Tuesday, June 30, 2026

भक्ति म्हणजे परमेश्वराला निवडणे | Bhakti - Choosing The Supreme

 



महाभारतीय युद्ध सुरु होण्यापूर्वी युद्धामध्ये सहकार्य मागण्यासाठी दोन्हीही पक्षाकडील बलाढ्य वीर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे येतात.  भगवान म्हणतात, "दुर्योधना, तू प्रथम आला असशील तरीही अर्जुन माझ्या चरणांशी बसल्यामुळे डोळे उघडताक्षणी मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे.  तेव्हा प्रथम अर्जुन मागेल."  पार्थ अर्जुन हे ऐकून खूप सुखावतो.  त्याच्या मुखामधून अनाहूतपणे स्फुट शब्द बाहेर येतात.  "भगवंता !  आज मला तुझे सैन्य नको, शस्त्रास्त्रे नकोत.  काहीही नको, परमेश्वरा, मला फक्त माझ्या पक्षात 'तू' असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे 'धर्मयुद्ध' आहे.  तू निःशस्त्र असलास तरी चालेल.  तुझे केवळ अस्तित्वच अत्यंत मंगलकारक, स्फूर्तिदायक आहे.  तू माझ्या पक्षात असताना सर्व विश्व माझ्या विरुद्ध गेले तरीही माझा नाश खचित होणार नाही.  या विश्वामधील कोणतीही शक्ति मला स्पर्शदेखील करणार नाही."

 

हे अपेक्षित उत्तर ऐकून भगवान फक्त हसतात आणि दुर्योधन आनंदाने निःश्वास सोडतो, कारण त्यालाही हेच हवे असते.  "निःशस्त्र कृष्ण काय करणार ?  त्यापेक्षा त्याचे सैन्य मिळाले तर पर्यायाने आपले सैन्यबल अधिक वाढेल व आपला विजय निश्चित होईल", अशी त्याची विचारसरणी असते.  तो अर्जुनाला मनामध्ये मूर्ख ठरवून त्याला शतशः धन्यवाद देतो.  भगवंताव्यतिरिक्त उरलेला वाटा दुर्योधनास मिळतो आणि भगवंताचा वाटा भगवंताच्या प्रियसख्या अर्जुनाला मिळतो.  दोन्हीही वीर आपापल्या वाटेने निघून जातात.  येथे प्रसंग संपतो.

 

परंतु या प्रसंगाचा खरा अर्थ, खरा निर्णय दिव्यदृष्टि प्राप्त झालेला संजय स्वतःच गीतेच्या अंतिम श्लोकामध्ये स्पष्ट करतो -

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः |

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||                             (गीता अ. १८-७८)

ज्याठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ अर्जुन त्याठिकाणी लक्ष्मी, विजय, यश, ऐश्वर्य, नीति, धर्म आहे असे माझे निश्चित मत आहे.  या कथेचा अभिप्राय एकच की, भक्ताने परमेश्वराला निवडावे.  परमेश्वरालाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे. हीच भक्ति आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ