Showing posts with label Purpose. Show all posts
Showing posts with label Purpose. Show all posts

Tuesday, June 16, 2026

हेतुफलात्मक जीव | Purpose-bearing Being

 



हेतुफलात्मक जीव म्हणजे काय ?  प्रत्येक जीव सर्वप्रथम मी कर्ता आहे, अशी कर्तृत्वभावना निर्माण करतो.  त्यामुळे तो चांगल्या-वाईट अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  यानंतर या कर्मांचे, ते ते चांगले-वाईट फळ या जीवाला प्राप्त होते.  तेव्हा जीवाला वाटते की, मला सुख-दुःख झाले.  ही भोक्तृत्वभावना त्याच्यामध्ये निर्माण होते.  याप्रकारे जीव ‘मी’ करतो, या कर्तृत्वभावनेने व मी सुखी-दुःखी या भोक्तृत्वभावनेने युक्त होतो.  म्हणून येथे कर्तृत्वभावना हे कारण असून सुखदुःख हे त्याचे फळ आहे.

 

भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते |            (गीता अ. ३-२७)

अहंकाराने विमूढ झालेला जीव स्वतःलाच कर्ता म्हणवून घेतो.  अशा या कर्तृत्व व भोक्तृत्व भावनेने युक्त झालेल्या अज्ञानी जिवालाच हेतुफलात्मक जीव असे म्हटले आहे.  कर्तृत्वभावना हा हेतु-कारण असून सुखदुःखे हे त्याचे फळ आहे.  जीव या हेतुफळांनी म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध, मर्यादित व संसारी होतो.

 

वस्तुतः प्रत्येक जीव हा स्वतः ईश्वरस्वरूप, शुद्ध चैतन्यस्वरूप, परिपूर्ण आनंदस्वरूप आहे.  परंतु या शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये या हेतुफलात्मक, बद्ध जीवाची कल्पना निर्माण होते.  कशी ?  आचार्य सांगतात – रज्ज्वां इव सर्प कल्पयते |  ज्याप्रमाणे शुद्ध, स्थिर रज्जूवर–दोरीवर चंचल–अस्थिर सर्पाची कल्पना निर्माण होते, त्याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्यस्वरूपामध्ये हेतुफलात्मक जीवाची म्हणजेच कर्म-कर्मफळाने बद्ध असणाऱ्या, मर्यादित, संसारी जीवाची कल्पना निर्माण होते.

 

एकदा हा अज्ञानमूलक जीवभाव निर्माण झाला की, त्यापासून पुढे सर्व अनर्थपरंपरा निर्माण होते.  आपल्याला आता काहीतरी करावयाचे आहे, काहीतरी मिळवायचे आहे, अशी भावना निर्माण झाली की, मग ती पूर्ण होण्यासाठी क्रिया-कारक-फलभेदाने युक्त असणाऱ्या अनेकविध बाह्य व आध्यात्मिक प्राणादि अंतर्बाह्य अनंत पदार्थांची कल्पना निर्माण होते.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, June 13, 2023

ज्ञानाचे प्रयोजन आणि उपशमा | Purpose And Culmination Of Knowledge

 



अध्यात्मशास्त्राचे श्रवण करताना जो जो उपदेश आरंभ केला जातो, तसेच प्रमाण-प्रमेय विषयक ज्या-ज्या सर्व दृष्टि आहेत, हे सर्व ज्ञान साधकाला आत्मतत्त्वाचा अनुभव येईपर्यंतच उपयोगी असते.  त्यानंतर हा सर्व उपदेश, या सर्व शास्त्रदृष्टि, हे ज्ञान या सर्वांची उपशमा होते.  कारण आत्मानुभूतीनंतर उपदेशाचे प्रयोजन सुद्धा संपते.

 

श्रीवसिष्ठ मुनि येथे श्रीरामांना उपदेश देण्यापूर्वीच त्या ज्ञानाचे स्वरूप व प्रयोजन सांगतात.  शास्त्र ऐकताना साधकाला शास्त्राची दृष्टि समजणे अत्यंत आवश्यक आहे.  शास्त्राचे शाब्दिक ज्ञान समजणे सोपे आहे.  संस्कृत येत असेल तर शब्दार्थ, अन्वयार्थ लावून आपल्याला थोडेफार समजू लागते.  "यत् दृष्टं तत् नष्टम् |"  असे युक्तिवादही बुद्धीला समजू लागतात.  परंतु श्रुति आणि युक्ति समजल्यानंतर अनुभव येणे महत्त्वाचे आहे.  अनुभव नसेल तर त्या शाब्दिक पांडित्यामध्ये काहीही अर्थ नाही.  म्हणून शास्त्रामध्ये श्रवण, मनन, निदिध्यासना अशा तीन साधना सांगितल्या जातात.

 

श्रवणामधून शास्त्राचे शाब्दिक ज्ञान होते.  मननामधून त्या ज्ञानाविषयीच्या शंका नष्ट होतात आणि निदिध्यासनेने ते ज्ञान दृढ होऊन त्याच्यामध्ये निष्ठा प्राप्त होते.  ज्ञाननिष्ठा प्राप्त होऊन साधकाला ज्यावेळेस 'मी' स्वतःच आनंदस्वरूप आहे, अशी अनुभूति येते, त्यावेळी मग शाब्दिक ज्ञानाचेही प्रयोजन संपते.  शास्त्राचे सर्व आरंभ, शास्त्रबुद्धि या सर्वांची उपशमा होते.  कारण 'मी' स्वतःच सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म आहे, ही अनुभूति आली की, शास्त्राचे प्रयोजनच संपते.

 

आदि शंकराचार्य म्हणतात (आत्मबोध) –

अज्ञानकलुषं जीवं ज्ञानाभ्यासात् विनिर्मलं |  कृत्वा ज्ञानं स्वयं नश्येत् जलं कतकरेणुवत् ||  आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे अहंकारादि प्रत्ययांनी कलुषित झालेला जीव ज्ञानाभ्यासामुळे अज्ञानाचा नाश होऊन अत्यंत शुद्ध, विकाररहित होतो.  त्यामुळे जसे कतकरेणु प्रथम सर्व पाणी शुद्ध करून नंतर स्वतः सुद्धा नाश पावतो, त्याचप्रमाणे ज्ञानाने जीवाच्या अज्ञानउपाधीचा नाश होऊन जीव स्वतःच परब्रह्मस्वरूप होतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Saturday, March 21, 2015

अनादि आणि अनंत संसार | Beginning-less and Endless Illusion


संसाराला अनादि आणि अनंत ही दोन विशेषणे वापरली आहेत.  संसाराला सुरुवातही नाही आणि शेवट सुद्धा नाही.  तो अनादि आहे, त्याला सुरुवात नाही, कारण या संसाराचे उपादान कारण अविद्या आहे.  अविद्या ही अनादि आहे.  म्हणूनच कोणत्याही वस्तूचे अज्ञान केव्हा निर्माण झाले ?  हे सांगता येत नाही.  उदा. माझ्यामध्ये फ्रेंच भाषेचे अज्ञान केव्हापासून निर्माण झाले, हे सांगता येत नाही.  म्हणून अज्ञान हे अनादि आहे.  अज्ञानाला निश्चित सुरुवात नाही.

जसे कारण तसे कार्य, या न्यायाने अज्ञानाचे कार्य असणारा संसार सुद्धा अनादि आहे.  म्हणूनच संसाराला सुरुवात कोठून झाली ?  हे सांगता येत नाही.  जसे, वृक्ष प्रथम की बीज प्रथम ?  हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.  तसेच संसार केव्हा निर्माण झाला ?  हे सांगता येत नाही.

तसेच, येथे संसाराचे दुसरे विशेषण अनंत हे आहे.  ज्याचा अंत, नाश होत नाही, त्याला ‘अनंत’ असे म्हणतात.  संसार हा अनंत आहे.  अनेक शरीरे जन्माला आली आणि मरण पावली, परंतु शरीराचा नाश म्हणजे संसाराचा नाश नव्हे.  आपण मरण पावलो की, सर्व संसारामधून, दुःखांच्यामधून मुक्त होऊ, अशी आपली कल्पना असते.

परंतु जोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा उदय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कर्मांनी, कोणत्याही साधनेने या संसाराचा ध्वंस होणे शक्य नाही.  तोपर्यंत हा संसार अनंत आहे.  अशा या अनादि आणि अनंत संसाराचे हनन करणे, निरास करणे हेच प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे.


- "मुण्डकोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मार्च २००७  
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007




- हरी ॐ