Showing posts with label Offering. Show all posts
Showing posts with label Offering. Show all posts

Tuesday, November 1, 2022

आत्मोद्धाराची साधने – दान | Means of Self-Upliftment – Offerings

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.

नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II

(श्रीमद् भागवत)

 

अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

ईश्वराने मनुष्याला दान हे साधन दिले.  जीवनामध्ये दान ही वृत्ति अत्यंत आवश्यक आहे.  कारण दुसऱ्याला देण्यामध्ये त्याग आहे.  समर्पणाची भावना आहे.  दानवृत्तीमुळे विषयासक्ति कमी होते.  ममत्वाचा भाव कमी होतो.  त्यामधून कळत-नकळत वैराग्य उदयाला येते.  दानाने धनाची शुद्धि होते.  जितके आपण देतो तितके आपणास मिळत राहते.  ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो, त्यावेळी आपल्याला व दुसऱ्याला दोघांनाही आनंद होतो.

 

दानवृत्तीमुळे परोपकाराची भावना जागृत होते.  देण्याची सवय लागते.  संसारबंधन कमी कमी व्हायला लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक गोष्टींचे दान देता-देता सर्वात शेवटी मनुष्य आपल्या अहंकाराचेच समर्पण करतो.  त्यालाच सर्वस्वाचे दान किंवा बलिदान असे म्हणतात.  शास्त्रामध्ये कोणाला दान द्यावे ?  केव्हा द्यावे ?  काय द्यावे ?  कोठे द्यावे ?  कसे द्यावे ?  तसेच त्या दानाचे फळ काय ?  याचे वर्णन विस्तारपूर्वक येते.  म्हणून मनुष्याने अवश्य सत्पात्री दान करावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ–





Tuesday, May 16, 2017

द्रव्ययज्ञ | Offering of Money


भगवान द्रव्यदानाला यज्ञस्वरूप देतात.  द्रव्ययज्ञ म्हणजे द्रव्य वाटणे नाही, तर त्यामध्ये काही नियम आहेत ते पाळले तरच तो द्रव्ययज्ञ होतो.  

१. द्रव्यदान करताना ज्याला दान द्यायचे तो योग्य, सत्पात्री असून गरजू असावा.  

२. दान केव्हाही, कोठेही न देता विशिष्ट काळामध्ये आणि पवित्र ठिकाणी द्यावे.  म्हणून मंदिरामध्ये किंवा क्षेत्रामध्ये तसेच पर्वणी, कुंभमेळा किंवा ग्रहणाच्या वेळी दान दिले जाते.  

३. ते अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने द्यावे.  श्रुति म्हणते – श्रद्धया देयम् अश्रद्धया अदेयम् |  जे जे काही दान करतो ते श्रद्धेने द्यावे.  अश्रद्धेने, नाईलाजास्तव देऊ नये.  श्रद्धेने दान देत असताना दुसऱ्याला मदत किंवा साहाय्य करतो अशी भावना नसून सेवावृत्ति असते.  मी या दानामधून परमेश्वराचीच सेवा करतो हा अत्यंत शुद्ध आणि उदात्त भाव असतो.  परमेश्वरकृपेने जे मला प्राप्त झालेले आहे ते मी पुन्हा परमेश्वराला अर्पण करीत आहे.  अशा प्रकारे श्रद्धेने, विधियुक्त सत्पात्री दान केले तर त्यामध्ये नम्रता, विनयशीलता दिसते.  तसे नसेल तर मनुष्यामध्ये अहंकार निर्माण होऊन तो कीर्ति किंवा प्रतिष्ठेसाठी दान करतो.  ते दान म्हणजे द्रव्ययज्ञ नव्हे.  

शास्त्रामध्ये अनेक प्रकारची दाने सांगितलेली आहेत.  प्रत्येक दान हे धनानेच केले पाहिजे असे नाही.  तर समाजोपयोगी कोणतेही कार्य हे दानच आहे.  उदा. विहिरी, तलाव, धर्मशाळा, पाणपोई, शिक्षणसंस्था, मंदिर यांची स्थापना करणे.  तसेच, अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान अशा प्रकारची अनेक दाने आहेत.  या दानामधून लोकांच्या मनात श्रद्धा, सत्शीलता, श्रेष्ठ नीतिमूल्यांचे संस्कार निर्माण होतात.  म्हणून याला ‘द्रव्ययज्ञ’ असे म्हटले जाते.  यामुळे अंतःकरण काही प्रमाणात शुद्ध होऊन दान कर्त्याला प्रसन्नता, समाधान प्राप्त होते आणि जो दान ग्रहण करतो तोही संतुष्ट होतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ – 

Tuesday, August 25, 2015

मनुष्य जीवनाचा यज्ञ | Yajnya of Human Life


देवांचा मानसिक यज्ञ सांगण्यामागे श्रुतीला केवळ बाह्य यज्ञ किंवा कर्मकांड अपेक्षित नसून साधकाला यामधून काहीतरी श्रेष्ठ सांगावयाचे आहे. आपले संपूर्ण जीवनच यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नसून यज्ञ म्हणजे अर्पण करणे आहे.

यज्ञामध्ये सतत तूप घालावे लागते. या व्यष्टि यज्ञात तूप म्हणजे स्निग्धता, स्नेहभाव, ममत्व. हा ममत्वभाव यज्ञात अर्पण केला तरच ज्ञानाग्नि प्रज्वलित होतो. आज साधकाच्या अंतःकरणामध्ये विषय, व्यक्तींविषयी ममत्व असल्यामुळे हा माझा, हा परका ही कूपमंडुक वृत्ति निर्माण होते. फक्त माझे घर, माझी मुले, इतकीच सीमित दृष्टि बनते. मात्र, ज्ञानाग्नि प्रज्वलित करावयाचा असेल तर ममत्वरूपी तूपाचे सतत समर्पण केले पाहिजे.

ग्रीष्म ऋतु म्हणजे कडक उन्हाळ्यात झाडांच्या फांद्या वाळतात व त्याच नंतर समिधा म्हणून वापरतात. या समिधा म्हणजेच अंतःकरणातील वासना होत. प्रथम या समिधा ओल्या, स्निग्ध असतात. त्यांना शुष्क करण्यासाठी उन्हाळा आवश्यक आहे. साधकाच्या जीवनात प्रखर वैराग्याशिवाय साधना शक्य नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.

शरद ऋतु हा हविस् द्रव्य आहे. हविस् द्रव्य म्हणजेच जीवनातील शब्दस्पर्शरूपरसगंधादि भोग्य विषय आहेत. त्या सर्वांचे अर्पण करावे. त्यासाठीच शास्त्रात अनेक प्रकारची दाने सांगितलेली आहेत. अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान या सर्व दानांमधून अर्पण वृत्ति आत्मसात करण्यास सांगितलेली आहे.

थोडक्यात, स्वतःमध्ये असणारे ममत्व, स्नेह, ऐहिक, पारलौकिक कामनेचा त्याग करावा. या यज्ञाचे हविस् द्रव्य म्हणजे प्रत्येक जिवामध्ये असणारा अहंकार आहे. अहंकाराला अर्पण करणे हीच या यज्ञाची पूर्णाहुति आहे.


- "पुरुषसूक्त" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  जानेवारी २००६   
- Reference: "
Purushsuktam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, January 2006




- हरी ॐ –