Tuesday, October 3, 2023

वैषयिक आणि निर्वैषयिक आनंद | Materialistic & Transcending Bliss

 वसिष्ठ मुनि वैषयिक आनंद आणि निर्विषयक आनंद यामधील फरक सांगतात.  अज्ञानी मनुष्य मनामध्ये इंद्रजाल निर्माण करतो.  विषय पाहिले रे पाहिले की, जो विषय त्याला आवडतो तो त्याला हवाहवासा वाटतो.  त्या विषयाच्या दर्शनानेच मनामध्ये सुखवृत्ति निर्माण होते.  नंतर प्रयत्नाने तो विषय मिळविल्यावर म्हणजे तो विषय माझ्या मालकीचा झाल्यावर आणखी थोडे जास्त सुख मिळते.  त्यानंतर त्या विषयाचा प्रत्यक्ष उपभोग घेतल्यानंतर त्याहीपेक्षा जास्त सुख मिळते.

 

परंतु असा एक विषयभोग भोगल्यानंतर मनुष्य तृप्त न होता दुसऱ्या विषयाची तृष्णा त्याच्या मनामध्ये निर्माण होते.  यावरून समजते की, विषय मनुष्याला कधीही पूर्ण सुखी किंवा पूर्ण तृप्त करू शकत नाहीत.  तसेच वैषयिक आनंद हा तरतमभावाने युक्त असतो.  म्हणजेच त्याचे प्रमाण कमी-अधिक होत असते.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैषयिक सुख हे येणारे-जाणारे, अनित्य व क्षणभंगुर असते.

 

ज्ञानी पुरुषाला मिळणारे निर्विषयक सुख मात्र विषयांच्यामधून निर्माण झालेले नसते.  त्यामुळे तो आनंद कमी-जास्त किंवा येणार-जाणारा नसतो.  तर ते सुख सर्व बाजूंनी परिपूर्ण स्वरूपाचे असते.  ते मिळाल्यानंतर आनंद मिळविण्यासाठी दुसरे काहीही करण्याची आवश्यकता राहत नाही.  ज्ञानी पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपामध्ये आनंदाने राहतो.

 

जसे पावसाळ्यात विहिरी, नद्या तलाव, पाण्याने भरून गेले व पाणी आपल्या दाराशीच आले, तर हातात कळशी घेऊन पाण्यासाठी कोणीही बाहेर जात नाही.  तसेच जो ज्ञानी पुरुष अंतरंगाने सुखस्वरूप झालेला असतो.  ज्याला सुखाचा सागर प्राप्त झालेला आहे, तो सुख मिळविण्यासाठी कोणत्याही बाह्य विषय किंवा उपभोगांमध्ये प्रवृत्त होत नाही.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ