ज्ञानी पुरुष आत्मचिंतन करून देहात्म्याचा निरास
करतो. त्यानंतर निदिध्यासनेच्या साहाय्याने
तो ज्ञाननिष्ठा प्राप्त करून ब्रह्मस्वरूपामध्ये दृढ होतो. त्यावेळी अज्ञान पूर्णतः ध्वंस होऊन मोहाचाही निरास
होतो आणि विपरीत ज्ञानही गाळून पडते. भ्रांतिरूपी
घनदाट मेघ निरस्त होतात. ज्ञानी पुरुषाच्या
अंतःकरणामध्ये सत्-चित्-आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप, प्रकाशस्वरूप प्रकट होते. तो आणि आत्मचैतन्य भिन्न न राहता तो स्वतःच परब्रह्मस्वरूप
होतो. त्याला एकत्वाची, अद्वैताची अभेद दृष्टि
प्राप्त होते. तो या शरीरामध्ये राहताना शरीरापासून
अत्यंत अलिप्त व अस्पर्शित राहतो.
जसे आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो,
तसेच तो स्वतःच्या शरीरामधये निःसंगपणाने राहतो. भाड्याच्या घरात आपण आयुष्यभर राहिलो तरी आपल्याला
माहीत असते की, हे आपले घर नाही. ते राहायचे
फक्त एक तात्पुरते स्थान आहे. त्याप्रमाणेच
ज्ञानी पुरुषाला अगदी निश्चित माहीत असते की, हे शरीर म्हणजे राहण्याचे फक्त स्थान
आहे. म्हणून तो शरीरापासून स्वतःला पूर्णतः
निवृत्त करतो आणि अखंडपणे ब्रह्मस्वरूपामध्येच रममाण होतो.
म्हणून वसिष्ठ मुनि येथे फार सुंदर दृष्टांत
देतात - धियो दृष्टे तत्त्वे रमणमटनं जागतमिदम् | ज्ञानी पुरुषांचे जगात राहणे म्हणजे जणु काही
सहज फेरफटका मारणे आहे. जसे आपण कंटाळा आला
म्हणून बागेत बाहेर फिरून येतो, तसेच जणु काही या विश्वामध्ये ज्ञानी पुरुष भ्रमण करतो.
विश्वामध्ये सर्वांच्यामध्ये असूनही तो कशानेही
लिप्त होत नाही. अज्ञानीपेक्षा ज्ञानी
पुरुषच विश्वाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो. त्याच्या दृष्टीने जग हे खेळण्याचे, फिरण्याचे एक
स्थान आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुष या जगात
येतो, काही काळ राहतो, निर्लिप्त मनाने सर्व अनुभवतो आणि प्रारब्ध संपले, या उपाधीचे
प्रयोजन संपले की, तो या विश्वामधून निघून जातो. असे सुंदर जीवन ज्ञानी पुरुष जगतो.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–