Showing posts with label Bhakti. Show all posts
Showing posts with label Bhakti. Show all posts

Tuesday, June 30, 2026

भक्ति म्हणजे परमेश्वराला निवडणे | Bhakti - Choosing The Supreme

 



महाभारतीय युद्ध सुरु होण्यापूर्वी युद्धामध्ये सहकार्य मागण्यासाठी दोन्हीही पक्षाकडील बलाढ्य वीर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे येतात.  भगवान म्हणतात, "दुर्योधना, तू प्रथम आला असशील तरीही अर्जुन माझ्या चरणांशी बसल्यामुळे डोळे उघडताक्षणी मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे.  तेव्हा प्रथम अर्जुन मागेल."  पार्थ अर्जुन हे ऐकून खूप सुखावतो.  त्याच्या मुखामधून अनाहूतपणे स्फुट शब्द बाहेर येतात.  "भगवंता !  आज मला तुझे सैन्य नको, शस्त्रास्त्रे नकोत.  काहीही नको, परमेश्वरा, मला फक्त माझ्या पक्षात 'तू' असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे 'धर्मयुद्ध' आहे.  तू निःशस्त्र असलास तरी चालेल.  तुझे केवळ अस्तित्वच अत्यंत मंगलकारक, स्फूर्तिदायक आहे.  तू माझ्या पक्षात असताना सर्व विश्व माझ्या विरुद्ध गेले तरीही माझा नाश खचित होणार नाही.  या विश्वामधील कोणतीही शक्ति मला स्पर्शदेखील करणार नाही."

 

हे अपेक्षित उत्तर ऐकून भगवान फक्त हसतात आणि दुर्योधन आनंदाने निःश्वास सोडतो, कारण त्यालाही हेच हवे असते.  "निःशस्त्र कृष्ण काय करणार ?  त्यापेक्षा त्याचे सैन्य मिळाले तर पर्यायाने आपले सैन्यबल अधिक वाढेल व आपला विजय निश्चित होईल", अशी त्याची विचारसरणी असते.  तो अर्जुनाला मनामध्ये मूर्ख ठरवून त्याला शतशः धन्यवाद देतो.  भगवंताव्यतिरिक्त उरलेला वाटा दुर्योधनास मिळतो आणि भगवंताचा वाटा भगवंताच्या प्रियसख्या अर्जुनाला मिळतो.  दोन्हीही वीर आपापल्या वाटेने निघून जातात.  येथे प्रसंग संपतो.

 

परंतु या प्रसंगाचा खरा अर्थ, खरा निर्णय दिव्यदृष्टि प्राप्त झालेला संजय स्वतःच गीतेच्या अंतिम श्लोकामध्ये स्पष्ट करतो -

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः |

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||                             (गीता अ. १८-७८)

ज्याठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ अर्जुन त्याठिकाणी लक्ष्मी, विजय, यश, ऐश्वर्य, नीति, धर्म आहे असे माझे निश्चित मत आहे.  या कथेचा अभिप्राय एकच की, भक्ताने परमेश्वराला निवडावे.  परमेश्वरालाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे. हीच भक्ति आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–




Monday, January 29, 2024

फक्त भक्तीचाच आश्रय घ्यावा | Take Refuge In Devotion Alone

 




शास्त्रामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान अशा प्रकारची अनेक साधने दिलेली असली तरीही अत्यंत दुःखनिवृत्ति आणि निरतिशय आनंदप्राप्तीसाठी अन्य साधनांचा त्याग करून फक्त भक्तीचाच आश्रय घ्यावा.  याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१) भक्तिशास्त्रामध्ये भगवंतावर प्रेम करण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्याची जरुरी नाही.

२) कर्म, ज्ञान, योग यांच्याप्रमाणे भक्तीमध्ये अन्य साधनांची अपेक्षा नाही.  ती स्वतःफलरूप आहे.

३) अन्य मार्गामध्ये अनेक प्रतिबंध आणि प्रत्यवाय दोष निर्माण होतात.  त्याप्रमाणे भक्तीमध्ये प्रतिबंध आणि दोष नाहीत.

४) अन्य मार्गामध्ये अहंकार, दंभ, दर्प निर्माण होण्याची शक्यता आहे.  भक्तीमध्ये अहंकाराचा नाश होऊन समर्पण वृत्ति निर्माण होते. भक्ति आणि अहंकार एकाच ठिकाणी असू शकत नाही.

५. अन्य मार्गाने अंतःकरणशुद्धि, मनःसंयमन, मनाची एकाग्रता वगैरेंसाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात.  इतके करूनही निराशा येते.  परंतु भक्तीमध्ये हे सर्व सहज, विशेष परिश्रम न करता भक्ताला मिळते.

६) अन्य मार्गामध्ये साधन आणि साध्य भिन्न आहे.  त्यामुळे फळ कालांतराने मिळते.  भक्तीमध्ये भक्ति हेच साधन आणि भक्ति हेच साध्य आहे.  त्यामुळे भक्तीचे फळ कालांतराने नसून तात्काळ प्राप्त होते.

७) केवळ ज्ञान वगैरे साधनांनी परमेश्वराशी जवळीक निर्माण होत नाही.  तर उलट प्रेमाने ईश्वराशी अत्यंत जवळीक निर्माण होते.  अनन्य भक्तीने परमेश्वर सहज प्रसन्न होतो.

८) भक्ति भक्तीचे संवर्धन करते आणि भक्ताला अत्यंत सहजपणे ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपापर्यंत नेते.

९) परमेश्वराला अनन्यतेने शरण जात असल्यामुळे भक्त स्वतःकडे कोणत्याही प्रकारचे कर्तृत्व किंवा पुरुषार्थ घेत नाही.  तो संपूर्ण ईश्वराधीन असतो.  त्यामुळे मार्जारन्यायाप्रमाणे परमेश्वर स्वतःच भक्ताचे रक्षण करतो, योगक्षेम चालवितो.  नव्हे, तो भक्ताचा संसारामधून उद्धार करतो.

या सर्व कारणांमुळे भक्ति ही कर्म, ज्ञान, योग यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.  म्हणून मुमुक्षूंनी अन्य सर्व साधनांचा आश्रय न घेता फक्त भक्तीचाच आश्रय घ्यावा.

 


- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ –