Tuesday, November 1, 2022

आत्मोद्धाराची साधने – दान | Means of Self-Upliftment – Offerings

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.

नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II

(श्रीमद् भागवत)

 

अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

ईश्वराने मनुष्याला दान हे साधन दिले.  जीवनामध्ये दान ही वृत्ति अत्यंत आवश्यक आहे.  कारण दुसऱ्याला देण्यामध्ये त्याग आहे.  समर्पणाची भावना आहे.  दानवृत्तीमुळे विषयासक्ति कमी होते.  ममत्वाचा भाव कमी होतो.  त्यामधून कळत-नकळत वैराग्य उदयाला येते.  दानाने धनाची शुद्धि होते.  जितके आपण देतो तितके आपणास मिळत राहते.  ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो, त्यावेळी आपल्याला व दुसऱ्याला दोघांनाही आनंद होतो.

 

दानवृत्तीमुळे परोपकाराची भावना जागृत होते.  देण्याची सवय लागते.  संसारबंधन कमी कमी व्हायला लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक गोष्टींचे दान देता-देता सर्वात शेवटी मनुष्य आपल्या अहंकाराचेच समर्पण करतो.  त्यालाच सर्वस्वाचे दान किंवा बलिदान असे म्हणतात.  शास्त्रामध्ये कोणाला दान द्यावे ?  केव्हा द्यावे ?  काय द्यावे ?  कोठे द्यावे ?  कसे द्यावे ?  तसेच त्या दानाचे फळ काय ?  याचे वर्णन विस्तारपूर्वक येते.  म्हणून मनुष्याने अवश्य सत्पात्री दान करावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ