची अधिक जाणीव होते.  तो स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणामुळे ‘मी’ ज्ञानस्वरूप आहे हे जाणत नाही.

स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणाने दृष्टि आवृत्त झाल्यामुळे मनुष्य ‘मी’लाच देह, इन्द्रिये, मन वगैरेदि म्हणवून घेतो.  या तादात्म्यामुळे त्यांचे सर्व विकार, गुणदोष, सुख-दुःख स्वतःवर आरोपित करतो.  ‘मी सुखी’, ‘मी दुःखी’, असे अविचाराने म्हणतो. यामधूनच तो सुखाचा शोध घेतो.  परंतु शेवटी त्याच्या वाट्याला दुःख, नैराश्य येते.  सतत असंतुष्ट राहातो.  स्वतःला दुःखी, अभागी म्हणवून घेतो.  हे चिरंतन, शाश्वत सुख, आनंद बाह्य विषयांच्यामध्ये नसून ते स्वतःचे स्वरूपच आहे.  दुर्दैवाने ते चिरंतन सुख आपल्या आतच आहे हे मनुष्याला माहीत नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

No comments:

Post a Comment