Saturday, July 25, 2026

अनन्यता | Single Pointed Basis

 




भगवान नारदमहर्षि म्हणतात - अन्याश्रयाणां त्यागः अनन्यता |         (नारदभक्तिसूत्र )

जीवन जगत असताना आपण आपल्या कामना, इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींचा आश्रय घेतो.  भक्ताने, साधकाने या सर्व आश्रयांचा त्याग केला पाहिजे.

 

१. धनाश्रय - व्यवहारामध्ये इच्छापूर्तीचे धन हे प्रमुख साधन मानले जाते.  आपल्याकडे पैसे असेल तर आपण पैशाने वस्तूच काय पण माणसे सुद्धा विकत घेऊ, असा अहंकार निर्माण होतो.  स्वतःच्या धनसंपत्तीवर मनुष्याचा प्रचंड विश्वास असतो.

२. कर्माश्रय - अनेक प्रकारच्या व्यावहारिक बहिरंग कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होऊन मनुष्य आपल्या सर्व कामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.  कर्म हे कामनापूर्तीचे साधन असेल तरीही कर्माने मनुष्याच्या सर्वच कामना पूर्ण होत नाहीत.

३. देवताश्रय - काही भक्त आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या देवतांचा आश्रय घेतात.  साधक आपली ज्ञानसाधना सोडून कामानेने प्रेरित होतो आणि शीघ्र फळ देणाऱ्या या देवतांच्या उपासनेमध्येच रममाण होतो.  यामुळे सतत एकामागे एक कामनांचे वर्धन होऊन भक्त अधिक कामुक, विषयासक्त होतो.  परमेश्वरस्वरूपापासून दूर जातो.

४. अन्य जीवाश्रय - काही लोकांचा अन्य व्यक्ति, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र यांच्यावर विश्वास असतो.  परंतु दुर्दैवाने अन्य लोकही आपल्याप्रमाणेच जीवनामध्ये दुःखी, निराश, उद्विग्न झालेले असतात.  या विश्वामधील अन्य कोणतीही व्यक्ति माझा उद्धार करू शकत नाही.  म्हणून साधकाने अन्य जीवाश्रयाचा त्याग करावा.

५. स्वबलाश्रय - 'मी' माझ्या कर्तृत्वाने जप, तप, साधना, उग्र तपश्चर्या करून परमेश्वराला प्राप्त कारेन, असा अहंकार निर्माण होतो.  परंतु स्वकर्तृत्वाचा अहंकार आणि परमेश्वर या दोन गोष्टी एके ठिकाणी राहू शकत नाहीत.  म्हणून साधकाने या फाजील आत्मविश्वासाचाही त्याग करावा.

 

भक्ताने या सर्व आश्रयांचा फोलपणा, मर्यादा जाणाव्यात.  त्याचवेळी भक्त अत्यंत अगतिक, व्याकूळ होईल.  त्यावेळी तो परमेश्वराची कर्तुं-अकर्तुं शक्ति मान्य करून अनन्य भावाने परमेश्वरचरणी लीन होईल.  त्याचवेळी अन्य आश्रय आपोआप गळून पडतात.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, July 21, 2026

सत् , असत् की अतीत ? | Real, Apparent Or Transcendental?

 




ज्यावेळी चैतन्य हे 'अहं' वृत्तीने युक्त होते, त्यावेळी त्याला 'जीव' अशी संज्ञा मिळते.  ज्यावेळी चैतन्य समुद्रामधील तरंगांच्याप्रमाणे विविध संकल्प, विकल्प, अनेक भ्रम यांच्या रूपाने स्फुरण पावते, त्यावेळी त्याला 'जग' असे म्हणतात.  चैतन्यमधून संकल्पविकल्पादि भ्रम निर्माण झालेले आहेत.  चैतन्यामधूनच सर्व विषयवृत्ति निर्माण होतात.  पदार्थ किंवा जग म्हणजे जणु काही चैतन्यला मिळालेले आकार आहेत.  म्हणून घटचैतन्य, पटचैतन्य, सूर्यचैतन्य असे सर्व जगच चैतन्यमय आहे.  दिसते ते सर्वच चैतन्य आहे.  चैतन्यापासून कोणताही पदार्थ भिन्न नाही किंवा चैतन्यापासून दूर ही नाही.  म्हणून विषय पाहणे म्हणजे चैतन्याचेच दर्शन आहे.  याप्रमाणे सर्वच चैतन्यस्वरूप आहे.

 

हे रामा !  या सृष्टीच्या पूर्वी चैतन्यच अस्तित्वामध्ये होते.  तेच चैतन्य सृष्टीचे कारण बनून सृष्टीच्या प्रारंभी सृष्टीची लीला निर्माण करते.  स्वतःमध्येच सृष्टि निर्माण करते.  म्हणजे चैतन्य स्वतःमध्येच विश्वरूपाने व्यक्त होते.  मात्र सृष्टि निर्माण झाल्यानंतरही चैतन्यामध्ये कोणताही बदल किंवा परिणाम होत नाही.  जसे दोरीमधून साप निर्माण होताना दोरीमध्ये कोणताही बदल होत नाही.  दोरी हालत नाही किंवा विषारीही होत नाही.  दोरी ही दोरीच राहते.  मात्र दोरी तिच्या स्वरूपामध्ये सर्परूपाने भासमान होते.  दोरीमध्ये दिसणारा सर्प हा वस्तुतः असत् असूनही सत् असल्यासारखा आपल्याला भासतो.

 

त्याचप्रमाणे जीव व जग हे प्रत्यक्ष असत् असूनही सत् असल्यासारखे भासते.  खरे तर त्याला सत् ही म्हणता येत नाही आणि असत् ही म्हणता येत नाही.  आत्मज्ञानाच्या प्रभावाने चैतन्य आपल्या जगद्रूपाचा स्वतःच निरास करते.  म्हणजे ज्ञानाने जगद्रूप चैतन्याचा निरास होऊन अधिष्ठानरूप चैतन्य शिल्लक राहते.  म्हणून चैतन्यस्वरूप हे सत् आणि असत् या दोन्हींच्या अतीत असून दोन्हींच्याही आत अधिष्ठानस्वरूपाने आहे.  याचे कारण जग आहे असे म्हणावे तर जगाचा निरास होतो आणि नाही असे म्हणावे तर हे जग डोळ्यांना दिसते.  म्हणून संस्कृतमध्ये म्हटले जाते - सत् चेत् न बाधेत असत् चेत् न प्रतीयेत |  वस्तु सत् स्वरूप असेल तर तिचा कधी निरास होत नाही आणि वस्तु असत् असेल तर त्याचा कधीही अनुभव येत नाही.  म्हणून विश्वरूपी असणारे चैतन्य हे सत् ही नाही आणि असत् ही नाही, तर ते या दोन्हींचेही अधिष्ठान आहे.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ


Tuesday, July 14, 2026

प्रेम आणि ज्ञानी पुरुष | Love and The Self-Realized

 




अज्ञानी पुरुष कधीतरी प्रेम करतो आणि पुष्कळ वेळेला द्वेष करतो.  कधीतरीच त्याला प्रेमाचा उमाळा येतो परंतु ती प्रेमाची उर्मी काळाच्या ओघात निघूनही जाते.  म्हणजेच जोपर्यंत अहंकाराला पोषक वातावरण असते, तोपर्यंतच प्रेम असते, नंतर तो तिरस्कार करतो.  असे प्रेम तर कोणीही करते.  पशु सुद्धा करतात.  त्यामध्ये काही विशेष पुरुषार्थ नाही.  परंतु ज्ञानी पुरुष मात्र नित्य-निरंतर प्रेम करतो.  येथे ‘निरंतर’ हा खूप महत्वाचा शब्द आहे.  अज्ञानी पुरुष द्वेष करणे सोडत नाही आणि ज्ञानी पुरुष प्रेम करणे, क्षमा करणे सोडत नाही.

 

मनुष्य स्वतःवरच जास्त प्रेम करतो.  आत्मस्वरूप हेच प्रेमाचे आश्रयस्थान आहे.  माणसाने दुसऱ्यांवर कितीही प्रेम केले तरी ती प्रेमाची उर्मी येते आणि निघूनही जाते.  प्रेमाची जागा द्वेषबुद्धि घेते.  त्याला ‘प्रेम’ म्हणता येत नाही.  म्हणून मनुष्याचे खरे प्रेम स्वतःवरच आहे.  मी अखंडपणे माझ्यावर सतत प्रेमच करीत असतो.  मी कधीही मला अप्रिय होत नाही.  मी माझ्या स्वतःचा द्वेष करूच शकत नाही.  ज्ञानी पुरुष सर्व भूतमात्रांच्यामध्ये स्वतःलाच पाहत असल्यामुळे तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही.  त्याला समत्वाची, एकत्वाची दृष्टि प्राप्त होते.  जसे तो स्वतःवर प्रेम करतो, तसेच सर्वांच्यावर करू शकतो.

 

श्री रामकृष्ण परमहंस फार सुंदर गोष्ट सांगत – एकदा एक विंचु पाण्यामध्ये पडला.  त्या विंचवाला वाचविण्यासाठी एक साधु त्याला पाण्यातून बाहेर काढत होता, पण विंचु त्याला चावत होता.  असे एकदा नाही तर अनेक वेळेला घडले.  त्यावेळी हे सर्व पाहणारा एक मनुष्य त्या साधूला म्हणाला की, “तो विंचु तुम्हाला चावत आहे तरी तुम्ही त्याला का वाचवत आहात ?”  त्यावर साधु उत्तर देतो, “चावणे हा विंचवाचा धर्म आहे, विंचु त्याचा धर्म सोडत नाही.  दया करणे हा साधूचा धर्म आहे, मग तो मी का बरे सोडू ?”  ही साधूची, ज्ञानी पुरुषाची उदात्त परमोच्च दृष्टि आहे.  त्या दृष्टीमध्ये स्वार्थ नाही, कामना अपेक्षा नाहीत, व्यक्तिगत रागद्वेष नाही, आपपर भाव नाही, अहंकार, ममकार प्रत्यय नाहीत, तर ती शुद्ध, निर्विशेष, आत्मचैतन्यस्वरूपाची अभेद दृष्टि आहे.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ



Tuesday, July 7, 2026

ज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Knowledge

 



आत्माकार वृत्ति होणे म्हणजेच ज्ञान असून ते ज्ञान सात प्रकारचे आहे.  मुक्ति हीच ज्ञेयवस्तु असून ती मुक्ति या सात भूमिकांच्याही अतीत आहे.  ज्याला सत्यवस्तूचा अवबोध होतो, तो जीव पुन्हा कधीही या संसारचक्रामध्ये बद्ध होत नाही.

 

शुभेच्छा या पहिल्या भूमिकेमध्ये मनुष्य विचारशील असतो.  वैराग्य उत्पन्न होण्यापूर्वी अशी जी शास्त्रश्रवणाची व सत्संगाची इच्छा निर्माण होते, यालाच "शुभेच्छा" असे म्हणतात.

 

यानंतर तो मनुष्य शास्त्राच्या व सज्जनांच्या संगामध्ये जातो.  शास्त्रश्रवण करून शास्त्रावर चिंतन करतो.  सत्संगाच्या प्रभावाने त्याच्या अंतःकरणात बाह्य विषयांच्याबद्दल विरक्ति उत्पन्न होते.  मग तो सदाचाराकडे प्रवृत्त होतो.  म्हणजेच श्रवण-मननादि असणाऱ्या सदाचाररूपी साधनेमध्ये त्याची प्रवृत्ति होते.  यालाच "विचारणा" असे म्हणतात.

 

शुभेच्छा आणि विचारणा या दोन भूमिकांच्या दीर्घकाळ केलेल्या अभ्यासामुळे विषयांच्यामधील आसक्ति नाहीशी होते.  यालाच "तनुमानसा" असे म्हणतात.  ज्याने प्रथम दीर्घकाळ नित्यानित्यविवेक केला आहे, सत्संगामध्ये जाऊन श्रवणादि साधना केली आहे, असा साधक ज्ञानाच्या पुढच्या भूमिकेमध्ये प्रवेश करतो.  तनुमानसा भूमिकेत साधकाचे मन विरक्त झाल्यामुळे अत्यंत सूक्ष्म होते.

 

याप्रमाणे शुभेच्छा, विचारणा व तनुमानसा या तीन भूमिकांचा ज्याने दीर्घकाळ अभ्यास केला आहे, त्याच्या चित्तामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न होते.  असे विरक्त चित्तच शुद्ध व सत्यस्वरूप आत्मस्वरूपामध्ये स्थित होते.  यालाच "सत्त्वापत्ति" असे म्हणतात.  हे ज्ञानाची चवथी भूमिका आहे.  

 

यानंतर वरील चार भूमिकांच्या अभ्यासामुळे साधक पूर्णतः निःसंग होतो. त्याचे चित्त सत्त्वगुणावर आरूढ होते.  यालाच "असंसक्ति" असे म्हणतात.  ही ज्ञानाची पाचवी भूमिका आहे.  

 

या पाच भूमिकांच्या अभ्यासाने साधक आत्मस्वरूपामध्ये रममाण होऊन त्याला दृढ आत्मनिष्ठा प्राप्त होते.  त्यावेळी त्याला अंतःकरणामध्ये किंवा बाहेर कोठेही दृश्य पदार्थांचे भान राहत नाही.  या अवस्थेत साधक देहभान, विश्वाचे भान हरपतो.  त्याचे चित्त स्वस्वरूपामध्ये तल्लीन, तन्मय व तद्रूप होते.  आत्मचैतन्याव्यतिरिक्त अन्य कशाचेही भान किंवा जाणीव राहत नसल्यामुळे या भूमिकेला "पदार्थाभावनी" असे म्हणतात.

 

याप्रमाणे पूर्वोक्त सहा भूमिकांचा जो साधक दृढ अभ्यास करतो, त्याच्या चित्तामधून सर्व भेद पूर्णतः नष्ट होतात.  भेदबुद्धीचा-द्वैतबुद्धीचा पूर्णतः निरास होतो.  जीव-जगत-ईश्वर हे भेद संपतात व चित्त पूर्णतः स्वस्वरूपाशी तन्मय होते.  याप्रमाणे चित्ताला अशी स्वरूपनिष्ठा प्राप्त झाली की, त्या स्थितीला "तुर्यगा" असे म्हणतात.  ही ज्ञानाची सातवी भूमिका आहे.  सर्व जीवन्मुक्त पुरुषांच्यामध्ये ही तुर्यावस्था विद्यमान असते.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, June 30, 2026

भक्ति म्हणजे परमेश्वराला निवडणे | Bhakti - Choosing The Supreme

 



महाभारतीय युद्ध सुरु होण्यापूर्वी युद्धामध्ये सहकार्य मागण्यासाठी दोन्हीही पक्षाकडील बलाढ्य वीर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे येतात.  भगवान म्हणतात, "दुर्योधना, तू प्रथम आला असशील तरीही अर्जुन माझ्या चरणांशी बसल्यामुळे डोळे उघडताक्षणी मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे.  तेव्हा प्रथम अर्जुन मागेल."  पार्थ अर्जुन हे ऐकून खूप सुखावतो.  त्याच्या मुखामधून अनाहूतपणे स्फुट शब्द बाहेर येतात.  "भगवंता !  आज मला तुझे सैन्य नको, शस्त्रास्त्रे नकोत.  काहीही नको, परमेश्वरा, मला फक्त माझ्या पक्षात 'तू' असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे 'धर्मयुद्ध' आहे.  तू निःशस्त्र असलास तरी चालेल.  तुझे केवळ अस्तित्वच अत्यंत मंगलकारक, स्फूर्तिदायक आहे.  तू माझ्या पक्षात असताना सर्व विश्व माझ्या विरुद्ध गेले तरीही माझा नाश खचित होणार नाही.  या विश्वामधील कोणतीही शक्ति मला स्पर्शदेखील करणार नाही."

 

हे अपेक्षित उत्तर ऐकून भगवान फक्त हसतात आणि दुर्योधन आनंदाने निःश्वास सोडतो, कारण त्यालाही हेच हवे असते.  "निःशस्त्र कृष्ण काय करणार ?  त्यापेक्षा त्याचे सैन्य मिळाले तर पर्यायाने आपले सैन्यबल अधिक वाढेल व आपला विजय निश्चित होईल", अशी त्याची विचारसरणी असते.  तो अर्जुनाला मनामध्ये मूर्ख ठरवून त्याला शतशः धन्यवाद देतो.  भगवंताव्यतिरिक्त उरलेला वाटा दुर्योधनास मिळतो आणि भगवंताचा वाटा भगवंताच्या प्रियसख्या अर्जुनाला मिळतो.  दोन्हीही वीर आपापल्या वाटेने निघून जातात.  येथे प्रसंग संपतो.

 

परंतु या प्रसंगाचा खरा अर्थ, खरा निर्णय दिव्यदृष्टि प्राप्त झालेला संजय स्वतःच गीतेच्या अंतिम श्लोकामध्ये स्पष्ट करतो -

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः |

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||                             (गीता अ. १८-७८)

ज्याठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ अर्जुन त्याठिकाणी लक्ष्मी, विजय, यश, ऐश्वर्य, नीति, धर्म आहे असे माझे निश्चित मत आहे.  या कथेचा अभिप्राय एकच की, भक्ताने परमेश्वराला निवडावे.  परमेश्वरालाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे. हीच भक्ति आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, June 23, 2026

बोधचंचु | Pretentious Orator

 




साधकाने दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचे निरीक्षण करावे.  आपल्याला जी अल्पबुद्धि मिळालेली आहे, त्या बुद्धीच्या साहाय्याने युक्तीचा आधार घेऊन शास्त्राचे सार समजावून घ्यावे.  परंतु जे लोक योग्यायोग्याचा विचार करीत नाहीत म्हणजे आपण जे बोलतो ते योग्य आहे की अयोग्य आहे, याचेही ज्यांना भान राहत नाही, ते लोक दुसऱ्यांच्या मताचे खंडन कारण्यामध्येच स्वतःला ज्ञानी समजतात.  असा मनुष्य सतत दुसऱ्यांना उपदेश देण्याचा प्रयत्न करतो.  परंतु दुसरे लोकही अशा बोधचंचु मनुष्याचे उपदेश फार काळ ऐकू शकत नाहीत.  काळाच्या ओघात दुसऱ्यांना उपदेश देणाऱ्या या साधकाचा अहंकार वाढतो.  त्याचे मन अस्वस्थ व अशांत होते.  त्यामुळे त्याला स्वतःलाही आनंद होत नाही आणि त्याच्या उपदेशाने दुसऱ्यालाही आनंद किंवा शांति मिळत नाही.  अशा शाब्दिक पांडित्य असणाऱ्या पढतमूर्खाने अधिकार नसताना दुसऱ्या अज्ञानी मनुष्याला ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजे एका अंध मनुष्याने दुसऱ्या अंध मनुष्याला मार्ग दाखविण्यासारखे निष्फळ, व्यर्थ व अनर्थकारक आहे.

 

हे रामा !  वस्तुतः प्रत्येकाच्या हृदयाकाशामध्ये सच्चिदानंदस्वरूप असणारे चैतन्य आहेच.  परंतु अज्ञानी मनुष्य आपल्या आत चैतन्य न पाहता सर्व अनर्थच पाहतो.  अशा अज्ञानी मनुष्याला 'बोधचंचु' असे म्हणतात.  जो स्वतः अज्ञानी आहे.  परंतु तरीही त्याला स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान असतो तो बोधचंचु मनुष्य स्वतःचा व दुसऱ्याचाही घात करतो.  कारण त्याचे शाब्दिक ज्ञान व त्याचा अनुभव यामध्ये एकवाक्यता नसते.  असा पढतमूर्ख मनुष्य दुसऱ्यांना उपदेश देण्यात तत्पर असेल, निष्णात असेल तरी साधकाने त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नये.  अध्यात्ममार्गामध्ये साधकाने अशा पढतमुर्खांच्यापासून, दांभिक लोकांच्यापासून अत्यंत सावध राहावे.  ढगांनी आकाशाला मलीन करावे, त्याचप्रमाणे हा बोधचंचु मनुष्य आपल्या ज्ञानावर अभिमानाचे व कुतर्काचे आवरण घालून नाश करतो.

 

म्हणून हे रामा !  आत्मज्ञान घेताना अशा बोधचंचु लोकांना किंवा त्यांच्या वचनांना प्रमाणभूत मानू नये.  जसे समुद्रामधून सर्व बाजूंनी अनेक प्रकारे पाणी प्रवेश करते.  समुद्र त्या सर्व प्रवाहांना सामावून घेतो.  त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अन्य सर्व प्रमाणांच्या समावेश होतो.  म्हणून तेच ज्ञानाचे खरे प्रमाण आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, June 16, 2026

हेतुफलात्मक जीव | Purpose-bearing Being

 



हेतुफलात्मक जीव म्हणजे काय ?  प्रत्येक जीव सर्वप्रथम मी कर्ता आहे, अशी कर्तृत्वभावना निर्माण करतो.  त्यामुळे तो चांगल्या-वाईट अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  यानंतर या कर्मांचे, ते ते चांगले-वाईट फळ या जीवाला प्राप्त होते.  तेव्हा जीवाला वाटते की, मला सुख-दुःख झाले.  ही भोक्तृत्वभावना त्याच्यामध्ये निर्माण होते.  याप्रकारे जीव ‘मी’ करतो, या कर्तृत्वभावनेने व मी सुखी-दुःखी या भोक्तृत्वभावनेने युक्त होतो.  म्हणून येथे कर्तृत्वभावना हे कारण असून सुखदुःख हे त्याचे फळ आहे.

 

भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते |            (गीता अ. ३-२७)

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.  अशा या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले आहे.  कर्तृत्वभावना हा हेतु-कारण असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे.  जीव या हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.

 

वस्तुतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वरस्वरूप, शुद्ध चैतन्यस्वरूप, परिपूर्ण आनंदस्वरूप आहे.  परंतु या शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये या हेतुफलात्मक, बद्ध जीवाची कल्पना निर्माण होते.  कशी ?  आचार्य सांगतात – रज्ज्वां इव सर्प कल्पयते |  ज्याप्रमाणे शुद्ध, स्थिर रज्जूवर–दोरीवर चंचल–अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये हेतुफलात्मक जीवाची म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध असणाऱ्या, मर्यादित, संसारी जीवाची कल्पना निर्माण होते.

 

एकदा हा अज्ञानमूलक जीवभाव निर्माण झाला की, त्यापासून पुढे सर्व अनर्थपरंपरा निर्माण होते.  आपल्याला आता काहीतरी करावयाचे आहे, काहीतरी मिळवायचे आहे, अशी भावना निर्माण झाली की, मग ती पूर्ण होण्यासाठी क्रिया-कारक-फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आध्यात्मिक प्राणादि अंतर्बाह्य अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ