मनुष्याच्या अंतःकारणामध्ये सदाचार उदयाला आला
तरच येथे आत्मज्ञान सुप्रतिष्ठित होऊन सुस्थिर होऊ शकते. मात्र त्यासाठी साधकाच्या मनामध्ये प्रथम सदाचाराचा
संकल्प हवा. संकल्पाशिवाय साधना घडू शकत
नाही. साधनेला, मनुष्याच्या प्रयत्नांना संकल्पाचे
सामर्थ्य मिळाले पाहिजे. म्हणून वसिष्ठ
मुनि येथे अत्यंत तळमळीने सदाचाराचे महत्त्व सांगतात. हे रामा ! साधकाने आत्मज्ञान तर प्राप्त करावेच पण त्याचबरोबर
शमादि गुणही प्राप्त करावेत. किंवा शमादि
गुण प्राप्त करता-करता आत्मज्ञान प्राप्त करावे. या दोन्हीही गोष्टी सहज शक्य आहेत.
हे रामा ! समजा, एखाद्या शेतामध्ये भरघोस पीक आले असेल, अशा
वेळी वडील आपल्या मुलीला त्या शेताचे रक्षण करण्यासाठी शेतावर पाठवितात. त्यावेळी ती मुलगी शेतावर जाते आणि पीकांवर लक्षही
ठेवते. परंतु पीकांवर लक्ष ठेवायचे म्हणून
केवळ बसूनच राहत नाही. ती हरहुन्नरी मुलगी
आपल्या मैत्रिणींना जमवेल, तेथे मुक्त कंठाने गाणी म्हणेल, सर्वजण मिळून सुंदर नृत्य
करतील. त्यावेळी पीकांवरील पक्षी आपोआपच उडून
जाऊन पीकांचे रक्षण होते. म्हणजे एका बाजूला
ही मुलगी शेतही सांभाळते आणि दुसऱ्या बाजूला ते सांभाळताना नृत्यगीतामधील आनंदही घेते.
त्याचप्रमाणे हे राघवा ! ज्ञानी पुरुष अत्यंत सहजतेने आत्मज्ञान घेतात. आत्मज्ञानासाठी श्रवण, मनन, चिंतनादि साधनेमध्ये
प्रवृत्त होतात. आत्ताच सांगितल्याप्रमाणे
शमादि सर्व साधनांचे व सदाचाराचे अनुसरण करतात. ते करता-करता आपोआपच त्यांच्या अंतःकरणामधील कामक्रोधादि
प्रतिबंध त्या पक्षांच्याप्रमाणे दूर होतात. म्हणजे साधक एका बाजूला साधना करायला लागला, सत्संगामध्ये
गेला, आत्मविचार करू लागला की, दुसऱ्या बाजूला कामक्रोधादि विकार नाहीसे होऊन त्याचे
मन शुद्ध होते आणि त्याला सहजच परमपदाची प्राप्ति होते.
- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९
- Reference: "Yogavashishtha" by Param
Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019
- हरी ॐ–

