Tuesday, October 20, 2026

अध्यारोप-अपवाद न्याय | Imposition-Negation Methodology

 




ज्यावेळी अत्यंत गूढ रहस्य सांगावयाचे असते त्यावेळी ते कधीही सरळ-सरळ, स्पष्टपणे सांगत नाहीत.  ते विरोधाभासामधुनच प्रकट केले जाते.  शास्त्रकार म्हणतात –

अध्यारोपापवादन्यायेन गुरुः शिष्यं उपदिशति |

किंवा –

अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपञ्चं प्रपञ्च्यते |

 

अध्यारोप-अपवाद यांच्या साहाय्याने निर्विशेष परब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाचा उपदेश गुरु शिष्याला करतात.  ही अत्यंत अवघड पद्धत आहे.  केवळ उपदेश देणे, प्रवचन देणे, व्याख्याने देणे सोपे आहे.  परंतु एखाद्याला शिकविणे, समजावून - पटवून देणे ही अवघड गोष्ट आहे.  हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे !  त्यामुळे अत्यंत विद्वान, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ गुरु शिष्याला अध्यारोपअपवादन्यायाने या आत्मतत्त्वाचा उपदेश करतात.

 

भगवंतांनी गीतेमध्ये अनेक ठिकाणी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे.  दुसऱ्या अध्यायामध्येही स्थितप्रज्ञदर्शनामध्ये "तो चालतो पण चालत नाही, बोलतो पण बोलत नाही, करतो पण करीत नाही," असे स्थितप्रज्ञ पुरुषाचे विरोधी वर्णन केलेले आहे.  या श्लोकामध्येही भगवान, "सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च |"  

असे परस्परविरोधी वर्णन करतात.

 

अध्यारोप म्हणजेच प्रथम अध्यास करणे आणि अपवाद म्हणजे अध्यासाचा निरास करणे होय.  येथे भगवंतांनी परब्रह्मस्वरूपामध्ये सर्व इंद्रियांचा अध्यारोप, अध्यास करून परब्रह्माची सत्ता सिद्ध केली आणि नंतर परब्रह्म हेच फक्त सत्य आहे, हे सांगताना सर्व इंद्रियरूपी अध्यस्त उपाधींचा निरास करून परब्रह्म निरवयव, निरुपाधिक, निर्विशेष स्वरूपाचे आहे, असे प्रतिपादन केले.  

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–